
कौरव आणि पांडव यांच्यातलं युद्ध कुरुक्षेत्रावर लढलं गेलं. कौरवांनी पांडवांना फसवून त्यांचं इंद्रप्रस्थ हे राज्य कपटानं बळकवलं. त्यांना बारा वर्षं वनवासात पाठवलं.
Swasthyam 2023 : सत्य-असत्याची लढाई
। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः।। २
कौरव आणि पांडव यांच्यातलं युद्ध कुरुक्षेत्रावर लढलं गेलं. कौरवांनी पांडवांना फसवून त्यांचं इंद्रप्रस्थ हे राज्य कपटानं बळकवलं. त्यांना बारा वर्षं वनवासात पाठवलं. त्यानंतर एक वर्षाचा अज्ञातवाससुद्धा त्यांनी भोगला आणि जेव्हा आपलं हक्काचं राज्य परत मागण्यासाठी ते दुर्योधनाकडं आले, तेव्हा सुईच्या टोकावर मावेल एवढीही भूमी आम्ही पांडवांना देणार नाही, असं त्यानं स्पष्ट सांगितलं.
आणि मग पांडवांना आपले, अधिकार आपलं राज्य परत मिळवण्यासाठी आपल्या चुलत भावांशी युद्ध करण्यावाचून दुसरा पर्याय उरला नाही. बालमित्रांनो, युद्धामध्ये दोन पक्ष होते. एक कौरवांचा तर दुसरा पांडवांचा.
एक असत्याचा तर दुसरा सत्याचा. कौरवांकडं मोठे राज्य होतं, सैन्य होतं, धन होतं. पांडवांकडं मात्र काहीच नव्हतं. मात्र, युद्ध होणार म्हटल्यावर पूर्ण विश्वातून युद्धामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक राजे आपापल्या सैन्यासह उपस्थित झाले.
दोन्हीकडची मिळून १८ अक्षौहिणी सेना कुरुक्षेत्रावर जमली. त्यात रथी, महारथी शूर सेनापती, राजे महाराजे आपापल्या शक्तीनिशी उपस्थित झाले होते. द्वारकेचा राजा श्रीकृष्णाची सर्व सेना कौरवांच्या बाजूनं लढणार होती. आणि पांडवांच्या बाजूनं स्वतः भगवान श्रीकृष्ण होते!!
प्रिय मित्रांनो, पुढं युद्धात काय झालं ते ते आपण उद्याच्या भागात बघूया. तुम्हाला ही कथा कशी वाटली, ते जरूर कळवा...
- श्रुती आपटे