esakal | धक्कादायक सत्य! दुसऱ्या लाटेत तज्ज्ञांचा इशारा; अचानक होतेय ऑक्सिजन पातळी कमी
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक सत्य! दुसऱ्या लाटेत तज्ज्ञांचा इशारा; अचानक होतेय ऑक्सिजन पातळी  कमी

धक्कादायक सत्य! दुसऱ्या लाटेत तज्ज्ञांचा इशारा; अचानक होतेय ऑक्सिजन पातळी कमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : मध्यमवयीन कोरोना बाधित रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल अचानक घसरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णालयात दाखल होताना ९५ ते ९६ ऑक्सिजन पातळी असलेला रुग्णांची आठ ते दहा तासांनंतर ऑक्सिजन पातळी अचानक ८५ पर्यंत घसरत आहे. मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागे हेही एक प्रमुख कारण असल्याचे निरीक्षण कोरोना रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी ‘सकाळ’कडे नोंदवले. कोरोना विषाणूचे स्वरुप बदलल्याचा हा परिणाम असून जागतिक पातळीवर संशोधनानंतर त्याची कारणे समोर येतील. तोपर्यंत आलेल्या आव्हानाला उपलब्ध साधनांच्या आधारे तोंड देत रहावे लागणार आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजन लेव्हलबाबत इतकी अस्थिरता नव्हती. ऑक्सिजन ९५ वरून ८५ पर्यंत खाली यायचा, मात्र ते प्रमाण ज्येष्ठ रुग्णांमध्ये अधिक होते. दुसऱ्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांची प्रकृती स्थिर आहे, मात्र मध्यमवयीन म्हणजे ४५ ते ५० वयातील अनेक रुग्णांबाबत चिंता करण्यासारखी लक्षणे दिसू लागली आहेत. त्यांचा आक्सिजन अचानक खाली येतोय आणि त्यांना जनरल वॉर्डमधून आयसीयूमध्ये न्यावे लागत आहे.

येथील वाळवेकर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. रवींद्र वाळवेकर म्हणाले, ‘‘मी गेले महिनाभर काही धक्कादायक गोष्टी पाहतो आहे. दुसऱ्या लाटेतील ज्येष्ठ नागरिकांची प्रकृती लवकर स्थिर होत आहे. तरुणांना मात्र त्यासाठी झगडावे लागत आहे. ४५ ते ५० वयोगटातील रुग्णांना चिंता वाटावी, असे चित्र आहे. ते रुग्णालयात दाखल होताना ९५ ऑक्सिजन असेल तर ते अचानक ८६ आणि ८५ वर येत आहे. मी याबाबत मेडिसीनच्या तज्ज्ञांशी लोकांशी बोललो. त्यांच्या मतानुसार, हा विषाणूतील मोठा बदल आहे. त्यामुळेच ‘क्लिनिकल पिक्चर’ वेगळे येत आहे. यावेळी रुग्णांचा अंदाज बांधणे कठीण होते आहे. आता आपण सांगतो रुग्ण स्टेबल आहे, पण काही तासांत आयसीयूत दाखल करावे लागत आहे. त्यामुळे नातेवाईकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत.’’

पालकमंत्र्यांशी चर्चा

भगवान महावीर कोविड सेंटरचे मुख्य संयोजक सुरेश पाटील म्हणाले, ‘‘महावीर कोविड सेंटर चालवताना मी या विषयावर अनेक डॉक्टरांशी चर्चा केली. त्यातून अचानक ऑक्सिजन कमी होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर तातडीने संशोधन होण्याची गरज आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कानावर मी ही गोष्ट घातली आहे. तरुण रुग्णांना या परिस्थितीचा मोठा फटका बसतो आहे. याबाबत डॉक्टरही थोडे चिंतेत आहेत, हे आव्हान मोठे आहे.’’

आयुर्वेदिक उपचाराची मदत देण्याबाबत चर्चा

डॉ. रवींद्र वाळवेकर यांनी या स्थितीत आयुर्वेदचीही जोड घ्यायला हरकत नाही, असे मत मांडले. त्यावर डॉ. मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, ‘‘मी जवळपास ९९९ लोकांवर उपचार करत आहे. त्यांच्यावर चांगला परिणाम दिसतो आहे. आयुर्वेदाचा फायदा दिसतो आहे. रुग्णांनी नियमित उपचारासोबत आयुर्वेदिक उपचाराची मदत घ्यावी. रुग्ण, नियमित डॉक्टर आणि आयुर्वेदिक डॉक्टर यांच्या संवादातून हे शक्य आहे. त्याला सरकारी मोहोर लागली तर बरे होईल, मात्र त्यात वेळ जाईल. त्यापेक्षा आधी रिझल्ट दाखवू आणि मग तशी अपेक्षा करू.’’

ऑक्सिजन मागणी वाढली

जिल्ह्यात दररोज १,३०० रुग्णांची भर पडते आहे. हा आकडा स्थिरावला आहे, मात्र अचानक ऑक्सिजन पातळी घसरल्याचे रुग्ण वाढत आहेत. हेच मोठे आव्हान बनले आहे. सध्या दररोज ४० टक्के ऑक्सिजनची आवश्‍यकता आहे. पुरवठा त्याहून कमी आहे. त्यामुळे काठावरची कसरत सुरू आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून ऑक्सिजन प्लॅंट लवकर सुरू होण्याबाबत तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.

Edited By- Archana Banage

loading image