

"तरुणाईसाठी 'चिंतन, चारित्र्य, चपलता आणि चातुर्य'!" आयुष्याच्या प्रवासात मागे पडायचं नसेल, तर संतांची ही चतुःसूत्री अंगीकारा.
Sakal
योगिराज महाराज पैठणकर
सद्यःस्थितीत माणसाचं सरासरी आयुष्य हे सहा तपांचं- म्हणजे ७२ वर्षांचं आहे, असं काही निरीक्षणांवरून लक्षात येतं. तसं संतांनी ते १०० वर्षे सांगितलं असलं तरी विविध आजार व व्याधींमुळे माणूस तिथपर्यंत सहसा जगत नाही. सुरुवातीची बारा वर्षं म्हणजे एक तप खेळण्याबागडण्यात- म्हणजेच बालपणात निघून जातं. पुढील दोन तपांत आपल्याला तीन अवस्थांचा अनुभव घ्यायचा असतो- त्या म्हणजे किशोरावस्था, तारुण्यावस्था व प्रौढावस्था होय. किशोरावस्था १३ ते १८, तारुण्यावस्था १९ ते ३० आणि त्यापुढे वयोवृद्ध होईपर्यंत प्रौढावस्था. श्री एकनाथ महाराज म्हणतात,
बाळत्व तारुण्य वृद्धत्व। ऐसे देहाचे विविधत्व।।
या तीन अवस्थांव्यतिरिक्त त्यांनी ग्रंथकौस्तुभ श्रीएकनाथी भागवताच्या बाविसाव्या अध्यायात देहासंबंधी नऊ अवस्थांचे वर्णन केले आहे, ते मुळातून पाहणे इष्ट ठरेल.