Healthy Lifestyle : अष्टांग योगाने करा आरोग्यप्राप्ती

उत्तम आरोग्य तपाचरणाने मिळवता येते
Healthy Lifestyle Ashtanga Yoga
Healthy Lifestyle Ashtanga Yoga

शुद्ध चारित्र्य आणि उत्तम आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, कारण नैतिक व शारीरिक शिस्त अंगी बाणल्यानंतरच मानसिक शिस्त लागते. असे उत्तम आरोग्य तपाचरणाने मिळवता येते. कष्ट न करता मिळालेले धन ज्याप्रमाणे गैरमार्गाने खर्च होण्याची शक्यता जास्त असते, त्याप्रमाणे तप न करता मिळालेले आरोग्य हे वरदान ठरण्याऐवजी शाप ठरण्याची शक्यता असते. अष्टांग योगाच्या तपाने झालेली आरोग्यप्राप्ती, जीवन समृद्ध, संपन्न करणारी असते.

अ) रोगनिवारण : आपण कोणतेही औषध घेतो, तेव्हा पंचमहाभूतांच्या कार्यांचा वेग, आपल्या नकळत आवश्यकतेनुसार वाढवला जातो किंवा कमी केला जातो. हेच आसन-प्राणायामाच्या अभ्यासातून, जाणीवपूर्वक साधायचे असते. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची आवश्यकता असते. तिच्या अभावामुळे लोक औषध घेणेच पसंत करतात. मात्र, औषध घेणे आणि घेत राहणे हा खरा उपाय आहे का?

श्‍वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था या दोन मार्गांनी आपल्यात रोग प्रवेश करतात. सर्व शरीराला या संस्थांमार्फतच पोषण पोचवले जाते, म्हणून योगाभ्यासात या संस्थांना खूप महत्त्व दिलेले आहे. बाधित स्नायू आणि विविध अवयवांवर विचारपूर्वक अनेक प्रकारे काम केले जाते. त्यामुळे त्यांना रक्तपुरवठा व प्राणशक्तीचा पुरवठा वाढवून रोगमुक्त केले जाते.

आ) आरोग्यसंपन्नता : क्लेशांमुळे शुद्ध असलेले चित्त अशुद्ध होते. क्लेशांचे मूळ कर्मांमध्ये असल्याने त्यांच्या निवृत्तीसाठी कर्मशुद्धी हा एकमेव उपाय आहे. तमोगुण हा अविद्येचे प्रमुख कारण आहे. सत्त्वगुण हा तमोगुणाने झाकलेला असतो. त्या तमोगुणाला उपचाराची आवश्यकता असते. या उपचारासाठी जे साधन वापरलेले असते ते म्हणजे अष्टांगयोग होय.

अय्यंगार गुरुजी म्हणतात, ‘‘पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या महाभूतांचे प्रमाण प्रत्येक पेशीत संतुलित आणि प्रमाणबद्ध असते. शरीरारोग्य हे या भूतांच्या संतुलनावर अवलंबून असते. आसन आणि प्राणायाम यांचा सराव मुख्यतः या महाभूतांवर नियमन आणण्यासाठी करायचा असतो. शरीराला त्या त्या आसनात एका विशिष्ट स्थितीत ठेवण्याचे कार्य पृथ्वी-तत्त्व करते, परंतु त्यातील दोष शोधणे व आसनातील प्रत्येक हालचाल टिपणे हे कार्य आप-तत्त्वाकडून होते. त्यात अचूकता साधणे हे अग्नि-तत्त्वाचे कार्य असते. या अचूकतेमुळे शरीर व मन या दोन्हीत स्थिरता येते. सजगता आणण्याचे कार्य वायु-तत्त्व करते आणि शरीरांतर्गत होणारे आकुंचन-प्रसरण इत्यादी घडते ते आकाश-तत्त्वामुळे.

शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी यम-नियमा अभ्यासाने नैतिक व मानसिक दृष्टिकोनातून कर्मशुद्धी, आसनांद्वारे पंचमहाभूते व तन्मात्रा यांची शुद्धी, प्राणायामाद्वारे प्राणशुद्धी, तर प्रत्याहारातून इंद्रियशुद्धी आणि धारणा-ध्यान यांनी अंतःकरण शुद्धी साधायची आहे. तेव्हा कुठे समाधीमध्ये प्राणशक्ती व चित्त शक्ती यांचे आत्मशक्तीत हवन होईल.’’

योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध म्हणजेच समाधी. त्यासाठी पतंजलींनी दोन उपाय सांगितलेले आहेत. अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे अष्टांगयोगाने चित्तस्थैर्याचा सराव निष्ठेने करत राहणे आणि वैराग्य म्हणजे वासना, आसक्तीपासून मुक्त होणे होय. दोन्ही एकमेकांना पूरक, सहाय्यभूत ठरतात. अभ्यासातून वैराग्य प्राप्त होते आणि वैराग्याने हवा तसा अभ्यास चालू राहतो.

या शरीर संतुलन आणि चित्तशुद्धी प्रक्रियेचा विचार करता ‘असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे।।’ हे मनोमन पटते.

शलभासन

  • जमिनीवर सरळ पोटावर जा. चेहरा जमिनीकडे असू द्या. हात पाठीमागे लांब करा.

  • श्वास सोडा आणि एकाच वेळी डोके, छाती, हात व पाय जमिनीवरून वर उचला. शरीराचा फक्त पोटाचा भाग जमिनीला टेकलेला असेल आणि शरीराचा भार त्याच भागावर असेल.

  • दोन्ही पाय पूर्णपणे ताणलेले. सरळ, एकमेकांशी जुळवलेले असू द्या.

  • ३० सेकंद थांबा. श्‍वास रोखू नका.

उपयोग

  • जठरासंबंधित त्रास कमी होतात.

  • वातरोग नाहीसा होतो.

  • पचनाला मदत होते.

  • कमरेजवळच्या वेदना थांबतात.

  • कण्यातील चकत्या सरकलेल्या असतील तर लाभ होतो.

  • मूत्राशय आणि प्रोस्टेट ग्रंथींना निकोपपणा लाभतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com