
- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ
सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला ‘उत्पत्ती, स्थिती आणि लय’ या चक्रातून जावं लागतं. यातल्या लयशक्तीलाच ऋषीमुनींनी ‘शिवशक्ती’ असं नाव दिलं.
भगवान शंकरांच्या उपासकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘महाशिवरात्र’. या दिवशी ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्रासहित केलेलं शिवध्यान हे जीवनात चिरकाल टिकणारं सुख, शांती, आनंद, आरोग्य देणारं आहे. हे ध्यान कसं करायचं ते पाहूया!
सुखकारक अशा आसनात बसावं. डोळे शांत मिटावेत. शरीर शिथिल, श्वसन संथ आणि मन शांत अशी स्थिती धारण करावी. मिटलेल्या डोळ्यांसमोर एक सुंदर असं दृश्य आपण साकार करणार आहोत.
एक घनदाट, हिरवंगार अरण्य, जंगल आहे. जंगलाच्या अगदी आतमधे आपण आहोत. अतिशय दाट, गर्द झाडीनं वेढलेलं, नितांत शांत आणि पवित्र असं हे ठिकाण आहे. समोर एक अतिशय भव्य आणि प्राचीन असं शंकराचं मंदिर दिसतं आहे. अतिशय प्राचीन काळातलं, काळ्याभोर पाषाणात बांधलेलं, सुंदर कोरीव काम केलेलं, असं हे देखणं शिवालय, देवालय आहे.
देवळाचा परिसर अतिशय सुंदर आणि रम्य वनश्रीनं, वनराजीनं नटलेला आहे. देवळामागे स्वच्छ, पांढऱ्याशुभ्र, फेसाळत्या, स्फटिकवत पाण्याचा झरा आहे. झऱ्याच्या पाण्यानं आपण हातपाय धुऊन शुचिर्भूत झालेले आहोत. अतिशय प्रसन्न आणि श्रद्धापूर्वक अंत:करणानं देवळाच्या गाभाऱ्यात आलेले आहोत. नुकतीच शंकराच्या पिंडीची पूजा झालेली आहे.
काळ्याभोर दगडातली सुंदर, रेखीव पिंड, पांढऱ्याशुभ्र सुवासिक फुलांनी सुशोभित केलेली आहे. फुलांचा ओलसर गंध गाभाऱ्यात भरून राहिलेला आहे. भावपूर्ण अंत:करणानं आपण पिंडीजवळ जाऊन बसलेले आहोत. एका छोट्याशा गोजिरवाण्या बाळानं दुडूदुडू धावत येऊन आपल्या हातात बिल्वदळांनी, भरलेली परडी आणून दिलेली आहे.
श्रद्धेने ओथंबलेल्या मनाने आपण ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा एकएक शब्द, अगदी सावकाश, शांतपणे, संथपणे म्हणत बेलपत्र पिंडीवर वाहतो आहोत. शिवशक्तीच्या, लयतत्त्वाच्या सगुणसाकार रूपाशी तन्मय होत त्या निर्गुणनिराकार लयतत्वाची प्रचिती, अनुभूती आपण घेत आहोत.
मंत्र अतिशय सावकाश, संथपणे कसा म्हणायचा, ते समजून घेऊया. ऽ ही खूण किती वेळा दिली आहे यावरून, ते अक्षर किंवा शब्द किती लांबवायचा, याची कल्पना येईल.
ओऽऽऽऽम काही सेकंद थांबावं
नमःऽऽऽ काही सेकंद थांबावं
शिऽऽवाऽऽऽय काही सेकंद थांबावं
प्रत्येक शब्द अत्यंत संथ, शांत, हळुवार आवाजात म्हटला जातो आहे यावर लक्ष ठेवावं.
ओऽऽऽऽम नमःऽऽऽ शिऽऽवाऽऽऽय ।
ओऽऽऽऽम नमःऽऽऽ शिऽऽवाऽऽऽय ।
ओऽऽऽऽम नमःऽऽऽ शिऽऽवाऽऽऽय ।
पाच-सहा वेळा अगदी एकाग्रतेनं मंत्र म्हणल्यास आपण अगदी सहजगत्या ध्यानस्थितीत जातो. नामजपाच्या उच्चाराची स्पंदनं, कंपनं यामुळे आपल्या मनाचा, हृदयाचा गाभारा उजळून निघालेला आहे. अतिशय प्रगाढ, प्रदीर्घ, सखोल ध्यानाची अवस्था अनुभवत काही क्षण ध्यान करावं.
अगदी नवशिक्या साधकांनाही हा अनुभव नक्की येतो. या ध्यानपद्धतीमधे मंत्र खूप मोठ्या संख्येने म्हणणं अपेक्षित नाही.
शिवरात्रीच्या परमपवित्र मुहूर्तावर मन अशा सुंदर, सात्त्विक दृश्यावर एकाग्र करून ध्यान केल्यामुळे, ध्यानाची परिणामकारकता अनेक पटींनी वाढते. हे ध्यान पुढे दररोज केल्याने अनेक साधकांना त्याचा चांगला उपयोग होईल. निरामय आरोग्य लाभल्यामुळे समस्या कमी झाल्या, किंवा नाहीशा झाल्या असा अनुभव हे ध्यान करणाऱ्या असंख्य शिवउपासकांनी घेतलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.