काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात भारतात लठ्ठपणाच्या आणि जीवनशैलीसंबंधित आजारांच्या वाढत्या समस्येवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लठ्ठपणाशी आणि जीवनशैलीसंबंधित आजारांच्या वाढत्या आरोग्य धोक्यांवर प्रकाश टाकला, आणि २०२२ मध्ये २५० कोटी लोकांमध्ये लठ्ठपणाचे आणि जीवनशैलीसंबंधी आजारांचे प्रमाण वाढले असल्याचे सांगितले आहे.
त्यांनी सांगितले, की लठ्ठपण हे केवळ वैयक्तिक समस्या नाही, तर ते एक सामाजिक समस्या आहे, आपण या लेखमालिकेमध्ये जीवनशैलीविषयक आजारांविषयी माहिती घेऊयात.
आजच्या युगात जीवनशैलीसंबंधी आजार ही एक मोठी आरोग्य समस्या बनली आहे, जी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करत आहे. संसर्गजन्य आजार जसे की मलेरिया, डेंगी हे जीवाणू किंवा विषाणूमुळे होतात, तर जीवनशैलीसंबंधी आजार हे मुख्यतः चुकीच्या सवयी, असंतुलित आहार, शारीरिक निष्क्रियता, मानसिक ताण आणि प्रदूषणामुळे होतात.
स्थूलत्व, मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि श्वसनविकार यांसारखे आजार आता महासाथीच्या प्रमाणात वाढत आहेत. ही समस्या विकसित; तसेच विकसनशील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे लोकांचे आरोग्य, अर्थव्यवस्था आणि आरोग्यसेवा प्रणालींवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे, योग्य जनजागृती, जीवनशैलीतील सुधारणा आणि प्रभावी धोरणांद्वारे या आजारांवर नियंत्रण मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रसार आणि मृत्यूदर
मृत्यूंमध्ये वाढती भागीदारी : इसवीसन १९९० मध्ये भारतातील एकूण मृत्यूंपैकी ३७.०९ टक्के मृत्यू हे जीवनशैलीशी संबंधित आजारांमुळे होते, तर २०१६ पर्यंत हा आकडा ६१.८ टक्क्यां वर गेला. याचा अर्थ असा, की संसर्गजन्य रोगांचे प्रमाण कमी होत असतानाही हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांसारख्या आजारांनी मोठ्या प्रमाणावर जीव गमवले जात आहेत.
उच्च रक्तदाब - भारतातील ४०-५० टक्के लोकांना रक्तदाबाचा त्रास असतो, जो पाश्चिमात्य देशांपेक्षा अधिक आहे. पूर्वी हा आजार प्रामुख्याने मध्यमवयीन आणि वृद्ध व्यक्तींमध्ये आढळत असे, परंतु आता तरुणांमध्येही वाढ होत आहे.
मधुमेह आणि इतर संबंधित आजार - २०२१ च्या अहवालानुसार, मधुमेह, कोलेस्टेरॉल वाढ आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजार वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. ६० वर्षांवरील ५७ टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाब आहे, जो भविष्यात हृदयविकार आणि स्ट्रोकच्या जोखमीस कारणीभूत ठरू शकतो.
जीवनशैलीसंबंधी आजार - आर्थिक परिणाम
आरोग्य व्यवस्थेवरील आर्थिक बोजा - जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, २०३० पर्यंत जीवनशैलीशी संबंधित आजारांमुळे भारताला तब्बल ६ ट्रिलियन डॉलर (सुमारे ५०० लाख कोटी रुपये) खर्च येऊ शकतो. वैद्यकीय खर्च, उत्पादनक्षमतेतील घट आणि मृत्यूदर वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-५) २०१९-२१ नुसार, भारतात स्थूलत्व (Obesity) आणि जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. १५-४९ वयोगटातील भारतीय प्रौढांमध्ये स्थूलत्वाचे प्रमाण वाढले आहे.
स्त्रिया - २०१६ मध्ये २०.६ टक्के होते, जे २०२१ मध्ये २४ टक्क्यां वर गेले.
पुरुष - २०२१ मध्ये २२.९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
ही वाढती प्रवृत्ती दर्शवते, की भारतात जीवनशैलीशी संबंधित आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण
भारतात स्थूलत्व आणि जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही समस्या वेगवेगळ्या प्रमाणात दिसत असली, तरीही सर्वच भागांमध्ये आरोग्य व्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम होत आहे. या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहार सुधारणा, व्यायाम, आणि सार्वजनिक आरोग्य मोहीम गरजेच्या आहेत.
जीवनशैलीसंबंधी आजार म्हणजे काय?
जीवनशैलीसंबंधी आजार हे मुख्यतः आपल्या जीवनशैलीशी संबंधित असतात. हे आजार हळूहळू विकसित होतात आणि बराच काळ टिकतात. संसर्गजन्य आजार जसे की क्षयरोग किंवा मलेरिया हे एका व्यक्तीकडून दुसऱ्याला संक्रमित होतात, परंतु जीवनशैलीसंबंधी आजार असे नसतात. हे अनुवंशिक घटक, आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, मद्यपान आणि मानसिक ताण यांसारख्या कारणांमुळे उद्भवतात.
(क्रमश:)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.