esakal | कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिसला घाबरू नका, अशी घ्या काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

Mucormycosis

कोरोनातून बरे झाल्यानंतर आता रुग्णांना म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. जीवघेणा ठरू शकणारा व महागड्या आजारामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र सतर्क राहणे गरजेचे आहे

म्युकरमायकोसिसला घाबरू नका, मात्र सतर्क राहा

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनातून (Coronavirus) बरे झाल्यानंतर आता रुग्णांना म्युकरमायकोसिस (mucormycosis) या गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. जीवघेणा ठरू शकणारा व महागड्या आजारामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र सतर्क राहणे गरजेचे आहे. यासाठी कोविड झाल्यापासून ४० दिवसांपर्यंत शारीरिक हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असा सल्ला नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. राजश्री कुटे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिला. (know how to take care to prevent mucormycosis infection)


कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असल्याची बाब दिलासा देणारी असली तरी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या नवीन आजाराला सामोरे जावे लागत आहे. प्रथम नाकातून, त्यानंतर डोळ्यापर्यंत हा बुरशीजन्य आजार पसरतो. पुढे पापणी पडणे, दुहेरी चित्र दिसणे, दृष्टी जाणे असे प्रकार दिसतात. हा आजार भयंकर असला तरी यातून रुग्ण बरेदेखील झाले आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, परंतु सतर्क राहणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ज्या लोकांना मधुमेह यापूर्वी नव्हता, कोरोनाकाळात स्टेरॉइड घेतल्याने मधुमेहाचे आजार दिसून येत आहेत. बुरशी वाढण्याला मधुमेह कारणीभूत आहे. कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने स्टेरॉइडचा वापर होतो. त्यातून पॅनक्रिया बिघडत असल्याचे डॉ. कुटे यांनी सांगितले.


अशी घ्यावी काळजी

-कोरोनाबाधित आढळल्यानंतर दहाव्या दिवसापासून ४० व्या दिवसापर्यंत शारीरिक बदलांवर लक्ष ठेवावे.
-स्टेरॉइड घेतलेल्या रुग्णांनी बदल न जाणवल्यास कान-नाक-घसातज्ज्ञांशी संपर्क साधावा.
-शरीरातील साखरेचे प्रमाण सातत्याने तपासावे.
-मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर या नियमांचा अवलंब करावा.
-रोगप्रतिकार वाढविणाऱ्या आहाराचे सेवन करावे.म्युकरमायकोसिसची लक्षणे

-पापणी पडणे
-दुहेरी चित्र दिसणे
-दृष्टिहीनता
-टाळूला काळा डाग येणे
-दाढीवर काळा डाग येणे

सध्या नाक, कान व घशापर्यंत म्युकरमायकोसिस पोचत असले तरी फुफ्फुस्सापर्यंत पोचण्याच्या केसेस येऊ लागल्या आहेत. रुग्णांनी घाबरून जाण्याची आवश्‍यकता नाही, सतर्क राहिले पाहिजे.
-डॉ. राजश्री कुटे, नेत्रविकारतज्ज्ञ

(know how to take care to prevent mucormycosis infection)