नवजात अर्भकांसाठी हवा नव्या प्रतिजैविकांचा डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Medical experts says Dose of new antibiotics needed for newborns

नवजात अर्भकांसाठी हवा नव्या प्रतिजैविकांचा डोस

नवी दिल्ली : नवजात अर्भकांसाठी तातडीने नवी अँटीबायोटिक औषधे विकसित करण्याची गरज असून सध्या याच वयोगटासमोर प्रतिजैविक प्रतिरोधाचे (अँटीबायोटिक रेझिस्टन्स) मोठे आव्हान निर्माण झाले असल्याचा इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.

मध्यंतरी जगभरात करण्यात आलेल्या पाहणीनुसार, दरवर्षी वीस लाखांपेक्षाही अधिक नवजात अर्भकांचा विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. सध्या या अर्भकांवरील उपचारासाठी ज्या प्रतिजैविक औषधांचा वापर करण्यात येतो, त्यांचा प्रभाव क्षीण झाल्याचे दिसून आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) यंदा डिसेंबर महिन्यामध्येच याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. सध्या पहिल्या आणि दुसऱ्या श्रेणीतील जी प्रतिजैविक औषधे आहेत त्यांना ५० ते ७० टक्के विषाणू हे दाद देत नसल्याचे आढळून आले आहे.

याबाबतच्या संशोधनामध्ये सूक्ष्मजीवविरोधी प्रतिरोध क्षेत्रातील अभ्यासक तसेच ग्लोबल अँटीबायोटिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट पार्टनरशिप (जीएआरडीपी) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील (एम्स) तज्ज्ञ सहभागी झाले होते.

आणखी बरेच काम बाकी

सध्या नवजात अर्भकांचे मृत्यू रोखण्यामध्ये वैद्यकीय पातळीवर संशोधनाला बरेच यश मिळाले असले तरीसुद्धा याआघाडीवर आपल्याला आणखी बरेच काम करणे बाकी असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

यामध्ये विविध प्रकारच्या विषाणूंपासून होणाऱ्या संसर्गाचा देखील समावेश आहे. सध्याच्या उच्च प्राधान्यक्रमामध्ये मुलांसाठी उपकारक आणि सुरक्षित ठरणाऱ्या प्रतिजैविकांची निर्मिती करणे खूप महत्त्वाचे असून गरजेनुसार ही औषधे आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्यावी लागतील, असे सेंट जॉर्ज युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधील माईक शार्लंड यांनी नमूद केले.

...मग प्रक्रिया वेगवान होणार

याच आघाडीवर वैश्विक एकमत झाल्यानंतर आपण अँटीबायोटिक औषधांचा विकासक्रम निश्चित करू शकतो त्यामुळे औषधांच्या निर्मितीची प्रक्रिया देखील वेगवान होऊ शकेल परिणामी सुक्ष्मजीवविरोधी प्रतिजैविकांवरील अवलंबित्व कमी होणार

असल्याचे जीएआरडीपीच्या कार्यकारी संचालक मॅनिका बालासेगाराम यांनी सांगितले. याबाबतीत वेगवेगळे संशोधन करण्यापेक्षा एकत्रित संशोधन केल्याने त्याचा कशापद्धतीने लाभ होऊ शकतो, हे देखील त्यांनी सविस्तरपणे स्पष्ट केले.

अडथळ्यांची शर्यत

गंभीर स्वरूपाच्या विषाणू संसर्गांचा विचार केला तर फार कमी अँटीबायोटिक्सच्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. साधारणपणे २००० पासूनचा कालखंड विचारात घेतला तर प्रौढांमधील वापरासाठी ४० प्रतिजैविकांना मान्यता देण्यात आली असून त्यात नवजात अर्भकांसाठीच्या चार प्रतिजैविकांचा समावेश आहे.

नैतिक नियम, लॉजिस्टिक संदर्भातील मुद्दे आणि नियामक यंत्रणांकडून मिळणाऱ्या मान्यता आदी अडथळ्यांमुळे याबाबतच्या वैद्यकीय संशोधनामध्ये अडथळे येत असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :doctornew bornhealth