
Corona Update : कोरोनाचे संकट उभे, लस मात्र गायब
नागपूर : गेल्या दोन दिवसांत शहरात ७२ नवे कोरानाबाधित आढळले असून सतत रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन सावध झाले असले तरी लसीकरण मात्र बंदच आहे. कोरोनातून सावरल्यानंतर नागरिकांनीही लसीकरणाकडे पाठ फिरवल्याने राज्य सरकारनेही लस पुरवठा बंद केला. आता कोरोनाचे संकट पुढे उभे आहे. परंतु लसीचा साठाच नसल्याने पुन्हा लसीकरण केंद्र कसे सुरू करावे, असा पेच महापालिकेपुढे आहे.
बाधितांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने नुकताच चाचणी केंद्र सुरू केले. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी बाधितांच्या संख्येमुळे तातडीची आढावा बैठक घेऊन चाचण्यांसोबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
परंतु आता कोरोना वाढत असल्याने केवळ पहिला डोस घेतलेल्यांनी दुसऱ्या डोससाठी तर दुसरा डोस घेतलेल्यांनी बुस्टर डोससाठी विचारणा सुरू केली. परंतु महापालिकेकडे लसच नसल्याने सर्वच लसीकरण केंद्र बंद पडले आहेत.
राज्य सरकारने लसीचा पुरवठा केला नाही. कोरोनाचे संकट पुन्हा येणार नाही, या आविर्भावात नागरिकांनी लस घेण्याकडे पाठ फिरवली. परिणमी राज्य सरकारनेही पुरवठा बंद केला. त्यामुळे आता लसच नसल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. आतापर्यंत शहरातील १०० टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
परंतु अजूनही १८.४९ टक्के नागरिकांनी दुसरा तर ७५.४३ टक्के नागरिकांनी बुस्टर डोस घेतला नाही. आता कोरोनाचे संकट वाढत असल्याने दुसरा व बूस्टर डोस न घेतलेल्या नागरिकांना लसीची आठवण झाली. खाजगी रुग्णालयातही लस उपलब्ध नसल्याने नागरिकांची निराशा होत आहे.
लसीकरणाबाबत अनिश्चितता
दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यात महापालिकेने लसीची मागणी केली. परंतु राज्य सरकारकडे लस उपलब्ध नसल्याने लसीकरण नेमके केव्हा सुरू होईल, याबाबत काहीच स्पष्ट नसल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले.
आतापर्यंतचे लसीकरण
पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ः २१ लाख ९४ हजार ७४०
दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ः १७ लाख ८४ हजार ३६७
बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या ः ४ लाख १४ हजार ७५५
दुसऱ्या डोसपासून वंचित ः ४ लाख १० हजार ३७३
बूस्टर डोसपासून वंचित ः १३ लाख ६९ हजार ६१२
गेल्या तीन दिवसांत कोरोना बाधितांची संख्या तीन अंकावर पोहोचली असून शुक्रवारी जिल्ह्यात ८४ नवे बाधित आढळले. यात शहरात ५४ व ग्रामीणमध्येही २८ बाधितांची नोंद झाली. मागील वर्षी जुलैमध्ये बाधितांच्या संख्येत मोठी घट झाली होती.
त्यानंतर आता आठ महिन्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आठ महिने बाधितांचा आकडा दुर्लक्षित होता. किंबहुना प्रशासनाने दखल घ्यावी, अशी रुग्णसंख्या नव्हती. परंतु गेल्या तीन दिवसांतील बाधितांच्या रोज वाढणाऱ्या संख्येने प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यात ८४ नवे बाधित आढळले.
यात ग्रामीणमधील २८ तर शहरातील ५४ जण आहेत. बुधवारी जिल्ह्यात ३३ व गुरुवारी ६३ तर आज ८४ बाधित आढळल्याने प्रशासनाची चिंताही वाढली आहे. दरम्यान ५३९ चाचण्या झाल्या. शुक्रवारी केवळ तीन बाधितांनी कोरोनावर मात केली. एकूण बाधितांची संख्या ५ लाख ८७ हजार ८२६ झाली असून एकूण चाचण्यांची संख्या ३८ लाख ४१ हजार ४१२ पर्यंत पोहोचली.
कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे महापालिकेने वैद्यकीय सेवेची पूर्ण तयार केली आहे. काही रुग्णालयात मॉक ड्रिल पण करण्यात आली. ऑक्सिजनही आहे. परंतु लसी नाहीत. आरोग्य उपसंचालकांकडे लसीची मागणी नोंदविण्यात आली आहे.
- राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.