World AIDS Day : एड्स विषयी तुम्हालाही नाहीत ना हे गैरसमज? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World AIDS Day

World AIDS Day : एड्स विषयी तुम्हालाही नाहीत ना हे गैरसमज?

Miss Understandings About HIV AIDS : जागतिक पातळीवर मोठ्याप्रमाणात भेडसावणारी समस्या म्हणून HIV AIDS कडे बघितले जात आहे. जागतिक आरोग्य संघटने(WHO) च्या मते या रोगामुळे आतापर्यंत 3.5 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रोगाची विषाणू बाधा झालेल्या रुग्णांपैकी 70% लोक एकट्या आफ्रिका खंडात आहे.

हा रोग 1980च्या दशकात पसरायला सुरुवात झाली. HIVची लागण कशी होते, या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींबरोबर राहिल्याने काही धोका उद्भवतो का, या सगळ्या प्रश्नांवर अनेक माध्यमांद्वारे जनजागृती पसरत असली तरीसुद्धा आजही अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींना समाजात खतपाणी मिळतंय.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते चारपैकी एका जणाला, म्हणजे तब्बल 94 लाख लोकांना या रोगाची लागण झाल्याची माहिती नसते. त्यामुळे संसर्गाचा धोका जास्त आहे.

जाणून घेऊया काय आहेत ते गैरसमज

HIV+ लोकांच्या आसपास वावरल्याने AIDS होऊ शकतो

या गैरसमजुतीमुळे HIV बाधित लोकांशी समाजात खूप भेदभाव केला जातो. याविषयी वेळोवेळी जागरूकता पसरवून सुद्धा अजूनही 20% लोकांना असं वाटतं की HIV बाधितांच्या स्पर्शाने किंवा त्यांच्या लाळेतून पसरतो.

खरं काय?

पण खरच हा रोग स्पर्श, अश्रू, घाम, लाळ किंवा मूत्रावाटे पसरत नाही.

या कशामुळेच एड्स होत नाही

 • एकाच हवेत श्वास घेणं

 • हात मिळवणं, मिठी किंवा चुंबन घेणं

 • एकाच भांड्यात खाणं-पिणं

 • पाण्याचा समान स्रोत वापरणं (उदा. अंघोळीचं पाणी, शॉवर)

 • खासगी वस्तू शेअर करणं

 • जिममध्ये व्यायामाची समान साधनं वापरणं

 • टॉयलेट सीटला, दरवाजाच्या कडीला स्पर्श करणं

कशाने होतो?

HIV बाधित व्यक्तीचं रक्त, वीर्य, योनीतील स्राव किंवा अंगावरचं दूध निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेलं तरच हा रोग पसरण्याची शक्यता असते.

अघोरी प्रकारांमुळे HIV बरा होतो'

पर्यायी औषधं, सेक्स केल्यानंतर अंघोळ करणं, किंवा कुमारिका मुलीबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करणं या सगळ्या गोष्टींमुळे हा रोग बरा होत नाही.

अशा वेळी धार्मिक विधी आणि प्रार्थना केल्यामुळे या कठीण प्रसंगात मानसिक बळ नक्कीच मिळू शकतं. मात्र असं केल्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या काहीच दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

डासांमुळे HIV पसरतो

रक्तामुळे HIV पसरतो हे जरी खरं असलं तरी अनेक संशोधनांअंती हे सिद्ध झालं आहे की रक्तपिपासू कीटकांद्वारे(उदा. डास) हा रोग पसरत नाही. त्याची दोन कारणं आहेत

 1. जेव्हा कीटक चावतात तेव्हा त्यांनी आधी चावा घेतलेल्या व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीत सोडत नाहीत.

 2. HIVचा विषाणू त्यांच्या शरीरात अल्पकाळ टिकतो.

त्यामुळे एखाद्या परिसरात मोठ्या प्रमाणात डास असतील आणि HIVचा प्रादुर्भाव असेल तरी या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाही.

ओरल सेक्सने HIV होतो?

सेक्सच्या इतर प्रकारांपेक्षा ओरल सेक्स म्हणजेच मुखमैथून बऱ्यापैकी सुरक्षित आहे, हे खरं आहे. 10,000 पैकी फक्त 4 केसेसमध्येच AIDS ओरल सेक्सद्वारे पसरतो, असं लक्षात आलं आहे.

कंडोममुळे HIVचा संसर्ग गुप्तरोगांचा संसर्गही होत नाही.

मात्र ज्या पुरुषाला किंवा स्त्रीला HIVची लागण झाली आहे, त्या पुरुषाबरोबर किंवा स्त्रीबरोबर ओरल सेक्स केला तर HIVची लागण होण्याची शक्याता नाकारता येत नाही. म्हणूनच ओरल सेक्सच्या वेळीही कंडोम वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

कंडोम वापरल्यास HIV ची लागण होत नाही

सेक्स करताना कंडोम फाटला, निघाला किंवा लीक झाला तर HIVची लागण होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे AIDS बाबत जे जनजागृती अभियान राबवले जातात, त्यात लॅटेक्स शीथ म्हणजेच जाड कंडोम घालण्याचा सल्ला तर देतात.

मात्र त्याचबरोबर HIVची चाचणी करण्याचाही सल्ला देतात. जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ताबडतोब उपचार घेण्याचा सल्ला देतात.

लक्षणं नाहीत, म्हणजे HIV नाही

 • एखाद्या व्यक्तीला अगदी 10-15 वर्षं या रोगाची लक्षणं जाणवत नाहीत. त्यांना ताप, डोकेदुखी, पुरळ, घसा खवखवणं ही साधारणपणे फ्लूची लक्षणं आढळतात.

 • चारपैकी एका व्यक्तीला HIVची लागण झाल्याची कल्पना नसते.

 • या रोगामुळे जसजशी प्रतिकारक शक्ती कमी होते तसतशी लिंफ नोड सुजणे, वजन घटणे, ताप, डायरिया आणि खोकला, अशी इतर लक्षणंही दिसायला सुरुवात होते.

 • जर उपचार घेतले नाहीत तर इतर गंभीर आजार व्हायला सुरुवात होते. त्यात क्षयरोग, मेंदूज्वर, जीवाणूसंसर्ग किंवा कॅन्सरचा धोका संभवतो.

HIV बाधित लोक लवकर दगावतात

ज्या लोकांना HIVची लागण झाली आहे, जे उपचार घेत आहेत, ते चांगलं आयुष्य जगत आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या मते 47% लोकांच्या रक्तात HIVचं प्रमाण इतकं कमी आहे की रक्तचाचण्यांमध्ये हे विषाणू दिसतही नाहीत. ज्या लोकांमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे, त्या लोकांकडून हे विषाणू दुसऱ्यांपर्यंत पसरतही नाहीत.मात्र त्यांनी जर उपचार घेणं थांबवलं तर HIV पुन्हा रक्तात सापडू शकतो.

आई HIV बाधित असेल तर मुलांनाही होतोच

हे अगदीच सत्य नाही. ज्या मातांमध्ये हा विषाणू अगदी नगण्य प्रमाणात असतो, त्या माता निरोगी बालकाला जन्म देऊ शकतात.

टॅग्स :HIV