
Pollution Effects on Skin : फुप्फुसानंतर प्रदूषणाचा त्वचेवर घाला!
मुंबई : मुंबई शहरभरात सध्या विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. हवेचा दर्जाही खालावला आहे. वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम फक्त श्वसनमार्गावर होत नसून नागरिकांमध्ये त्वचेचे आजारही बळावत असल्याच्या गंभीर प्रकाराकडे त्वचाविकारतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
त्वचेवर सर्वात जास्त परिणाम प्रदूषणामुळे होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गंभीर म्हणजे, काही दुर्मिळ परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरजही पडत आहे. मात्र, पुरेशी काळजी घेतल्यास असे विकार टाळता येऊ शकतात, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. सौरभ शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्वचेशी संबंधित आजाराचे आठवड्याला १२ ते १५ रुग्ण येत असून त्यांचा आकडा वाढला आहे. त्वचा कोरडी पडणे, खाज येणे, संवेदनशील त्वचा किंवा ॲलर्जी अशी लक्षणे नागरिकांमध्ये दिसत आहेत. त्यामध्ये प्रदूषण आणि वातावरणात झालेले बदल अशी प्रमुख कारणे नोंदली गेली आहेत.
हवेतील प्रदूषण, आर्द्रता आणि तापमान असे तिन्ही घटक त्वचेवर परिणाम करतात. तरुणांमध्ये सर्वाधिक लक्षणे आणि समस्या आढळत आहेत. प्रदूषणामुळे सर्वात जास्त परिणाम त्वचेवर होतो. खासकरून प्रदूषणातील कण चेहऱ्यावर जमा होत असल्याने चेहऱ्यावर पुळ्या किंवा सुरकुत्या दिसून येतात.
काही प्रकरणांमध्ये रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. प्रदूषणामुळे अनेकदा किरकोळ विषाणूजन्य संसर्ग होतो. परिणामी त्वचेच्या समस्या पुन्हा अधिक सक्रिय होतात. त्वचेसंबंधित आजाराबाबत खासगी क्लिनिकमध्येही सल्ला घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
अनेकांमध्ये त्वचेवर तेलकटपणा, पुरळ, कोरडेपणा, एक्झिमा आणि सोरायसिससारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. वायुप्रदूषणामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होऊन त्वचेचे नुकसान होऊ शकते. परिणामी त्वचेच्या अनेक समस्या वाढू शकतात. प्रदूषण, योग्य आहार न घेणे आणि धूम्रपानामुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण वाढू शकतो. त्याव्यतिरिक्त दीर्घकाळ बाहेरील प्रदूषणाच्या संपर्कात असलेल्यांना सुरकुत्यांसारख्या अकाली वृद्धत्वाची चिन्हेही लवकर दिसू शकतात.
अशी घ्या खबरदारी
उन्हात जाण्यापूर्वी चेहऱ्यावर स्कार्फ बांधा
फेशियल मास्क, डेड स्किन सेल हटवा, चेहऱ्यावर बर्फ लावा
कडुलिंबाची पाने चेहऱ्याला थंडावा देतात. त्याची पेस्ट लावता येते
बाहेरून आल्यावर चेहऱ्यावर व डोळ्यांवर स्वच्छ पाण्याचे हबकारे मारा
स्वच्छतेमुळे त्वचेवरील छिद्रे उघडी होतात. साफ होतात. प्रदूषण व जंतूंपासून त्वचेचे रक्षण होते
चेहरा धुताना स्क्रबरचाही वापर करा. त्यामुळे मृत त्वचा निघून जाते. शिवाय रक्ताभिसरण वाढायलाही मदत होते
सकाळी-संध्याकाळी अशी दोन वेळा चेहऱ्याची स्वच्छता महत्त्वाची चेहऱ्यावर मॉईश्चरायझर वापरा
प्रदूषणाचे दोन प्रकारे परिणाम होतात. एक त्वचेसह केसांवर आणि दुसरा फुप्फुसांवर. ज्येष्ठांमध्ये हातापायाची त्वचा कोरडी होते. जखमाही होतात. केसही कोरडे होतात. त्वचेवर सुरकुत्या पडतात. डोळ्यांच्या आणि तोंडाच्या आजूबाजूला ॲलर्जी होते. थंडी नसतानाही ओठ कोरडे होतात. उत्तम त्वचेसाठी त्वचेचे हायड्रेशन राखणे गरजेचे आहे. त्वचेसाठी सनस्क्रीन खूप जास्त महत्त्वाचे आहे. केस चांगले धुऊन कंडिशनर वापरलेच पाहिजे.
- डॉ. सोमा सरकार, त्वचारोगतज्ज्ञ
आधीपासून त्वचेची समस्या असलेल्यांवर प्रदूषणामुळे गंभीर परिणाम होतात. प्रदूषण जास्त वाढल्याने त्वचाविकार असलेल्यांनी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. त्यांनी जास्तीत जास्त मॉईश्चरायझर वापरायला हवे. डाएटही पाळावे. ए, सी आणि ई जीवनसत्त्वाचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. अनेक भाज्या आणि माश्यांमध्ये जीवनसत्त्वे मिळतात. म्हणजे खाण्यात काही बदल करावे. सोबतच पाण्याचे प्रमाण चांगले असावे.
- डॉ. स्वागता तांबे, त्वचारोगतज्ज्ञ, राजावाडी रुग्णालय