

Parenting Expectations and Mental Health Understanding the Pressure to Become Perfect Parents in Modern Families
sakal
डॉ. मृदुला आपटे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट
सुनीताच्या मुलाचा- ‘अहान’चा जन्म झाला, त्याच सुमारास तिने नोकरी सोडली. तिचा नवरा मंदार माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात होता. दोघांनी आर्थिक नियोजन व्यवस्थित केलं होतं. सुनीताच्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं- ‘परिपूर्ण पालक’ व्हायचं!
अहान ४ वर्षांचा झाला, तसा त्याचा खोडकरपणा वाढू लागला आणि सुनीताची चिडचिडही हळूहळू वाढू लागली. अहान सारख्या काही तरी खोड्या करायचा, गंमत म्हणून आईला त्रास द्यायचा. त्यातच एकदा शाळेतून तक्रार आली की त्याने एका लहान मुलाला मारलं. सुनीताच्या सहनशीलतेचा हा जणू शेवटचा बिंदू होता. आपलं मूल परिपूर्ण असावं आणि आपण परिपूर्ण पालक असावं, यासाठी तिने घेतलेल्या सर्व मेहनतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, या विचाराने ती संतापली. पालक-शिक्षक बैठकीतून घरी परतल्यावर तिने अहानला खूप मारलं. मंदारने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही तिच्या मनातील संताप आणि निराशेची कल्पना होती.