प्रथिनांची ताकद

प्रथिन हे एक आवश्यक मॅक्रोन्युट्रियंट असून ते आपल्या समतोल आहाराचा आधारस्तंभ आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
Proteins
Proteinssakal

- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग

प्रथिन हे एक आवश्यक मॅक्रोन्युट्रियंट असून ते आपल्या समतोल आहाराचा आधारस्तंभ आहे असे म्हणण्यास हरकत नाही. शरीराची वाढ, ताकद व एकूण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व वयोगटातील भारतीयांना प्रथिने अपरिहार्य का आहेत व आपल्या पारंपरिक पदार्थांमधून प्रथिने मिळवण्यासाठी काय वेगळे पर्याय निघू शकतात ते पाहू.

शिशु व बाल्यावस्था

शिशु व बाल्यावस्था या शारीरिक व मानसिक वाढीच्या सुरवातीच्या काळात प्रथिने ही मूलभूत गरज आहे. मातेच्या दूधाला नेहमी ‘द्रव सोन्या’ची उपमा दिली जाते आणि हे शिशुंसाठी उत्तम प्रतीचे नैसर्गिक प्रथिन आहे. संपूर्ण वाढ व रोगप्रतिकार शक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या अमिनो ॲसिड्सचा हा स्रोत आहे.

मुले आहार घेण्यास सुरवात करतात, तेव्हा त्यांच्या आहारातील प्रथिनयुक्त भारतीय प्रमुख अन्न डाळी, कडधान्ये, दही इत्यादी त्यांच्या शारीरिक व मानसिक योग्य व जलद वाढीसाठी आवश्यक प्रथिने, ऊर्जा देण्याचे काम करतात.

पौगंडावस्था

पौगंडावस्थेत मुलांची झपाट्याने वाढ होत असते, हालचाल- चपळता वाढलेली असते. अशा वेळी त्यांच्या स्नायू व हाडांच्या बळकटीसाठी व हार्मोन्सच्या वाढीसाठी प्रथिनांखेरीज पर्याय उरत नाही. भारतीय पारंपरिक पदार्थ राजमा, हरभरा, मोडाचे मूग व कडधान्ये, सोयाबिन्सचे पदार्थ ही उत्तम प्रकारची वनस्पतिजन्य प्रथिने आहेत. मांसाहारींसाठी मासे, कोंबडी यासारखे चरबीरहित मांस, अंडी हे योग्य वाढ होण्यासाठी चांगल्या प्रतीची आवश्यक प्रथिने पुरवतात.

तारुण्य

तारुण्यात स्नायूंची बळकटी, निरोगी चलनवलन व तृप्तता यासाठी प्रथिने निर्णायक भूमिका सुरूच ठेवतात. भारतीय खाद्यपदार्थ खाण्यातील आवडी-निवडीप्रमाणे असंख्य प्रथिनयुक्त व्यंजनांचा खजिना उघडतात. डाळी, कडधान्ये, विविध शेंगा हे बऱ्याच घरांमधील प्रमुख जेवण असते, तर तंदुरी चिकन, फिशकरी, अंडाभुर्जी यासारखे पदार्थ प्राणिजन्य चवदार प्रथिने पुरवतात.

गर्भधारणा व स्तनपान

गर्भाची वाढ, मातेच्या स्नायूंचे प्रसरण व दुधाच्या निर्मितीसाठी गर्भधारणा व स्तनपान या काळात शरीर जास्त प्रमाणांत प्रथिनांची मागणी करते. पारंपरिक भारतीय ज्ञानानुसार या काळात जास्त पौष्टिक आहाराची गरज असते. डाळींचे सूप, पालक पनीर, भाजलेले दाणे व बिया यांना जास्त महत्त्व आहे. यामुळे गर्भाच्या व मातेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी अमिनो-ॲसिड्स तसेच जीवनसत्त्वे व क्षार पुरवले जातात.

प्रौढत्व

प्रौढत्वामध्ये स्नायूंची बळकटी व हाडांची घनता व्यवस्थित टिकवणे आपल्या हालचालीसाठी व पर्यायाने स्वातंत्र्यासाठी अग्रस्थानी होते. वयामुळे होणारी स्नायू-क्षती वाचवण्यासाठी व एकूण आरोग्यासाठी प्रथिनयुक्त आहारावर भर देणे महत्त्वाचे मानले जाते. पारंपरिक भारतीय आहारात प्रौढांसाठी उपयुक्त प्रथिनयुक्त आहाराचा खजिनाच उलगडला जातो. डाळी, दही, पनीर, सुकामेवा यांबरोबरच व्हे-प्रथिन, वनस्पतीजन्य प्रथिन पावडर हेदेखील प्रौढांना पोषण-गरजांच्या पूर्ततेसाठी मदत करतात.

शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी भारतीय पदार्थांत प्रथिनयुक्त यादीच दिली आहे. डाळी, धान्ये, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा, बिया आणि चरबीविरहित मांस ही सर्व उत्तम प्रथिनांची भारतीय स्वयंपाकघरात आढळणारी उदाहरणे आहेत. या पदार्थांचा दैनंदिन आहारात समावेश केल्यास संपूर्ण आरोग्य व वेल-बिईंगसाठी आवश्यक असणारी अमिनो ॲसिड्स व पोषणतत्त्वे मिळतात.

यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की डाळी व कडधान्यांत विशिष्ट प्रकारच्या अमिनो ॲसिड्सचा अभाव असतो- जे भात, भरडधान्य, गहू यासारख्या कर्बोदकीय पदार्थांत उपलब्ध असतात. त्यामुळे डाळ-भातासारखा पारंपरिक भारतीय पदार्थ महत्त्वाचे मिश्रण आहे.

प्रत्येक वयोगटातील भारतीयांसाठी आरोग्यदायी पोषणतत्त्वांचा भक्कम पाया रचणाऱ्या मॅक्रोन्युट्रियंट्समध्ये प्रथिने हा अनिवार्य घटक आहे. आपल्या दैनंदिन आहारात विविध प्रथिनयुक्त आहाराचा समावेश करून आपण आपल्या पोषण गरजा भागवून पौष्टिक व चैतन्यपूर्ण जीवन जगू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com