संतती योग

संतती म्हणजे सातत्य, निरंतरत्व, तर संतान म्हणजे धागा, सातत्य टिकविणारा तंतू. आपला वारसा पुढे चालावा म्हणजेच पुढच्या पिढीच्या रूपात आपले अस्तित्व कायम राहावे ही प्रेरणा.
mother born baby cycle of nature
mother born baby cycle of naturesakal

संतती म्हणजे सातत्य, निरंतरत्व, तर संतान म्हणजे धागा, सातत्य टिकविणारा तंतू. आपला वारसा पुढे चालावा म्हणजेच पुढच्या पिढीच्या रूपात आपले अस्तित्व कायम राहावे ही प्रेरणा, निसर्गात टिकून राहण्याची ऊर्मी प्रत्येक सजीवात असते आणि म्हणूनच निसर्गाचे चक्र सुरू राहते. किडा-कीटकांपासून वनस्पती, प्राणी, मनुष्य सर्वांनाच निसर्गतःच पुनरुत्पादनाची ओढ असते. म्हणूनच संतानयोग शतकानुशतकांपासून चालत राहतो.

कंसाने आकाशवाणी ऐकली की देवकीचा आठवा पुत्र तुझा काळ ठरणार आहे. एकूण काय तर देवकीला आठ पुत्र होतील असा संतानयोग आधीच माहिती होता. पूर्वीच्या काळी ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ वगैरे आशीर्वाद दिले जात असत. अर्थात श्रीकृष्णांसारखा लोककल्याणकारी पुत्र किंवा कन्या जन्माला आली तर संतानयोग सिद्ध आला असे म्हणायचे.

शेवटी योग शब्द आल्याने असे लक्षात येते की, बऱ्याच गोष्टी आपल्या हातात असल्या तरी ज्याच्या बरोबर संयोग झाल्यामुळे किंवा ज्याच्याशिवाय कार्य सफल होणार नाही अशी एक कुठली तरी बाजू परमेश्‍वरी सत्तेवर अवलंबून असते. ध्यानयोग म्हटले तर मांडी घालून बसणे, डोळे मिटून विशिष्ट मुद्रेत बसणे वगैरे सर्व आपल्या हातात असले तरी ध्यान लागेल की नाही हे निश्‍चित नसते.

कारण ध्यान लागण्यासाठी म्हणजेच ध्यानाचा योग येण्यासाठी अदृश्‍य शक्तीचाही हात आवश्‍यक असतो. संतानयोगाचेही असेच आहे. सर्व ठीक असले तरीसुद्धा परमेश्‍वरी कृपा असल्याशिवाय हा योग सफल होऊ शकत नाही. परमेश्‍वरी आशीर्वाद या संकल्पनेत एकूणच निसर्गशक्ती, बाह्य वातावरण किंवा पूर्वजन्मातील कर्म या गोष्टींचा समावेश असतो.

परमेश्‍वर म्हणजे कोणी तरी एक मनुष्य व तो कृपा करेल असे नसते तर ती एक संकल्पना असते आणि परमेश्‍वराची कृपा असली तरच संतानयोग सिद्ध होतो. त्यामुळेच ‘देवकीचा आठवा पुत्र तुझा काळ ठरणार’ अशा तऱ्हेचे भाकीत करणे याला महत्त्व येते. ही क्रिया मनुष्याच्या हातात असती तर असे भाकीत करण्याला फारसे महत्त्व आले नसते.

संतानयोग साधण्यासाठी म्हणजेच संपन्न, निरोगी अपत्याचा जन्म होण्यासाठी आयुर्वेदाने काही आवश्‍यक गोष्टी सांगितल्या आहेत.

शुक्रशोणितसंसर्गमन्तर्गर्भाशयगतं जीवोऽरक्रामति सत्त्वसंप्रयोगात्‌ -

शुद्ध आणि निरोगी शुक्राणू व बीजांड यांचा जेव्हा गर्भाशयात संयोग होतो आणि त्याचवेळी मनयुक्त जीवही गर्भात प्रवेश करतो तेव्हा गर्भधारणा होऊ शकते. या ठिकाणी ‘जीव’, तोही ‘मनाने युक्त असणारा जीव’ महत्त्वाचा असतो. गर्भधारणा होण्यासाठी केवळ स्त्रीबीज व पुरुषबीजाचा संयोग पुरेसा नसतो तर त्याला जिवाची जोड मिळणे आवश्‍यक असते. म्हणून आयुर्वेदात ‘गर्भाधान संस्कार’ सांगितला आहे. या संपूर्ण संस्कारात मनाच्या सहभागाला फार महत्त्व दिले आहे.

इच्छेतां यादृशं पुत्रं तद्रूपचरितांश्र्च तौ। चिन्तयेतां जनपदांस्तदाचारपरिच्छदौ॥...अष्टांगसंग्रह शरीरस्थान

स्त्री-पुरुषांचे मन ज्या प्रकारच्या भावांनी युक्त असेल त्याचा मोठा प्रभाव गर्भधारणेवर असतो. गर्भधारणेच्या आधी स्त्री-पुरुषाची मानसिक स्थिती, गर्भधारणेच्या वेळी मनात येणारे विचार यांचा गर्भधारणेवर मोठा परिणाम होत असतो म्हणून स्त्री-पुरुषांनी प्रसन्न मनाने, प्रसन्न वातावरणात शुद्ध स्थानऊर्जा असणाऱ्या ठिकाणी गर्भाधानास प्रवृत्त व्हावे असे आयुर्वेदात सुचविलेले आहे.

सात्म्यरसोपयोगात्‌ सम्यक्‌ उपचारैश्र्चोपर्यमाणः अरोगः अभिवर्धते

गर्भधारणा झाली की गर्भवतीने प्रकृतीला अनुकूल आहाराचे सेवन करण्याने आणि गर्भिणी परिचर्येचे व्यवस्थित पालन करण्याने गर्भ निरोगी राहतो आणि गर्भाशयात व्यवस्थित वाढू लागतो. गर्भधारणा झाली की स्त्रीची खरी जबाबदारी सुरू होते. गर्भवती स्त्री जसे वागेल, ज्या प्रकारचे खाणे-पिणे करेल, जे ऐकेल, जे विचार करेल त्या सर्व गोष्टींचा गर्भावर प्रभाव असतो आणि म्हणूनच संतानयोग व्यवस्थित सिद्ध होण्यासाठी गर्भावस्था महत्त्वाची असते.

संतानयोग हा खरोखर ‘योग’च असतो. मनात आले, स्त्रीबीज-पुरुषबीजाचा संयोग झाला की लगेच त्यातून संतानोत्पत्ती होईल असे नाही. किंबहुना हा योग जितका चांगल्या प्रकारे जुळून येईल, गर्भधारणा होण्यापूर्वी जेवढी चांगली पूर्वतयारी केलेली असेल तितकी गर्भधारणा होणे सोपे असते आणि संपन्न, निरोगी संतती जन्माला येऊ शकते.

हा योग जुळून यावा म्हणून, गर्भधारणेला अनुकूल वातावरण तयार व्हावे म्हणून आयुर्वेदात अनेक उपाय दिलेले आहेत. त्यातील काही महत्त्वाचे याप्रमाणे सांगता येतील.

शरीरशुद्धी - स्त्रीबीज व पुरुषबीज निरोगी हवे असतील तर त्यासाठी मूळ स्त्री-पुरुष निरोगी हवेत. आरोग्यासाठी आणि स्त्रीबीज, पुरुषबीजाची संपन्नता वाढविण्यासाठीसुद्धा स्त्री-पुरुषांचे शरीर शुद्ध असणे महत्त्वाचे असते. याशिवाय शरीरशुद्धीमुळे स्त्री-पुरुषांची इंद्रिये प्रसन्न व्हायला मदत मिळते, त्यांच्यातील आकर्षण वाढायला मदत मिळते आणि या सर्वांचा गर्भधारणा होण्यास निश्‍चितच उपयोग होतो.

रसायन सेवन - स्त्रीबीज व पुरुषबीज गर्भधारणेसाठी सक्षम बनण्यासाठी शुक्रधातू संपन्न असणे आवश्‍यक असते आणि त्यासाठी रसायने उत्तम असतात. शरीरशुद्धी झालेली असली की रसायने अधिकच प्रभावीपणे काम करू शकतात.

प्रकृती व्यवसाय वगैरे गोष्टी लक्षात घेऊन रसायन गुणांनी युक्त औषधे, कल्प, प्राश वगैरेंची योजना करता येते. सर्वसाधारणपणे पुरुषासाठी ‘चैतन्य कल्प’, ‘आत्मप्राश’सारखी रसायने, गोक्षुरादी चूर्ण वगैरे उत्तम असतात; तर स्त्री शतावरी कल्प, ‘सॅनरोझ’सारखे रसायन, ‘पित्तशांती गोळ्या’, ‘प्रशांत चूर्ण’ वगैरेंचे सेवन करू शकते. सुवर्णवर्ख, केशर युक्त पंचामृत, भिजविलेले बदाम नियमित सेवन करणेही उत्तम असते.

संगीत - निरोगी बीजांड तयार व्हावे, हॉर्मोन्सचे संतुलन टिकावे, विशेषतः स्त्री संतुलन कायम राहावे यासाठी स्त्रीने काही विशेष संगीतरचना ऐकाव्यात असे शास्त्रात सांगितले आहे. वेदमंत्र, वीणावादन, विशिष्ट रागात बद्ध केलेल्या रचना यामुळे स्त्रीसंतुलन साध्य करता आले की त्याचीही गर्भधारणेला मदत मिळते.

मानसिक प्रसन्नता - सौमनस्यं गर्भधारणाम्‌ म्हणजे गर्भधारणा होण्यासाठी मन स्वस्थ असणे, मन प्रसन्न असणे आवश्‍यक असते, असे सांगितले आहे. स्त्री-पुरुषांमध्ये तर प्रेमभाव असावाच, परंतु एकंदर संपूर्ण कुटुंबामध्ये आपुलकीची भावना असली तर ती गर्भधारणेस पूरक ठरते.

अशा प्रकारे खऱ्या अर्थाने संतान योगाची परंपरा पुढे न्यायची असेल, म्हणजे आपल्यातील गुण पुढच्या पिढीत जावेत, दोष मात्र मागे राहावेत अशी इच्छा असेल तर पूर्वनियोजित गर्भधारणाच हवी. आयुर्वेदीय गर्भसंस्कारांच्या मदतीने हे प्रत्यक्षात आणणे सहज शक्य आहे.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com