इनर इंजिनिअरिंग : केवळ कष्टाने फळ नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadguru

लहानपणापासूनच लोक आपल्याला नेहमी म्हणायचे, ‘जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा कसून अभ्यास करा, जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा कष्ट करून करा.’

इनर इंजिनिअरिंग : केवळ कष्टाने फळ नाही

लहानपणापासूनच लोक आपल्याला नेहमी म्हणायचे, ‘जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा कसून अभ्यास करा, जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा कष्ट करून करा.’ कुणीच असे सांगितले नाही, की आनंदाने अभ्यास करा किंवा प्रेमाने काम करा. नाही. तुम्ही कसून अभ्यास केला पाहिजे, तुम्ही कष्ट केलेच पाहिजेत. लोक सगळे काही कष्टाने करतात, आणि मग जेव्हा जीवन कष्टप्रद वाटू लागते तेव्हा तक्रार करतात. अहंकाराचा स्वभावच असा आहे, की त्याला सर्व काही कष्टाने करावेसे वाटते. अहंकाराला तुम्ही काय करत आहात याची काळजी नसते. त्याची एकच चिंता असते, की इतर कोणाच्या तरी एक पाऊल वरचढ असणे, एवढेच.

जगण्याचा हा एक अतिशय दुःखी मार्ग आहे, पण तो अहंकाराचा मूळ स्वभाव आहे. म्हणून, जेव्हा पूर्णपणे हाच प्रयत्न असतो, तेव्हा सर्व काही कष्टाने करणे हाच स्वाभाविकपणे लोकांसाठी समाधानाचा स्रोत बनतो. ते आनंदाने गोष्टी करत असतील तर त्यांना असं वाटतं की त्यांनी काहीच केले नाही. जेव्हा तुम्ही बऱ्या‍च गोष्टी करता, पण तरीही तुम्हाला असे वाटते की तुम्ही काहीच केले नाही, तर हे मस्त नाही का? हे असेच असले पाहिजे.

तुम्ही दिवसातले चोवीस तास काम करत असाल, पण तरीही तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही काहीच केले नाही, तेव्हाच तुम्ही प्रत्येक गोष्टीचा भार तुमच्यावर घेत नाही. तुम्ही फक्त तुमच्या क्षमता पूर्णपणे व्यक्त करत जीवन जगता. जर तुम्ही हे सगळे डोक्यावर घेऊन वावरत असाल, तर तुमच्या क्षमतांना कधीच पूर्णपणे अभिव्यक्त होता येत नाही आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो, जे आजकाल खूप प्रमाणात वाढत आहेत; रक्तदाब, मधुमेह आणि अल्सर.

तुम्ही आणि तुमच्या मनात, तुम्ही आणि तुमच्या शरीरात, तुम्ही आणि तुमच्या सभोवतालच्या सर्व गोष्टींमध्ये एक ठरावीक अंतर असेल, तर याने तुम्हाला असे एक स्वातंत्र्य मिळते की तुम्ही जीवनात तुम्हाला हवं ते करू शकता, पण जीवन तुमच्यावर काहीच परिणाम करू शकत नाही. ते तुम्हाला कोणत्याही प्रकारे दुःख देत नाही. तार्किकदृष्ट्या तुम्ही असा निष्कर्ष काढू शकता, की जर असे झाले तर तुम्ही जगापासून दूर जाल, पण ते सत्य नाही. एका स्तरावर तुम्ही अस्पर्शित आहात, पण दुसऱ्या स्तरावर तुम्ही इतके गुंतलेले आहात की सर्व काही तुमचाच एक भाग आहे. तुम्ही स्वतःला प्रत्येकाच्या जीवनात सामील करू शकता - जणू काही ते तुमचे स्वतःचेच आहे. जेव्हा अडकण्याची आणि दुखापत होण्याची भीती नसते, तेव्हा तुम्ही स्वतःला जीवनात पूर्णपणे झोकून देऊ शकता आणि संकोच न करता प्रत्येक गोष्टीत स्वतःला सामील करू शकता.

टॅग्स :Sadguruhealth