पंचकर्माचे टप्पे

चयापचय क्रियेमधून उरलेले आणि शरीरामध्ये हानिकारक असलेले व साठून राहिलेले विषारी पदार्थ म्हणजेच शरीरातील अशुद्धी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक पंचकर्म केले जाते.
Panchakarma
Panchakarmasakal

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

चयापचय क्रियेमधून उरलेले आणि शरीरामध्ये हानिकारक असलेले व साठून राहिलेले विषारी पदार्थ म्हणजेच शरीरातील अशुद्धी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक पंचकर्म केले जाते हे आपण गेल्या आठवड्यात बघितले. आता त्याच्या टप्प्यांची माहित घेऊ या.

पंचकर्म हे तीन टप्प्यांमध्ये केले जाते : १ पूर्वकर्म, २ प्रधानकर्म, ३ पश्चातकर्म

पूर्वकर्म

पूर्वकर्म म्हणजे मुख्य कर्म करायच्या आधीची क्रिया. यात आपण शरीराला मुख्य कर्म करून घेण्यासाठी तयार करतो. यामध्ये दोन क्रियांचा समावेश आहे : ‘स्नेहन’ आणि ‘स्वेदन’. स्नेहन म्हणजे शरीरात स्निग्ध गुण उत्पन्न करणे यासाठी तूप किंवा तेलाचे सेवन करणे व शरीराला तेल लावणे. स्नेहनानंतर स्वेदन ही क्रिया केली जाते. यामध्ये शरीराला औषधी वनस्पतींची वाफ देऊन घाम आणला जातो.

प्रधानकर्म

१. वमन : साध्या भाषेत सांगायचे म्हटले, तर उलटी करणे होय. स्नेहन, स्वेदन करून दोष पोटात आणले जातात व नंतर औषधी द्रव्ये पाजून त्यांना मुखावाटे बाहेर काढले जाते हा उपक्रम प्रामुख्याने कफदोषांवर लाभदायी आहे.

२. विरेचन : म्हणजे मलमार्गाने दोषांना रेचक औषधांचा वापर करून बाहेर काढणे म्हणजे विरेचन. विरेचन हा वाढलेल्या पित्त दोषाचा प्रमुख उपचार आहे.अनेक प्रकारचे त्वचारोग ज्यात लाली जळजळ असते, पित्ताची डोकेदुखी, अंगावर गांधी उठणे, काही प्रकारचे अर्श (पाईल्स), कावीळ; तसेच ज्या रोगात विकृत पित्त वाढलेले आहे अशात विरेचन दिले जाते.

३. बस्ती : बस्तीला ‘अर्ध चिकित्सा’ असे म्हणतात. बस्ती ही वातरोगांसाठी विशेष कार्य करणारा उपक्रम आहे. आता मात्र प्लास्टिक, धातूंचे बस्ती यंत्र मिळतात. यांत गुदद्वारावाटे औषधी तेल, काढे आत सोडले जातात. तेल आतड्यांत शोषले जाऊन काही आवश्यक घटकांचा पुरवठा होतो. अनेक वातव्याधी (सांधेदुखी, कंबरदुखी), हाडांचे रोग, आतड्यांतील विकार, त्वचारोग यांत बस्तीची उपाययोजना केली जाते.

४. नस्य : नस्य म्हणजे नाकात औषधी तेलाचे थेंब किंवा चूर्ण टाकणे. मानेच्या वरच्या अवयवांचे आरोग्य सुधारण्यास, सायनस मोकळे होण्यास, काही प्रकारच्या डोकेदुखीत याचा उपयोग होतो.

५. रक्तमोक्षण : यात दूषित रक्त शरीराबाहेर काढले जाते. रक्तदोष असल्यास हा उपक्रम उपयोगी ठरतो. यात जळवा लावणे, शिरेवाटे दूषित रक्त काढणे इत्यादींचा समावेश होतो.

पश्चातकर्म

प्रधानकर्मातील क्रिया पूर्ण झाल्यावर आपले शरीर पूर्ववत आणण्यासाठी जे काही पथ्य करावे लागते, ते सर्व पश्चातकर्मामध्ये येतात. पथ्याचे पालन करणे यात मोडते. वमन, विरेचनात दोष एकत्र करून पोटात आणले जातात व नंतर ते बाहेर काढले जातात. हे करताना रुग्णास तीव्र स्वरूपाचा अग्निमांद्य होतो. हा अग्नी वाढवण्यासाठी हळूहळू हलक्या आहारापासून म्हणजे पेय, पातळ खिचडी असे क्रमाक्रमाने वाढवत नेऊन गुरू आहारापर्यंत म्हणजे नेहमीच्या जेवणापर्यंत आहार, हळूहळू वाढवायचा असतो. यास ‘संसर्जन क्रम’ असे म्हणतात. तसेच बस्ती नस्य व रक्तमोक्षण यांच्यानंतरही त्या-त्या कर्मानुसार पथ्ये पाळायची असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com