Swasthyam 2023 : अर्ध नौकासन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swasthyam 2023 Naukasana strengthens abdominal muscles and is useful digestion health

आज आपण पोटाच्या स्नायूंची ताकद वाढविणाऱ्या, पचनकार्य सुधारण्यासाठी उपयुक्त अशा नौकासनाविषयी जाणून घेऊ.

Swasthyam 2023 : अर्ध नौकासन

मुलांच्या शारीरिक हालचाली हल्ली खूप कमी झाल्यात. याचे कारण मुलांना सर्वच गोष्टी लगेच उपलब्ध होत आहेत. त्यांना मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड अशा गॅजेट्‌स किंवा ऑनलाईन खेळ खेळणे वाढले आहे. मैदानी खेळ, व्यायाम कमी झाले आहेत. आहाराच्या सवयीही बदलू लागल्या आहेत. चमचमीत, जंक फूड वारंवार खाल्ल्याने सुद्धा वजन वाढू लागते.

ते नियंत्रणात आणण्यासाठी मैदानी खेळांप्रमाणेच योगासनांची सुद्धा खूप मदत होते. पचनसंस्थेचे कार्य सुधारू लागले, की लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. त्यासाठी बरीच आसने आहेत. आज आपण पोटाच्या स्नायूंची ताकद वाढविणाऱ्या, पचनकार्य सुधारण्यासाठी उपयुक्त अशा नौकासनाविषयी जाणून घेऊ.

नौकासनसुद्धा २-३ प्रकारे करता येते. आज आपण सोपा प्रकार बघू या...

  • प्रथम ताठ बसावे.

  • त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात वाकवावेत.

  • दोन्ही पाय सावकाश जमिनीपासून वर उचलावेत.

  • पोटरी जमिनीला समांतर राहतील या पद्धतीने सुरवातीला पायाची स्थिती असावी.

  • दोन्ही हात छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे ठेवावेत.

  • पाठीला बाक नको. मान सरळ, नजर स्थिर व श्‍वास संथ सुरू ठेवावा.

  • अर्ध नौकासन या स्थितीमध्ये मांडी आणि पोटरी यांमध्ये साधारण काटकोन असावा.

आसनाचे फायदे...

आसनस्थितीमध्ये स्थिर राहिल्यावर पोट, मांडी यावर आलेला ताण, दाब जाणवू लागेल. जेवढा नियमित सराव होईल तेवढा शरीरास जास्त लाभ होईल. अतिरिक्त चरबी कमी होणे, पोटातील इंद्रियांची ताकद वाढणे, पचनकार्य सुधारणे, अपचन, गॅसेस, आम्लपित्त इत्यादी त्रास कमी होण्यास मदत होईल. पायाची ताकद वाढेल. एकाग्रता वाढण्यासही उपयोग होईल.

सुरुवातीला पाय वरती उचलायला जमत नसल्यास योगपट्ट्याच्या मदतीने पाय वरती उचलावेत. सर्व मुलांनी नियमित सराव केल्यास नक्कीच फायदा होईल, मात्र मासिक पाळीच्या दिवसांत किंवा ज्या मुलांना पोटाची तीव्र दुखणी किंवा शल्यकर्मे झाली असल्यास योग्य तो सल्ला घेऊनच सराव करावा.

टॅग्स :yogahealth