

Labor Respect And Productivity
esakal
डॉ. बालाजी तांबे
भारतात आपण अनेक वर्षे प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या दिवसाचे महत्त्व कळण्यासाठी व आनंद घेण्यासाठी पाहिजे आरोग्य व समृद्धी. श्रमप्रतिष्ठेवर उभ्या असलेल्या जीवनात आरोग्य व समृद्धी मिळते. श्रमावरची निष्ठा कमी झाली की वाढतो आळस, भ्रष्टाचार, भीती व अंधविश्वास. हे सर्व नको असेल तर श्रमाचा झेंडा या प्रजासत्ताकदिनी पुन्हा गौरवाने उंच फडकवावा लागेल.
मशिन कसे जन्माला आले व मशिन म्हणजे काय? माणसाचे श्रम कमी करून भारी काम किंवा गुंतागुंतीचे अवघड काम पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणले जाणारे साधन म्हणजे मशिन. तसे पाहताना कडक जमीन उकरण्यासाठी फाळ जमिनीत घुसून जमीन नांगरली जाऊ शकते असे बैलाने ओढण्याचे नांगर माणसाने फार पूर्वी शोधून काढले. मातीचा वा वाळूचा ढीग इकडून तिकडे हलवायचा असेल तर एका माणसाने एक-एक घमेले भरून उचलून नेण्यापेक्षा एका मोठ्या फावड्यात वाळू भरून, त्या फावड्याचे हँडल एका माणसाने व त्या फावड्याला बांधलेली दोरी दुसऱ्या माणसाने ओढली तर तरफयंत्राचा वापर केल्यामुळे काम कमी श्रमात पूर्ण होते हेही माणसाला समजले. प्रत्येक काम सोपे व कमीत कमी श्रमात व्हावे यासाठी जगात सर्वांची धडपड सुरू असते. यातूनच एखादे अचाट काम करणारे मशिन तयार होते. लोखंडाचा जाड पत्रा वाकवून त्याला आकार द्यायचा झाल्यास नुसते श्रम पुरेसे नसतात तर त्यासाठी यंत्राची आवश्यकता लागते. जसजशा यंत्रांमध्ये सुधारणा होत गेल्या तसतशा अनेक आश्र्चर्यकारक गोष्टी तयार झाल्या.