
सृष्टीची पाच पवित्र गुपिते आहेत आणि त्यांना या विश्वातील यक्ष आणि देवता सुरक्षित ठेवत असतात.
चेतना तरंग : पाच रहस्ये
या सृष्टीची पाच पवित्र गुपिते आहेत आणि त्यांना या विश्वातील यक्ष आणि देवता सुरक्षित ठेवत असतात. ही रहस्ये खालीलप्रमाणे आहेत.
१) जननरहस्य - जन्म हे एक रहस्य आहे. एक आत्मा शरीरात कसा येतो, तो शरीराची निवड कशी करतो, कोणते शरीर कोणत्या समयी आणि कोणत्या पालकांपाशी घ्यायचे हे कसे ठरवतो हे सर्व रहस्यमय आहे.
२) मरणरहस्य - हे एक अतिशय गुप्त रहस्य आहे. मृत्यूचा थांगपत्ता लागतच नाही. शरीररूपी वस्तूतून आत्मचेतना वेगळी कशी होते आणि त्यापुढे त्या चेतनेचा प्रवास कसा असतो हे मोठे रहस्य आहे.
३) राजरहस्य - या सर्व विश्वाचे योग्य प्रकारे आणि प्रमाणबद्ध नियंत्रण करून इथे सुव्यवस्थित कारभार कसा चालतो हे एक रहस्य
आहे.
४) प्रकृतीरहस्य - प्रकृती अथवा निसर्ग रहस्यमय आहे. निसर्गाबद्दल तुम्ही जेवढे अधिक जाणाल, तेवढे ते अधिक रहस्यमय बनत जाते. वैज्ञानिक मंडळी संशोधन करून जेवढे अधिक ज्ञान मिळवतात, तेवढे त्यांना जाणवत जाते की अजून खूप काही गुप्त, रहस्यमय आहे. विज्ञानाने सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य उलगडून काढले आहे असे जरी भासत असले तरी हे रहस्य आणखीच गडद होत गेले आहे. अणू आणि परमाणू, चेतना लहरींचे अस्तित्व, कृष्णविवर, अवकाशातील शून्यवातावरण अवस्था या सर्वांच्या अभ्यासाने लाभलेल्या ज्ञानामुळे या विश्वाबद्दलचे रहस्य आणखीच गडद, बुचकळ्यात टाकणारे झाले आहे.
५) मंत्ररहस्य - मंत्र आणि त्यांचा परिणाम हे सर्व अत्यंत रहस्यमय आहेत. मंत्र ब्रह्मचैतन्यातून उठणाऱ्या प्रेरणा लहरी आहेत आणि हे सर्व किती गूढ आहे!
पाश्चात्त्य देशांमध्ये गुपित किंवा रहस्य हे अप्रामाणिकपणाचे लक्षण आणि लज्जास्पद मानले जाते. पण पौर्वात्य देशात या पाच रहस्यांना सन्माननीय आणि पवित्र मानले जाते.
रहस्याबद्दलचा सुज्ञपणा
ज्ञानी अथवा सुज्ञ माणूस कोणतेही रहस्य वा गुपित लपवायचा प्रयत्न करीत नाही, पण त्याचबरोबर रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयासही तो करीत नाही. उदा. मासिक पाळी वा मृत्यू अशा विषयांबद्दल आपण एका पाच वर्षांच्या मुलाशी चर्चा करीत नाही. पण जशी तीच मुले मोठी होतात, तेव्हा या गोष्टी त्यांच्यापासून गुप्त ठेवल्या जात नाहीत. आपसूकच त्यांना याचे ज्ञान वयानुसार दिले जाते, किंवा होते. एक अज्ञानी माणूस एखादे रहस्य गुप्तच ठेवण्याचा प्रयास करतो किंवा एखादे गुपित तो चुकीच्या समयी, चुकीच्या व्यक्तीपाशी आणि चुकीच्या स्थळी उघडे करतो आणि या रहस्यांबद्दल उगाच हंगामा करतो. एखादे रहस्य गुप्तच ठेवण्याच्या प्रयत्नामुळे अस्वस्थता आणि घोर चिंता निर्माण होतात.
एक अज्ञानी व्यक्ती गुप्त ठेवलेल्या वा उघड झालेल्या अशा कुठल्याच रहस्याबद्दल स्वस्थ असत नाही, पण ज्ञानी पुरुषाला मात्र त्यामुळे अस्वस्थता जाणवत नाही.