मुलांसाठी ध्यान

निसर्ग हा मुलांचा जवळचा, सच्चा मित्र असतो. त्याच्या सहवासात ती रमतात, तणावरहित होतात. शाळांमध्ये मुलांना ध्यान म्हणून प्रार्थना म्हणायला सांगतात.
Meditation for children helps improve focus aware of body sensations
Meditation for children helps improve focus aware of body sensationsSAKAL

- मनोज पटवर्धन

ध्यानस्थ लेखमालेतून आपण मोठ्यांसाठी बऱ्याच ध्यानपद्धती पाहिल्या. यावेळी मुलांनी छानसं ध्यान कसं करावं ते बघूया. ध्यान म्हणजे डोळे मिटून अजिबात हालचाल न करता, शांतपणे, बराच वेळ बसावं अशी अपेक्षा असते. मोठ्यांनाही हे अवघड जातं, तिथे मुलांकडून ही अपेक्षा केली तर ध्यान ही सुंदर प्रक्रिया अवघड, रुक्ष आणि तांत्रिक होईल.

अगदी छोट्या, सोप्या तंत्रांतून मुलांना निसर्गाच्या माध्यमातून ध्यानाचे अनेक प्रकार शिकवता येतील. निसर्ग हा मुलांचा जवळचा, सच्चा मित्र असतो. त्याच्या सहवासात ती रमतात, तणावरहित होतात. शाळांमध्ये मुलांना ध्यान म्हणून प्रार्थना म्हणायला सांगतात. पारंपरिक प्रार्थनेऐवजी एखादी निसर्गप्रार्थना सांगितली, तर मुलं डोळ्यासमोर निसर्गाचं लोभस रूप साकार करत आतून शांत होत जातील.

उदाहरण म्हणून खालील प्रार्थना मुलांना डोळे मिटून सोप्या चालीत म्हणायला सांगावी.

आम्ही आकाश बघू... आम्ही झाडं बघू.... आम्ही पक्षी बघू....आम्ही पाऊस बघू... (ध्रुवपद)

हे रंग हे गंध हे स्पर्श सारे.... ज्यानी दिले आम्ही त्याला स्मरू....

तो देतो अन्... देतच राहतो... तो देतो अन्... देतच राहतो... देणारा तो... अमुचा गुरू...

हे नाही ते नाही म्हणणार नाही... दुःखावरही प्रेमच करू...

मुलांना निसर्गासोबत एकटं बसायला शिकवलं तर शांतता, एकांत, स्वतःचं आकलन, स्वतःचं तटस्थ निरीक्षण अशा अवघड गोष्टी ती आपोआप करायला लागतात. त्याचा सकारात्मक, सर्जनशील परिणाम त्यांच्या अभिव्यक्तीतूनही जाणवतो.

जे. कृष्णमूर्तींच्या शाळेत असंच वेगळ्या प्रकारचं ध्यानशिक्षण देतात. या मुलांनी शाळेच्या मासिकात लिहिलेल्या कवितांमधून त्यांचं निसर्गाशी एकरूपत्व जाणवतं -

वाऱ्याचा आवाज म्हणजे जणू निसर्गाचा श्वासोच्छ्वास...

पक्ष्यांचं चिवचिवणं, पावसाच्या थेंबाचे आवाज म्हणजे जणू त्यांनी आपल्याबरोबर म्हटलेलं गाणं...

गुलाबाची फुलं, सुंदर फुलपाखरं, डोलणारी झाडं, सुंदर पक्षी यांची वर्णनं...

झाडं, फुलं, पाणी, खडक, पक्ष्यांशी मनातल्या मनात बोलायचं...

आपणही मुलांना निसर्गध्यान शिकवावं. शांतता अनुभवणं हीसुद्धा एक कलाच आहे. त्याचं शिक्षण ध्यानातून मिळतं. निसर्गाविषयी आकर्षण वाढतं. फुलांचा सुगंध, गारेगार वाऱ्याचा स्पर्श यातून मुलांना निसर्गाशी असलेलं नातं लक्षात आणून देता येईल. या विश्वातलं आपलं स्थान, पंचज्ञानेंद्रियांच्या आधारे निसर्गाचं ज्ञान त्यांना होत जाईल.

छोट्याछोट्या ध्यानाच्या अनुभवांतून त्यांना एकटेपणा आणि एकांत यातला फरक कळेल. स्वतःच्या भावना, विचार यांना सामोरं जाण्याचं शिक्षण मिळेल. मुलांसाठी एकटंच फिरायला जाणं, झाडाखाली नुसतं बसणं हेही ध्यान आहे, शांततेचं शिक्षण आहे.

नाहीतर मग नुसतंच सतत हातात पुस्तक धरून बसणं, मित्रांसोबत अर्थहीन बडबड करत राहणं अशा सवयी लागतात. आपले विचार कसे फुलपाखरांसारखे एकमेकांचा पाठलाग करतायत, एकमेकांशी खेळतायत ते समजेल. अशा पद्धतीनं शिकवलं तर एरवी अवघड वाटणारं ध्यान खूप सहजसोपं, सुंदर वाटेल. मुलांना ध्यान शिकवताना स्वतःही नक्कीच करूया!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com