आरोग्यमंत्र : ‘हृदयबंध’ करू घट्ट

गेल्या काही महिन्यांपासून आपण हृदयविकाराविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेतली. आज या मालिकेतील शेवटच्या लेखात एक वेगळ्या गोष्टीविषयी चर्चा करू.
Heart Disease
Heart DiseaseSakal
Summary

गेल्या काही महिन्यांपासून आपण हृदयविकाराविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेतली. आज या मालिकेतील शेवटच्या लेखात एक वेगळ्या गोष्टीविषयी चर्चा करू.

गेल्या काही महिन्यांपासून आपण हृदयविकाराविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेतली. आज या मालिकेतील शेवटच्या लेखात एक वेगळ्या गोष्टीविषयी चर्चा करू. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एका रुग्णाचे काही नातेवाईक सेकंड ओपिनियनसाठी रिपोर्ट घेऊन आले. हे ८६ वर्षांचे आजोबा मोठ्या हार्ट ॲटॅकने आयसीयूमध्ये ॲडमिट होते. त्यांची हृदयक्षमता खूप कमी झाली होती आणि त्यांना नॉन-इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत होती.

याव्यतिरिक्त पण ते घरी काही विशेष हालचाल करत नव्हते. मी त्यांना सल्ला दिला, की ‘काहीही करू नका, औषधांनी उपचार करा.’ परंतु नातेवाईक अशा वेळी अतिशय घाबरलेले आणि भावनिकरीत्या कमकुवत असतात. अशा वेळी ते काहीही करायला तयार होतात. त्यांना थोडे जरी सांगितले, तर ते लगेच आपण सगळे काही केले पाहिजे या भावनेतून अँजिओप्लास्टी किंवा बायपासला तयार होतात. असो. या आजोबांविषयी असेच होऊन नातेवाईकांनी भावनेच्या दबावात येऊन अँजिओप्लास्टी करून घरातली आणि अपेक्षेप्रमाणे त्यांची अतिशय नाजूक परिस्थिती असल्यामुळे ते ४ दिवसांनी दगावले. या प्रकरणातून आपल्याला काही धडे शिकायला मिळतात.

भावनांच्या आहारी जाऊ नका

कधी कधी सल्ला शास्त्रीयरित्या योग्य असला, तरीही काही वेळा वास्तवाचे भान ठेवून आणि भावनांच्या आहारी न जाता निर्णय घ्यावा. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटते, की अँजिओप्लास्टी आणि बायपास सोडून तिसरा मार्गच नाही; पण तिसरा मार्ग असतो, तो म्हणजे औषधोपचार- ज्याला आम्ही ‘मेडिकल मॅनजमेंट’ असे म्हणतो. बऱ्याच वेळेस हा पर्याय आपण विसरतो. अशा वेळी ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ या सूत्राप्रमाणे रुग्णाला थोडा चांगला आणि स्थिर करून मग अँजिओप्लास्टी आणि बायपासचा विचार करता येतो. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये थोडी रिस्क असते; पण तेवढी किंबहुना जास्त रिस्क दुसऱ्या पर्यायांमध्येही असते. इन्व्हेसिव्ह उपचार हे काही अमरत्वाचा पट्टा नव्हेत. त्यामध्येही रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे नातेवाईकांनी भीती, दबाव आणि भावना यांच्या आहारी न जाता योग्य आणि सारासार विचार करून निर्णय घ्यावा.

सेकंड ओपिनियन

बऱ्याच वेळा एक त्रयस्थ डॉक्टर निष्पक्ष सल्ला देऊ शकतो. आजकाल व्हॉट्सॲप आणि इतर गोष्टींमुळे रिपोर्ट्स आणि इतर गोष्टी त्वरेने पाठविणे सहज शक्य झाले आहे. इमर्जन्सी असेल, तर दुसऱ्या डॉक्टरांचे तुमच्या डॉक्टरांशी बोलणे करून दिले, तर त्या दोघांना वैद्यकीय भाषेतून रुग्णाची सद्य अवस्था समजून घेता येते. फक्त या गोष्टी जलदरीत्या केल्या पाहिजेत.

फॅमिली डॉक्टरचे मत

या सगळ्या निर्णयप्रक्रियेमध्ये फॅमिली डॉक्टरचा खूप मोठा सहभाग असायचा. दुर्दैवाने ही संस्था आता जवळजवळ संपल्यातच जमा आहे. या संस्थेचे पुनरुज्जीवन झालेच पाहिजे. आता खरे तर फॅमिली डॉक्टरची अनुपस्थिती रुग्णांना आणि आम्हा डॉक्टरांनादेखील प्रकर्षाने जाणवते. फॅमिली डॉक्टर हा रुग्ण आणि स्पेशालिस्ट डॉक्टरांमधील दुवा होता. सध्या होणारे समज आणि गैरसमज खूप प्रमाणामध्ये फॅमिली डॉक्टरांमुळे टाळता येतात. दुसऱ्या बाजूने पाहिले, तर डॉक्टरांनीदेखील रुग्णाला सहजतेने ‘सेकंड ओपिनियन’ घेऊ दिले पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे.

यामध्ये अनिच्छा दाखवल्यास रुग्णाच्या नातेवाईकांच्या मनात संशय निर्माण होऊ शकतो. अर्थात इमर्जन्सीमध्ये रुग्णाच्या उपचारांमध्ये विलंब न करता या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. रुग्णालयांनीसुद्धा यासाठी पारदर्शकता आणली पाहिजे आणि त्याप्रमाणे धोरणे ठरवली गेली पाहिजेत. पाश्चात्य देशांमध्ये प्रत्येक शास्त्रक्रियेविषयी ‘ॲप्रोप्रिएटनेस क्रायटेरिया’ असतात त्याप्रमाणे भारतीय मापदंड तयार केले पाहिजेत- जेणेकरून या गोष्टींचे ऑडिट करणे सोपे होईल.

अशास्त्रीय उपचार

बऱ्याचदा रुग्ण जाहिरातींच्या माध्यमातून बऱ्याच अशास्त्रीय आणि दिशाभूल करणाऱ्या; सिद्ध न झालेल्या उपचारपद्धतीच्या जाळ्यात ओढले जातात. अशा पद्धतींमध्ये खूप अवाजवी दावे केलेले असतात. अशा वेळी हे सांगणाऱ्या डॉक्टरांची डिग्री, त्यांचा अनुभव इत्यादींचा विचार करूनच अशा अशास्त्रीय पद्धतींकडे वळावे- अन्यथा त्या प्राणघातक ठरू शकतात. ‘पीर रिव्ह्यू’ म्हणजे आपल्या आजूबाजूंच्या लोकांना, फॅमिली डॉक्टरांना विचारूनच अशा पद्धतींचा अवलंब करावा- अन्यथा पैसे आणि प्राणाची हानी होण्याचा संभव असतो.

साधी गोष्ट लक्षात ठेवावी, की या उपचार पद्धती इतक्या प्रभावी असतील, तर त्यांना नोबेल पारितोषिक अथवा जगन्मान्यता का मिळत नाही याचाही विचार करावा. आपल्या रुग्णाला बरे करायचे आहे, म्हणून सैरभैर होऊन असे निर्णय घेऊ नयेत. परत इथे फॅमिली डॉक्टरांची मदत अधोरेखित करावी लागेल.

रुग्णांनी डॉक्टरांचे शिक्षण, त्यांचे अनुभव याची माहिती घेणे आवश्यक आहे. आज काळ समाजमाध्यमांच्याद्वारे या गोष्टी सुलभरित्या करता येतात.

या सगळ्याचा विचार करता आपल्या लक्षात येईल, की घाबरून न जाता थोड्या संयमाने विचार केल्यास आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. भीतीच्या दबावाखाली नव्हे, तर सारासार विचार करून सर्वानुमते निर्णय घ्यावा. आपले नातेवाईक, आप्तेष्ट, फॅमिली डॉक्टर यांचा सल्ला घेऊन निर्णय घेतल्यास तो योग्य ठरू शकतो. आम्ही डॉक्टरांनीदेखील आपण रुग्णाला आत्मविश्वास दिला पाहिजे, त्याला घाबरवू नये, याचे भान ठेवणे अत्यावश्यक आहे. असे झाले तरच रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये निर्माण झालेली दरी दूर व्हायला मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com