योग-जीवन : अय्यंगार योगप्रणालीची वैशिष्ट्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga

आज आपण अय्यंगार योगप्रणालीच्या वैशिष्ट्यांची थोडक्यात माहिती घेऊ.

योग-जीवन : अय्यंगार योगप्रणालीची वैशिष्ट्ये

- किशोर आंबेकर, अय्यंगार योग शिक्षक

आज आपण अय्यंगार योगप्रणालीच्या वैशिष्ट्यांची थोडक्यात माहिती घेऊ

1) सर्वसमावेशक दृष्टिकोन

शरीर हा मनाचा भाग असतो आणि मन हा शरीराचा भाग असतो. शरीर कोठे संपते, मन कोठे सुरू होते आणि मन कोठे संपते, शरीर कोठे सुरू होते हे कोणीच सांगू शकत नाही. ते एकमेकांशी संबंधित असतात, एकमेकांवर अवलंबून असतात. त्याचप्रमाणे अष्टांगयोगाची आठही अंगे एकमेकांशी संबंधित, एकमेकांमध्ये गुंफलेली असतात. आसन-प्राणायाम शिकताना त्यात इतर अंगे अनुस्युत,अभिप्रेत असतातच.

2) अचूकता आणि सममिती

प्रत्येक आसनातील विशिष्ट शारीरिक क्रिया या अचूक व दोन्ही बाजू एकारेषेत येतील अशा संतुलित असाव्या लागतात. त्यामुळे श्‍वास, मन, भावना, इंद्रिये संतुलित व्हायला मदत होते.

3) जास्त वेळ

दीर्घकाळ आसनांचा सराव करणाऱ्यांनी प्रत्येक आसनात जास्त वेळ थांबण्याची क्षमता टप्प्याटप्प्याने निर्माण करावी. त्यामुळे कमी कष्टांत जास्त वेळ आरामशीर थांबता येईल. त्याचा परिणाम म्हणून आसनात स्थिरता व सुखता येते. इथे शरीरावर बळजबरी किंवा इर्षेची मानसिकता नसते. असे बदल स्वाभाविकपणे घडून येतात.

4) आसनक्रम

वेगवेगळ्या क्रमाने आसने केल्यास त्यांचे परिणाम वेगवेगळे असतात. हवामान, तापमान, दिवसाची विशिष्ट वेळ, शरीर-मनाची स्थिती, यानुसार आसनक्रम ठरविता येतात.

5) साधनांचा वापर

काही आसने साधनांच्या सहाय्यानेच शक्य होतात व त्यांचे फायदे मिळवता येतात. साधनांशिवाय आसन शक्य असले तरी, साधनांच्या साहाय्याने जास्त वेळ आरामशीर थांबता येते. त्यामुळे शरीर, श्वास, मन यांचे अवलोकन शक्य होते.

कोणतीही योग प्रणाली कष्टप्रद आहे की विनासायास, हा मुद्दा नाही तर मन, जाणीव, प्राणशक्ती शरीरातल्या अंधाऱ्याजागी सुद्धा पोहोचतात का, हे महत्त्वाचे आहे. पतंजली महामुनी म्हणतात, ‘तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः’।। समाधिपाद सूत्र-१३ ।। अर्थात योगस्थिती प्राप्त करून घेण्यासाठी अथक, सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. रामदास स्वामी म्हणतात, ‘यत्न तो देव जाणावा । यत्नेवीण दरिद्रता ।।’

शेतात तण असतील तर शेतकऱ्याला ते मुळापासून खणून काढावे लागतात. नाहीतर पेरलेल्या बियांच्या आधी ते पुन्हा उगवून वर येतात. तेच योगाभ्यासालाही लागू आहे. हळूवार, कष्ट न करता केलेल्या आसनांमुळे शरीरातील अशुद्धीचा क्षय होत नाही. जिवाला त्रास करून घेऊ नका. सुखासुखी, जेवढे जमेल तेवढेच करा.

गुरुजींनी हे योगशास्त्र आकर्षक, रुचकर आणि बोधप्रद बनविले. त्याचा आधुनिक जगाच्या गरजांशी मेळ घातला. त्याला सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणले. विश्वाच्या निर्मितीपासूनच्या या शास्त्राला कोणा एका व्यक्तीचे नाव देणे हे त्यांना कधीच मान्य नव्हते. लोकांनी त्यांच्या सोयीसाठी ‘अय्यंगार योग’ असे नाव दिलेले आहे. याची नोंद ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आहे.

टॅग्स :yogahealth