
मी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केलं व सॉफ्टवेअर कंपनीही चालवली. त्यानंतर हृदयविकारतज्ज्ञ झालो व शेकडो बायपास शस्त्रक्रिया केल्या. हे करीत असताना मला जाणवलं, की आपण दिवसभरात केवळ २ ते ३ शस्त्रक्रिया करू शकतो.
मात्र, लोकांमध्ये हृदयाच्या आरोग्यासंदर्भात जनजागृती करून लोकांना सजन व सज्ञान केल्यास आपण कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवू शकतो. मी आता सोशल मीडिया व यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हृदयासंदर्भात लोकांमध्ये जागृतीचे काम करीत असून, ‘सकाळ’च्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमामध्येही मी लोकांमध्ये हीच जागृती निर्माण करणार आहे.
- डॉ. श्रीराम नेने, हृदयविकारतज्ज्ञ
भारतामध्ये दरवर्षी लाखो लोक हृदयासंबंधित आजारानं मृत्युमुखी पडतात आणि जगभरातही ही प्रमाण खूप मोठे आहे. भारतातील परिस्थिती अधिक गंभीर असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.
भारतातील बहुतांश लोकांची जीवनशैली बैठी आहे व त्यामुळं हृदयविकार आणि मधुमेहासारखे आजार बळावतात. या आजारांमुळं जगाच्या तुलनेत भारतीयांचं आयुर्मान १० वर्षांनी कमी आहे. आपल्या देशात आरोग्यसेवा पुरेशा अद्ययावत नाहीत व देशातील गरिबांच्या संख्येमुळं लोकांना या सुविधा वेळेत उपलब्धही होत नाहीत.
देशातील ७० टक्के जनता खेड्यांत राहते व त्यांना वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध होत नसल्यानं मृत्यूंचं प्रमाण वाढतं. आपण तंत्रज्ञान व विविध माध्यमांचा वापर करून लोकांना या आजारांसंदर्भात सज्ञान करू शकतो. स्वतःच्या आरोग्यासंदर्भात सर्व ज्ञान त्यांच्याकडं उपलब्ध असल्यास त्यांना आपली जीवनशैली सुधारणं व त्यातूनच आयुष्यमान वाढवणं सहज शक्य होणार आहे. ‘पाथफाइंडर हेल्थ सायन्सेस’ या उपक्रमातून आम्ही हेच साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
हल्ली मुलांना डॉक्टर, इंजिनिअर व्हायचं आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं या नोकऱ्या राहणार आहेत का, याचा विचार कोणी करीत नाही. प्रत्येकानं स्वतःची इच्छा काय आहे, हे पाहून करिअर निवडल्यास ते अधिक परिणामकारक ठरू शकतं.
जीवनशैलीमध्ये योग्य बदल घडवून आणल्यास व मनासारखं करिअर केल्यास आनंद मिळतो व तो मिळवणं हेच शेवटी प्रत्येकाचं ध्येय असतं. हे सर्व साध्य केल्यास लोकांना अपेक्षित असलेला ‘माइंडफुलनेस’ नक्की मिळेल.
झोप, योग्य प्रमाणात पाणी पिणं, आहार यांकडं लक्ष दिलं पाहिजे. आजारी पडल्यावरच डॉक्टरकडं न जाता आपल्या आरोग्याचा ‘डॅशबोर्ड’ आपल्यासमोर हवा. या गोष्टी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करायला हव्यात.
हे सर्व केल्यास लोकांचं जीवनमान वाढविण्याचं मला अपेक्षित असलेलं ध्येय साध्य होऊ शकेल. हेल्थकेअरशी संबंधित काम करणाऱ्या व भारतातील या क्षेत्रातील संशोधनाची माहिती देणाऱ्या ‘गोक्वी’ या वेलनेस स्टार्टअपबरोबर मी २०१३-१४पासून काम करीत आहे. नवतंत्रज्ञानाच्या मदतीनं हेल्थकेअर क्षेत्रात ऑटोमेशन आणण्याच्या दृष्टिनं आम्ही काम करीत आहोत.
आम्ही २०११मध्ये भारतात आल्यानंतर आरॲण्डएम मूव्हिंग पिक्चर्स ही संस्था स्थापन केली. ही डिजिटल कंटेंट कंपनी मी पत्नी माधुरीच्या मदतीनं चालवतो. ‘डान्स विथ माधुरी’ हे लोकांना त्यांना हव्या त्या गुरूकडून नृत्य शिकवणारं व्यासपीठ आम्ही सुरू केलं.
या सर्वांचा उद्देश लोकांना जागतिक दर्जाची माहिती, सेवा आणि उत्पादनं सहज उपलब्ध व्हावीत, हा आहे. आमचीच निर्मिती असलेला ‘पंचक’ हा चित्रपट येत्या ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
जीवनशैलीतील बदलांतून आपण हृदयरोग, रक्तदाब व मधुमेहासारख्या आजारावर सहज मात करू शकतो. स्वतःच्या आरोग्याबद्दल माहिती करून घेत, त्याचा डॅशबोर्ड आपल्यासमोर कायम ठेवत डॉक्टरांच्या मदतीनं आनंदी आयुष्य कसं जगायचं हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. लोकांच्या आयुष्यात हे ऐकून नक्कीच फरक पडेल व हाच माझा उद्देश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.