चेतना तरंग : अपार संयम आणि शहाणे शॉपिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Patience

समजा तुम्ही ईश्वराकडे जाऊन एक वर मागत आहात. वर मिळावा या हेतूनेच जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा त्याची तुम्हाला घाई असते.

चेतना तरंग : अपार संयम आणि शहाणे शॉपिंग

समजा तुम्ही ईश्वराकडे जाऊन एक वर मागत आहात. वर मिळावा या हेतूनेच जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा त्याची तुम्हाला घाई असते. ज्या व्यक्तीला ईश्वर आपलाच आहे याची जाणीव असते, तो कोणत्याही घाईत असत नाही. त्याच्यामध्ये अपार संयम असतो.

प्रश्न : ‘ईश्वर आपलाच आहे’ याचा अर्थ काय?

श्री श्री : ईश्वर आणि त्याने निर्माण केलेली ही सृष्टी तुमच्याच मालकीची आहे याची जाणीव. जेव्हा तुम्ही एका मोठ्या दुकानात जाल, तेव्हा घाईघाईत सामान खरेदी करून ते घेऊन घरी याल. पण सगळे दुकानच तुमच्या घरात असेल, तर तुम्हाला खरेदीची घाई असत नाही. मग तुम्ही निर्धास्त असता. काहीतरी आत्मसात करण्याची घाई तुम्हाला असंतुलित करते आणि अतिशय क्षुद्र बनवते. अनंत काळासाठीचा, अपार संयम राखा. ईश्वर तुमचाच आहे हे जाणा. ही जाणीव आणि नियमित साधना यांच्या सहाय्याने तुम्हाला हा अपार संयम प्राप्त होईल.

प्रश्न : संयम प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या घाईचे निरीक्षण करावे का?

श्री श्री : अशा समयी येणाऱ्या विचारांचे आणि भावनांचे निरीक्षण करा, पण त्याबद्दल खेद मानू नका. तुम्ही ईश्वरी योजनेचाच एक हिस्सा आहात हे जेव्हा तुम्ही जाणाल, तेव्हा तुमच्या मागण्या कमी होतील. तुमच्यासाठी सर्व काही योग्य प्रकारे केले जात आहे, याची तुम्हाला जाणीव असावी. तुमची काळजी घेतली जाईल, याची आस्था बाळगा.

साधारणतः आपण नेहमी मनाची धावपळ करवतो आणि कृती सावकाश, आळसाने करतो. असंयम अथवा धावपळ म्हणजे मनाची घाई. कृतीमध्ये सावकाश असणे म्हणजे आळस किंवा सुस्ती होय. या प्रकाराला उलटे करणे मात्र नक्कीच चांगले आहे.

मनामध्ये संयम आणि कृतींमध्ये आवेग हीच योग्य पद्धत आहे.