इनर इंजिनिअरिंग : इच्छेचे भ्रामक रूप

इनर इंजिनिअरिंग : इच्छेचे भ्रामक रूप

सर्वसाधारणपणे लोकांना स्वातंत्र्य मूर्त स्वरूपाचे वाटते. बऱ्याच लोकांच्या लेखी स्वातंत्र्य नेहमीच मूर्त असते.

प्रश्न - सद्‍गुरू, मला स्वातंत्र्य हवे आहे. परंतु मी जितकी जास्त इच्छा करतो, तितके स्वातंत्र्य मिळवणे अवघड आहे असे मला का वाटते?

सद्‍गुरू - सर्वसाधारणपणे लोकांना स्वातंत्र्य मूर्त स्वरूपाचे वाटते. बऱ्याच लोकांच्या लेखी स्वातंत्र्य नेहमीच मूर्त असते. बऱ्याच लोकांकरता स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे ‘कामातून सुटका, कुटुंबापासून सुटका, सगळ्या बंधनांपासून सुटका. ज्याला तुम्ही बंधने समजता त्यातून सुटका झाली, तर मी स्वतंत्र झालो’ असा आहे. परंतु बंधनांपासून सुटका मिळवण्याची इच्छादेखील बंधनच आहे. मुळात इच्छा म्हणजेच बंधन. तुम्हाला कशाचीही इच्छा झाली म्हणजेच बंधन आले. तुम्ही जे काही बघता, तुमच्या पंचेंद्रियांमार्फत अनुभवता, ते कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या मनात विचारचक्र सुरू करते.

समजा, तुम्ही एखादी सुंदर गोष्ट पाहिलीत, असं धरून चालू की एखादी कार पाहिलीत. ‘वा! किती सुरेख कार आहे.’ हा एक विचार झाला. या विचारात आणि ‘ओह! माझ्याकडे पण अशी कार असायला हवी होती,’ ही इच्छा यामध्ये, ती इच्छा निर्माण होण्यापूर्वी एक थोडीशी फट असते. विचार ही साधी सोपी नैसर्गिक प्रक्रिया आहे, कारण पंचेंद्रिये काम करत आहेत, सतत गोष्टींचे आकलन करत आहेत, आणि त्याचा शेवट विचार करण्यात होतो. परंतु या विचारांचे नकळतपणे इच्छेमध्ये रूपांतर करणारे आपणच असतो. एकदा इच्छा झाली की मग आस निर्माण होते. अपूर्णत्वाची भावना निर्माण होते. इच्छा म्हणजे तुम्ही कमी आहात. इच्छा म्हणजे ‘मी इथे आहे, काहीतरी तिथे आहे. मला ते मिळाले की मी पूर्ण होईन. जेव्हा माझे ध्येय प्राप्त होईल तेव्हा मी पूर्ण होईन.’ हे त्या इच्छेचे मूळ आहे.

इच्छा प्रत्येक टप्प्यावर भ्रम निर्माण करते. ‘मला हे मिळाले, तर काम फत्ते.’ प्रत्यक्षात तुम्ही तसा विचार केला असेल किंवा नसेलही, परंतु हा इच्छेचा मूलभूत गुणधर्म आहे हे लक्षात घ्या. हा भ्रम आहे. तुम्ही आयुष्यभर इच्छांच्या मागे धावू शकता. लोक त्यांच्या मृत्यू शय्येवरसुद्धा इच्छा बाळगून असतात कारण इच्छेचा हा भ्रम तुम्हाला अक्षरश: अशा मोहात पाडतो की इच्छा पूर्ण झाली की सगळे काही आलबेल होणार आहे. ही भावना तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर जाणवत असते. यामुळेच तुम्ही इच्छांचा पाठपुरावा करत असता.

परंतु विचार आणि इच्छा यांच्यामध्ये एक फट असते. तुम्ही या फटीबद्दल जागरूक राहिलात, तर इच्छा पूर्णपणे विरून जाते. आत्ता तुम्ही त्या फटीत आहात. तुम्हाला त्या जागेवरून हलायचे असेल, तर तुम्हाला जाणीवपूर्वक मनात इच्छा निर्माण करायला हवी. ‘मला जाऊ दे.’ अन्यथा काहीही करण्याची गरज नाही. नुसते इथे असणे पुरेसे आहे, कारण खरोखरच ते पुरेसे असते. इथे असणे हेच खरेतर खूप आहे. इतरत्र कोठेही जाण्याची गरज नाही.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com