Health : प्रदूषण, धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे विकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lung diseases due to Air pollution smoking

Health : प्रदूषण, धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे विकार

पुणे : दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण अन् त्यात तुम्ही जर धूम्रपान करत असला, तर दीर्घकालीन फुफ्फुसांच्या आजारांपासून आताच सावध व्हायला हवे. सीओपीडी अर्थात क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डीसीससाठी धूम्रपान हा सर्वाधिक परिणामकारक घटक असून, बदलत्या जीवनशैलीमुळे या आजाराचा धोका अधिकच वाढत आहे. त्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन डॉक्टरांना केले आहे. जगभरात बुधवारी सीओपीडी दिवस साजरा होत आहे. याविषयी....

सीओपीडी म्हणजे काय?

श्वसनाचा एक दीर्घकालीन आजार, ज्यामध्ये लहान व मध्यम आकाराच्या श्वसननलिकांचा दाह होतो आणि त्यांना सूज येते. यामुळे श्वासनलिका आकुंचन पावतात आणि श्वासोच्छवासात (प्रामुख्याने उच्छवासात) अडथळा निर्माण होतो. अर्थातच फुप्फुसाची ऑक्सिजन आणि कार्बन डायॉक्साईडची देवाणघेवाण करण्याची क्षमता कमी होते.

लक्षणे

  • दीर्घकालीन चालणारा खोकला

  • काम केल्यावर धाप लागणे

  • लवकर थकवा येणे

परिणाम

  • रुग्णाची कार्यक्षमता कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणून जीवनशैलीची गुणवत्ता घटते.

  • सीओपीडी हा दीर्घकालीन आणि वयपरत्वे वाढत जाणारा आजार असल्यामुळे त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास लक्षणांची तीव्रता वाढत जाते.

  • या आजाराचे नक्की निदान हे ‘पल्मनरी फंक्शन टेस्ट’द्वारे केले जाते.

उपचार पद्धती

श्वासाचे व्यायामप्रकार

काही विशिष्ट प्रकारच्या श्वसनक्रिया सीओपीडीमध्ये उच्छवासाला होणारा अडथळा कमी करतात. तर श्वास आत घेण्यावर भर देणारी श्वासाची प्रक्रिया फुप्फुसात जाणाऱ्या शुद्ध हवेचे प्रमाण वाढवते. फुप्फुसात साठून राहिलेला कफ काढण्यासाठीही फिजिओथेरपिस्ट काही विशिष्ट तांत्रिक पद्धतींचा वापर करतात. यामध्ये पॉश्चरल ड्रेनेजसारख्या पद्धती किंवा एकपेला, फ्लटरसारखी उपकरणे यांचा वापर केला जातो. लागणारी धाप आणि खोकला कमी करण्यासाठी हा कफाचा निचरा आवश्यक असतो. यामुळे वारंवार होणारा फुप्फुसांचा संसर्गही कमी होतो.

एरोबिक व्यायामप्रकार

एरोबिक म्हणजे चालणे, पळणे, पोहणे, सायकल चालवणे इ. व्यायामप्रकार करून स्नायूंची क्षमता वाढवता येऊ शकते. हे व्यायाम सातत्याने केल्यास स्नायू ऑक्सिजन योग्य प्रकारे वापरू शकतात आणि म्हणून रक्तातील ऑक्सिजन ठराविक सुरक्षित पातळीच्यावर राखला जातो. यामुळे येणारा थकवा आणि धाप दोन्ही कमी होते व कार्यक्षमता वाढते. शरीरात होणाऱ्या या सकारात्मक बदलामुळे रुग्णाचे मानसिक स्वास्थ्य तसेच जीवनशैलीही सुधारते.

श्वसनाच्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सकस आहार, नियमित औषधोपचार आणि तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो शारीरिक व्यायाम आवश्यक आहे.

- डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे, कार्डिओव्हॅस्कुलर पल्मनरी फिजिओथेरपिस्ट

सीओपीडी आजार केवळ धूम्रपान करणाऱ्यालाच होईल असे नाही. त्याच्या सानिध्यात येणाऱ्या व्यक्तीनेही काळजी घ्यायला हवी. मोकळ्या आणि शुद्ध हवेत फिरणे, व्यायाम, प्राणायाम करणे गरजेचे आहे.

- डॉ. अविनाश इनामदार, हृदयरोग तज्ज्ञ