पूर्णयोग ध्यान

योगी अरविंद हे नाव गेल्या शतकापासून योगाच्या क्षितिजावर तेजोमय आहे. चाळीस वर्षं अरविंदांनी पाँडिचरी येथील वास्तव्यात दीर्घकाळ योगतपस्या केली.
Yoga
YogaSakal

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

योगी अरविंद हे नाव गेल्या शतकापासून योगाच्या क्षितिजावर तेजोमय आहे. चाळीस वर्षं अरविंदांनी पाँडिचरी येथील वास्तव्यात दीर्घकाळ योगतपस्या केली. सामान्य माणसालाही आचरणात आणता येईल, असा पूर्णयोग त्यांनी जगापुढे आणला. पूर्व-पश्चिम, प्राचीन-अर्वाचीन, धर्म-विज्ञान, आस्तिक-नास्तिक, बुद्धिवादी-अध्यात्मवादी अशा नानाविध प्रवृत्तींच्या सुरेख मिलाफाचं मनोहारी दर्शन त्यांच्या तत्त्वज्ञानातून घडतं.

उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार हजारो वर्षांपासून माणूस प्रगत होतो आहे. हा विकास भौतिक, एकांगी, शारीरिक पातळीपर्यंतच सीमित राहू नये अशी त्यांची धारणा होती. ध्यानसाधनेतून मनही उच्चमन, प्रदीप्तमन, अंतर्ज्ञानात्मकमन, अधिमानस या अवस्थांतून विकसित होत शेवटी ‘अतिमानस’ (सुप्रामेंटल) अशा उच्चतम अवस्थेला पोचेल, असा सिद्धांतच श्री अरविंदांनी मांडला.

पूर्णयोगात मूर्तिपूजा, जप, पूजाअर्चा, प्रार्थना, व्रतवैकल्यं, उपवास यांना महत्त्व नाही. सहजध्यानातून आपलं जीवन विचार, विकार, वासना, इच्छा यांपासून अंतर्बाह्य आणि पूर्णपणे मुक्त करावं ही शिकवण आहे. आश्रमाशेजारी ऑरोव्हिल या आंतरराष्ट्रीय वसाहतीत देशी-परदेशी साधक येऊन श्रमदान करतात. त्यांच्यासाठी ते ध्यानच असतं. बेकरी, आयुर्वेदीय औषधशाळा, स्वर्गीय उद्यानं यातूनच निर्माण झाली.

अरविंद किंवा माताजी यांनी ‘अमुक एक पद्धतीनंच ध्यान करा’ असं सांगितलेलं नाही. ‘विशिष्ट पद्धतीचाच अंगीकार करावा’ असा आग्रहही नाही. समर्पित भावानं आपलं काम प्रेमानं करणं या कर्मयोगाच्या साधनेला प्राधान्य आहे. अरविंदांच्या समाधीजवळ साधक शांतपणे ध्यान करत असतात.

आपली वेळ आली आणि पुरेशी इच्छा झाली, की तिथं मार्गदर्शक आपल्याला भेटतात, विशिष्ट ध्यानपद्धती शिकवतात व करवून घेतात अशी इथल्या साधकांची ठाम श्रद्धा आहे. विचारांकडे साक्षीभावाने, तटस्थ वृत्तीने पाहणं, मंत्रनाद, श्वासोच्छ्‌वासावर लक्ष, रूपदर्शन (Visualization), अनंत समापत्ती अशा प्रकारे साधक ध्यान करू शकतात.

मला पूर्वी कामानिमित्त पाँडिचेरीला जावं लागे. एकदा अरविंदांच्या समाधीपाशी बसल्यावर फारच वेगळा अनुभव मिळाला. ‘आपल्या आत काहीतरी बदलतं आहे, घडतं आहे’ अशी संवेदना जाणवत राहिली. नक्की काय घडतंय, हे त्यावेळी नीटसं कळलं नाही. मात्र, ती संवेदना आतून अतिशय हवीहवीशी वाटणारी होती. डोळे उघडल्यावर ‘तुम्ही दोन तास डोळे मिटून अतिशय स्तब्ध बसला होतात’ असं माझ्या सहकाऱ्यानं मला सांगितलं. तिथल्या प्रशांत, रमणीय वातावरणात मन खूप हलकं होणं हा अनुभव अनेकदा आला.

नैनिताल इथं ‘योगी अरविंद हिमालयन सेंटर’ हे सुंदर ठिकाण आहे. तिथं साधकांसाठी योगध्यान शिबिरं आयोजित केली जातात. दररोज संध्याकाळी सर्वजण ध्यानाला बसतात. विशिष्ट कुठलीही ध्यानपद्धत यात अपेक्षित नसते. शांतपणे बसून आपल्या आत पहात राहणं एवढंच! या काळात आपण आतून शांत शांत होत चाललो आहोत, हे प्रकर्षानं जाणवलं.

श्री अरविंद आणि नंतर पू. माताजी यांच्यानंतर काही काळ साधकांना स्फूर्तिस्थान नाहीसं झाल्यासारखं वाटलं. मात्र, समाधीजवळ दिवसातून थोडा वेळ बसणं, दिवसभर चांगल्या कामात गुंतलेलं राहणं यातून एक विलक्षण अशी ध्यानावस्था आश्रमवासीय अनुभवू लागले. आश्रमाचा परिसर, वाङ्‍मय, तिथली कामं करताना सहजगत्या ध्यानस्थिती अनुभवणं याहून अधिक पवित्र, सुंदर, आनंदमयी काय असू शकेल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com