

'स्वीकार' ही हार नाही, तर बदलाची पहिली पायरी! मानसिक संघर्षातून शारीरिक व्याधींकडे होणारा प्रवास रोखण्यासाठी 'साक्षीभाव' आवश्यक
sakal
देवयानी एम., लाइफस्टाइल कोच
मध्यंतरी माझ्याकडे समुपदेशनासाठी एक पन्नाशीतले गृहस्थ आले होते. ‘‘खूप दिवसांपासून पोटाचा त्रास होतोय,’’ इथून आमच्या संवादाला सुरुवात झाली. अनेक औषधोपचार करूनही त्यांना गुण येत नव्हता. संवादाचे पापुद्रे मी हळूहळू उलगडत गेले आणि मूळ कारण समोर आलं. काही वर्षांपूर्वी त्यांची नोकरी गेली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नीने घराची जबाबदारी स्वीकारली आणि त्या नोकरी करू लागल्या. मुलगीही स्वतःच्या पायावर उभी होती; पण ‘माझी नोकरी गेली आणि आता मी घरात बसून आहे,’ हे टोचणारं वास्तव ते स्वीकारूच शकले नाहीत. या नकारातून त्यांचा आत्मविश्वास खचत गेला आणि त्या मानसिक संघर्षाचं रूपांतर पुढे पोटाच्या विकारात झालं. खरंतर, या गृहस्थांचा त्रास शारीरिक कमी आणि मानसिक जास्त होता. आपण जेव्हा एखादं बदललेलं सत्य नाकारतो, तेव्हा आपलं मन त्या सत्याशी सतत युद्ध करत असतं. या युद्धाचा ताण मग शरीरावर दिसू लागतो. इथेच प्रवेश होतो एका महत्त्वाच्या शब्दाचा, तो म्हणजे ‘स्वीकार’ (Acceptance). अनेकांना वाटतं, विशेषतः तरुणांना, की एखादी गोष्ट स्वीकारणं म्हणजे हार मानणं, निष्क्रिय होणं किंवा परिस्थितीसमोर गुडघे टेकणं; पण खरं सांगायचं, तर स्वीकार ही जगातली सर्वांत मोठी ‘सक्रिय’ (Active) प्रक्रिया आहे. स्वीकार हा योगशास्त्रातील आणि आधुनिक मानसशास्त्रातील सर्वांत मूलभूत; पण सर्वांत कमी समजला जाणारा विषय आहे. स्वीकार म्हणजे वास्तवाला जसं आहे तसं स्पष्टपणे पाहण्याची क्षमता, त्यावर त्वरित प्रतिक्रिया न देता समजून घेण्याची मानसिक परिपक्वता.