
Som Yag Yadnya 2023 : पस्तीस सोमयागांचा अनुभव घेणारे सेवाव्रती; अनंत शिधये
म्हापसा : ‘‘अग्निहोत्र म्हणजे अग्न्यन्तर्यामी (अग्नीमध्ये) आहुती अर्पण करून केली जाणारी ईश्वरी उपासना असून, १९८५ पासून मी ती करीत आहे. त्यामधून मला आत्मानंद मिळतो,’’ असा अनुभव अनंत मुरलीधर शिधये (वय ६६) यांनी सांगितला.
‘गोमन्तक-सकाळ माध्यम समूहा’तर्फे सध्या काणका विश्वाटी विश्वेश्वर देवस्थान परिसरात अग्निष्टोम महासोमयाग सुरू असून, शिधये हे तेथे मनोभावे सेवाकार्य करत आहेत. शिधये हे भारतीय रेल्वेचे निवृत्त कर्मचारी असून १९८१ मध्ये त्यांनी पुण्यात अक्कलकोट गजानन महाराजांचे पहिल्यांदा दर्शन घेतले.
त्यानंतर ते गजानन महाराजांचे साधक बनले आणि तेव्हापासून ते अग्निहोत्राची उपासना सातत्याने करत आहेत. त्यांनी १९८५मध्ये भोपाळमध्ये पहिला सोमयाग अनुभवला; तर १९८६मध्ये गुजरातमध्ये दुसऱ्यांदा. आतापर्यंत अनंत मुरलीधर शिधये यांनी ३५ महासोमगायचा अनुभव घेतला असून, त्या-त्या ठिकाणी त्यांनी सेवाकार्य बजावले आहे.
हा सोमयाग संपवून जगन्नाथपुरी येथे होणाऱ्या पुढील सोमयागस्थळी भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय रेल्वेचे कर्मचारी असताना शिधये हे रजा टाकून महासोमयागाचा आशीर्वाद घेण्यासाठी तसेच तिथे सेवाकार्य देण्यासाठी जायचे. निवृत्तीनंतर शिधये यांनी दहा महासोमयाग अनुभवले.
शिधये म्हणतात...
अग्निहोत्र करणे ही नित्योपासना आहे. ते एक व्रत आहे.
आपल्याला जे जीवन मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दररोज अग्निहोत्र करणे हे आपले कर्तव्य आहे.
सभोवताल तसेच हे विश्व आपलेच कुटुंब असून त्यांचे संरक्षण करण्यासाठी असे महासोमयाग यज्ञ प्रत्येक ठिकाणी कालांतराने होत राहिले पाहिजेत.
मिळतो नवा दृष्टिकोन
मुरलीधर शिधये सांगतात की, नियमाने अग्निहोत्र करणाऱ्या विविध स्तरांतील व्यक्तींना अधिक समाधानकारक, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, मनःशांती तसेच संबंधितांमध्ये कार्यप्रवणता हे गुण निर्माण होण्यास मदत मिळते.
त्याचप्रमाणे अग्निहोत्राच्या औषधीयुक्त वातावरणामुळे रोगकारक जंतूंच्या वाढीस प्रतिबंध होतो. एकप्रकारचे संरक्षककवच सभोवती असल्याची जाणीव होते. त्यामुळे अशाप्रकारचे अग्निष्टोम महासोमयाग असो किंवा इतर यज्ञ ही ठिकठिकाणी सर्वत्र होणे काळाची गरज बनली आहे, असेही शिधये सांगतात.
अनेक फायदे जाणवतात
‘‘आतापर्यंत मी ३५ महासोमयागांचा अनुभव घेतला आहे. मिळेल तिथे जाऊन मी सोमयागस्थळी सेवा देतो. यज्ञस्थळी झाडू मारण्यापासून स्वयंपाकस्थळी लागेल ती मदत मी करतो. जरी यज्ञाचे यजमान हे कुणीही केले, तरी मी यज्ञस्थळी जाऊन उपस्थिती लावतो व तिथे सेवा बजावतो हाही एकप्रकारचा यज्ञच आहे. अग्निहोत्रामुळे आपल्या अंगी शिस्त येते, निर्णयक्षमता वाढते व अधिक नम्र होतो,’’ असेही शिधये सांगतात.
विश्व हे आपले कुटुंब असून, जनकल्याणार्थ अशाप्रकारचे महासोमयाग यज्ञ सर्वत्र झाले पाहिजेत व तिथे जाऊन मला सेवा देता येईल.
- अनंत शिधये, भाविक