Thyroid Problem: महिलांना थॉयरॉईडचे टेन्शन; तपासणी केली का ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thyroid problem in women

Thyroid Problem : महिलांना थॉयरॉईडचे टेन्शन; तपासणी केली का ?

Thyroid Problem in Women: तुमच्या कुटुंबात कुणी अचानक वजन वाढणे, केस गळणे, थकवा, अपचन, नैराश्याने ग्रस्त असेल, तर कदाचित ही समस्या थॉयरॉईडच्या विकारामुळे उद्भवलेली असू शकते. जवळपास ६० टक्के व्यक्तींना थॉयरॉईडशी संबंधित विकार आहे.

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये सात ते दहा पट याचे प्रमाण अधिक आढळते. हा विकार शोधण्याचा सोपा उपाय म्हणजे थॉयरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन अर्थात टीआरएस तपासणी, हार्मोन थेरपी देऊन या विकारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

थॉयरॉईड म्हणजे काय?

थॉयराईड हे मानेच्या पुढच्या भागांत असते. पाठीचा कणा असलेल्या तसेच शरीराचे योग्य पोषण आणि वाढ होण्यासाठी, चयापचयाच्या नियंत्रणासाठी या ग्रंथीची आवश्यकता असते.

पिंगट लालसर रंग असलेल्या या ग्रंथीचा आकार त्या त्या वेळच्या शरीरव्यापारावर अवलंबून असतो. ग्रंथीचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. विशेष म्हणजे शरीराचे इतके महत्त्वाचे कार्य करणाऱ्या या ग्रंथीचे वजन केवळ १५ ते २० ग्रॅम इतके असते.

८५१ महिलांना थॉयरॉईड

जिल्ह्यात माता सुरक्षीत, तर घर सुरक्षीत या अभियानांतर्गत ४ लाख ४९ हजार १६ महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८५१ महिलांना थॉयरॉईडचा आजार असल्याचे आढळून आले. देशात थॉयरॉईड असलेल्या महिलांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.

४.४९ लाख महिलांची तपासणी

जिल्हा आरोग्य विभागाकडून माता सुरक्षीत, तर घर सुरक्षीत या अभियानांतर्गत गत वर्षभरात ४ लाख ४९ हजार १६ महिलांची तपासणी करण्यात आलेली आहे.

थॉयरॉईडची लक्षणे काय? (Thyroid Symptoms)

अचानक वजन वाढते

अचानक वजन कमी होते

पचन शक्ती मंदावते

नख पातळ होते

नखांना चिरा जातात

नखामध्ये बदल होतो

ती सहज तुटतात

काय काळजी घ्याल ?

आयोडिन, लोह, अ जीवनसत्व याचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन हार्मोन्सच्या उत्पादनाला चालना देते, तर थॉयरॉईड रुग्णांनी सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ, पनीर, सोया मिल्क, भाज्यांमध्ये पानकोबी, फुलकोबी, पालक, ब्रोकोली कंद, अळू, स्ट्रॉबेरी, शेंगदाणा, बाजरी खाऊ नये, प्रत्येक वर्षाला थॉयरॉईडची तपासणी करावी. मर्यादित तेल, तूप खावे.

थॉयरॉईड विकार होण्याची कारणे गुंतागुंतीची असू शकतात; परंतु काही पथ्य पाळल्यास थॉयरॉईड विकार टाळता येतात. त्यासाठी आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला ही त्रिसुत्री आहे.

थॉयरॉईड विकाराशी संबंधित कुठलीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वजन वाढणे, कमी होणे, केस गळणे, अशा विकारांसाठी स्वत:च्या मर्जीने औषधोपचार करू नका. टीएसएस चाचणी विकाराची माहिती देते.

- डॉ. मिलिंद जाधव,जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी