
सामान्य - असामान्य : अदलाबदल
डॉ. संजय वाटवे
आजकाल पेशंटचा डॉक्टरांवर रोष झाला, हॉस्पिटलमध्ये आरडाओरडा केला, तोडफोड केली, डॉक्टरांवर केस टाकली, दमबाजी केली, काळं फासलं अशा केसेस बऱ्याचदा ऐकायला वाचायला मिळतात. डॉक्टर-पेशंट नातं संपुष्टात आल्याची ही लक्षणं आहेत. उपचाराच्या मर्यादा लक्षात न घेता डॉक्टरांकडून वाटेल त्या अपेक्षा केल्या जातात.
तसंच थप्पी फेकली म्हणजे डॉक्टरांना विकत घेतलं असा दृष्टिकोन असतो. शास्त्र असं नाही ना विकत मिळत? वैदकशास्त्र हे शास्त्रच आहे; पण गणिती शास्त्र नाही. प्रत्येक पेशंट वेगळा, त्याचा औषधांचा प्रतिसाद वेगळा.
पेशंटची, त्याच्या उपचारांची जबाबदारी डॉक्टरांवर असते; पण पेशंटला फक्त हक्कच असतात का? त्यांची काही कर्तव्यं आहेत की नाही? त्यांनी काही नियम पाळायला नकोत का? डॉक्टरांना एकदा केस दाखवली, त्यांनी औषध दिली की त्यांची जबाबदारी सुरू. त्यानंतर तो ‘तुमचा पेशंट.’ ही जोखीम डॉक्टरांच्या वर किती काळ?
मध्ये पेशंट गायब झाला तरी तो ‘तुमचा पेशंट!’ मध्येच डॉक्टर बदलले असले तर कसं कळणार? प्रिस्किप्शनची एक मुदत असते. त्यानंतरही डॉक्टरांना न विचारता गोळ्या चालू ठेवल्या, तर जबाबदारी कोणाची? डॉक्टरांच्या औषधाचे असलेले, नसलेले साईड इफेक्ट्स लोक अतिशय आवडीने चघळत असतात,
काही पेशंटनी तर ‘औषधांचे काही साईड इफेक्ट्स होतील का?’ असं विचारल्यानंतर ‘हे विचारण्यापूर्वी निश्चित बॅड इफेक्ट्स असलेला गुटखा तंबाखू तरी थुंकून ये,’ असं मी खडसावलं होतं. प्रिस्क्रिप्शन मुदतीबाहेर ठोकत राहिले आणि साईड इफेक्ट्स झाले तर जबाबदार कोण?
आपल्याकडे औषधविक्रीचे कडक नियम आहेत. औषध दिलं, की शिक्का मारावा लागतो. त्याच्यापुढे तेच प्रिस्क्रिप्शन वापरता येत नाही. ज्यांनी दिली, त्यांची लायसेन्ससुद्धा रद्द झाली आहेत. मागे मुंबईच्या एका पेशंटला इमर्जन्सी आली. त्याला लॉकडाऊनमध्ये येणं शक्य नव्हतं, म्हणून व्हॉट्सॲप केलं. मुंबईच्या केमिस्टनं ‘हे शेड्युल्ड ड्रग आहे. ओरिजनल प्रिस्क्रिप्शन लागेलस’ असं सांगितलं. माझा अत्यंत आदरार्थी उल्लेख केला. तो म्हणाला, ‘‘तुझा तो वाटवे स्वतः आला, तरच मी औषध देईन.’’ इतके कडक नियम असतानासुद्धा धक्कादायक अनुभव येतात.
गेल्या वर्षी माढा येथून एक फोन आला. तो माणूस म्हणाला, ‘‘माझी आई तुमची पेशंट आहे. तिला परत आणायचं आहे.’’ नावावरून काही संदर्भ लागेना. त्यामुळे त्याला परत फोन करायला सांगितला. माझ्या स्टाफनं सर्व रेकॉर्ड तपासलं असता केस आढळून आली नाही. परत त्याचा फोन आला. मागे तुम्हाला एकदा दाखवलं होतं. त्या गोळ्या छान निघाल्या म्हणून त्या गोळ्या आजतागायत देत आहोत.
मी म्हणालो, ‘‘माझा पेशंट म्हणता- मला कधी दाखवलं होतं? आणि प्रिस्क्रिप्शनची मुदत संपल्यावर गोळ्या मिळाल्या कशा? आणि कोणाच्या जबाबदारीवर चालू ठेवल्या?’’ त्याचं उत्तर ऐकून माझी मती गुंग झाली. तो म्हणाला, ‘‘१७, १८ वर्षांपूर्वी दाखवलं होतं. तेव्हा तिला आजार मान्य नव्हता. त्यामुळे ती ‘गोळ्या घेणार नाही’ म्हणाली.
मग ‘गोळ्या आणल्याच आहेत तर मी घेतो,’ असं वडील म्हणाले आणि त्यांनी त्या गोळ्या सुरू केल्या.’’ धक्का बसून मी विचारलं, ‘‘आईला दिलेल्या गोळ्या वडिलांनी का घेतल्या? त्यांना काय आजार होता? बाळंतकाढा असला तर? एकाचं औषध दुसरा कसा घेतो?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘आजार वगैरे काही नव्हता.
ते जरा तापट वगैरे होते. ते थोड्याच दिवसात शांत झाले. त्यांना गुण आलेला बघून मग आईनंही सुरू केल्या. या गोळ्या दोघंही १७, १८ वर्षं आनंदानं घेत आहेत.’’
लहान गावात नवरा-बायकोत मिळून एकच चष्मा असतो, हे ऐकून माहीत होते. प्रिस्क्रिप्शनही एकच असते हे नव्यानं कळलं.