Swasthyam 2022: संगीत आणि आरोग्याचं कनेक्शन माहितीये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swasthyam 2022

Swasthyam 2022: संगीत आणि आरोग्याचं कनेक्शन माहितीये?

Swasthyam 2022

पुणे : आजच्या आधुनिक स्पर्धात्मक युगात आपल्यापैकी बरेच मानसिक ताणतणावाचा सामना करत असून, त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत संगीत आपल्याला मदत करू शकते. व्यक्तीला अनेक प्रकारचे दुःख विसरायला लावून, आत्मिक आनंद व मानसिक समाधान देण्याचे सामर्थ्य संगीतात आहे. प्रत्येक व्यक्तीच्या दु:खाचे कारण व स्वरूप हे निरनिराळे असते. तसेच, पृथ्वीतलावरील कोणीच दुःखातून सुटलेला नाही. संगीतात प्रचंड सामर्थ्य असून, संगीत ऐकत असताना माणूस स्वतःचे दु:ख विसरून तल्लीन होतो. वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा अनेक काळापासून संगीत उपचाराला व संगीत चिकित्सेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संगीत आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध आहे.

आधुनिक काळातील वैद्यकशास्त्रात सुद्धा संगीत कलेचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. कर्करोग, किडनीविकार, डायलिसिस, हृदयविकार अशा व्याधींच्या उपचारांबरोबर संगीत उपचार व संगीत चिकित्सा किती उपयोगी ठरते यावर संशोधन सुरू आहेत. कर्करोगासारख्या असाध्य आजारांमध्ये केमोथेरपीवेळी संगीत ऐकल्यास केमोथेरपीचे साइड इफेक्ट व केमोथेरपीच्या वेदना कमी होण्यास मदत होते. प्रत्येक व्यक्तीला संगीतातील ताल-लय रुचेल असे नाही. प्रत्येक व्यक्तीची आवड वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीनुसार संगीत कलेचे प्रकार निवडून संगीत उपचार करावे लागतात.

संगीत मनाला शांत, प्रसन्न व स्थिर करते. आजच्या धकाधकीच्या व ताणतणावाच्या काळामध्ये मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी संगीत साधना किंवा संगीत चिकित्सा आवश्यक आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध ‘राग’ यांचा रक्तदाब, ताणतणाव, नैराश्य याशिवाय अनेक व्याधींवर सकारात्मक परिणाम होतो. व वेदनेपासून आराम मिळण्यास मदत होते.

संगीत ऐकल्याने होणारे सकारात्मक बदल

१. ताणतणावाखाली आहेत, त्या नागरिकांसाठी चांगले संगीत ऐकणे फायदेशीर ठरते. अशा व्यक्तींचे मन शांत, प्रसन्न व स्थिर राहून, त्यांना चांगली झोप येण्यास मदत होते. तसेच, संगीत ऐकणे किंवा शिकणे अशा गोष्टींमुळे अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या मानसिक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.

२. विविध मानसिक आणि शारीरिक व्याधींवर उपचार करण्यासाठी संगीत थेरपी महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, संगीत थेरपी सर्व वयोगटातील लोकांच्या उपचारांमध्ये मदत करते. संगीत थेरपीमध्ये संगीत ऐकणे, वाद्य वाजवणे किंवा गाणे लिहिणे यांचा समावेश असतो.

३. संगीताचा व संगीत थेरपीचा मेंदूवर आरामदायी प्रभाव पडतो. संगीत ऐकल्याने शरीरातील हार्मोन्सवर सकारात्मक परिणाम होऊन, चिंता, भीती-विकार, काळजी व नैराश्य आदी विकारांच्या उपचारांमध्ये संगीत थेरपी फायदेशीर ठरू शकते.

ताणतणाव आणि नैराश्य घालवण्यासाठी :

आधुनिक स्पर्धात्मक युगात अनेकजण आपल्या नोकरी/व्यवसायामुळे किंवा कुटुंबातील अस्थिर वातावरणामुळे ताणतणावात आहे. काही जणांना तर छोट्या-मोठ्या गोष्टींचा ताण यायला लागतो. सततच्या ताणतणावामुळे माणसाला नैराश्य येते. आपल्या आयुष्यात सातत्यानं ताणतणावाचा सामना करावा लागत असेल, तर काही गोष्टी जाणीवपूर्वक करून आपला ताणतणाव कमी करू शकता.

१. मनाला समाधान मिळेल असे आवडीचे काम करा ः आधुनिक बदलत्या जीवनशैलीमुळं आपल्याला आपले आवडते काम किंवा छंद जोपासण्यास वेळ मिळत नाही. परंतु, ज्यावेळी आपल्याला ताण येईल त्यावेळी आपण आपले आवडते काम करण्याचा किंवा आवडता छंद पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा. जेणेकरून आपल्या मनाला समाधान मिळेल.

२. पूरक व पौष्टिक आहार घ्या ः ताणतणावाची समस्या कमी करावयाची असेल तर, आपला रोजचा आहार हा चांगला, पौष्टिक आणि संतुलित असायला हवा. पौष्टिक आहारामुळे आपल्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे आपल्याला निराश व हताश वाटत नाही. तसेच, रोजच्या सकस आहाराच्या सवयीमुळे आपले शरीर तंदुरुस्त होऊन, आयुष्यात सकारात्मकता येण्यास मदत होईल.

३. व्यायाम अथवा योगा करा : आपल्या आरोग्यासाठी किंवा शारीरिक तंदुरुस्तीसाठी रोज व्यायाम किंवा ध्यान-धारणा आणि योगसाधना करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ताणतणावाच्या काळात विविध कला जोपासाव्यात (उदा. गायन, वादन, नृत्य) गायन, वादन व नृत्य या तिन्ही कला श्रेष्ठ आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनुसार गायन, वादन व नृत्य अशा कलांमध्ये आपले मन रमवू शकतो. तसेच, चांगली पुस्तकं वाचायाला हवीत, त्यामुळे तणाव आणि नैराश्य कमी होण्यास मदत होईल.

9 ते 11 डिसेंबरदरम्यान पुण्यात स्वास्थ्यम्

आधुनिक व स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात आपले शरीर व मन खूप थकून जाते. त्यामुळे ताण-तणाव वाढून, मानसिक आरोग्य बिघडते. त्यातून नैराश्याच्या प्रमाणात वाढ होते. अनेक प्रयत्न करूनही ताण-तणाव दूर होत नाही. अशा परिस्थितीत शरीर आणि मनाला स्थिर व सुदृढ आरोग्यदायी राखण्यासाठी ध्यान - धारणा, प्राणायाम व योगासने सर्वोत्तम उपाय आहे. तसेच, शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन गरजेचे आहे. नागरिकांची ही गरज ओळखून, ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेअंतर्गत विश्व कल्याणाच्या उद्देशाने ९ ते ११ डिसेंबर दरम्यान पुण्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवसीय संपूर्ण आरोग्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.

असे व्हा सहभागी...

मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता.

व्यक्तिगत सहभागासाठी : व्यक्तीचे नाव, वयोगट, पत्ता, नोकरी/व्यवसाय व संपर्क क्रमांक
संस्था व ग्रुप्सच्या सहभागासाठी : स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्था, ग्रुप्सचे नाव, कार्य व प्रकल्पाची माहिती, पत्ता व संपर्क क्रमांक

Website: https://globalswasthyam.com