Swasthyam 2023 : संतुलनासन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swasthyam 2023 yoga health yoga asanas for better posture and strength

संतुलनासन म्हणजेच तोल सांभाळून केलेले आसन. खूप सोपे-साधे आसन आहे. लहान मुलांसाठी खूप उपयुक्त

Swasthyam 2023 : संतुलनासन

संतुलनासन म्हणजेच तोल सांभाळून केलेले आसन. खूप सोपे-साधे आसन आहे. लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आसन आहे. योगासन, प्राणायाम याचा सराव सकाळी लवकर, रिकाम्या पोटी करावा. मात्र, ज्या मुलांच्या शाळा सकाळी असतात त्यांनी सराव संध्याकाळी किंवा त्यांच्या सोयीनुसार करावा. संतुलनासन हे आसन मुले कधीही, म्हणजे शाळेच्या वेळेत, खेळतानाही सहज करू शकतात.

संतुलनासनचा एक प्रकार बघूयात. हे दंडस्थिती, म्हणजेच उभे राहून करण्याचे आसन आहे. या आसनाच्या नावातूनच तोल सांभाळत करण्याचे आसन आहे, हे लक्षात येते. एका पायावर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळून दुसरा पाय गुडघ्यात वाकवून पुढच्या बाजूला वर घ्यावा. गुडघ्याच्या इथे साधारण काटकोन असावा.

मांडी जमिनीला समांतर राहील, अशा पद्धतीने स्थिती असावी. दोन्ही हात वरच्या दिशेला ताणून घ्यावे किंवा नमस्कार स्थितीमध्ये ठेवावे. नजर स्थिर असावी. श्‍वास संथ सुरू ठेवावा. पाठीचा कणा वरच्या दिशेला ताणलेला असावा. जेवढा वेळ आसनस्थितीमध्ये स्थिर राहता येईल तेवढा वेळ स्थिती टिकवावी. आसन सोडले की दुसऱ्या पायानेही करावे.

हे आसन खूप सोपे दिसते, मात्र जेवढा जास्त कालावधी आसनस्थितीमध्ये स्थिर राहाल तेवढा त्या आसनाचे लाभ मिळतील, आसनामध्ये आलेले ताण जाणवतील. रोजच्या सरावाने एकाग्रता वाढते. आपण आसनस्थिती टिकविण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपला श्‍वास संथ सुरू असतो व नजर स्थिर असते. त्यामुळे मन शांत होण्यासही खूप मदत होते. मुलांना रोजच्या जीवनशैलीमध्ये कमी वेळात जास्त अभ्यास किंवा ॲक्‍टिव्हिटी करायच्या असतात, त्यामुळे एकाग्रतेची मन शांत असण्याची खूप आवश्‍यकता आहे. जी मुले खूप चिडचिड, त्रागा करतात त्यांना या आसनाच्या नियमित सरावाने लाभ होईल.

या आसनामध्ये मांडीच्या स्नायूवर ताण येतो. सुरवातीला ज्यांना पायाची ताकद कमी आहे त्यांना मांडी दुखू शकते. मात्र, नियमित सरावाने मांडीची, पाठीच्या स्नायूंची ताकद वाढलेली जाणवेल. ज्यांचे पाय दुखतात त्यांनी सुद्धा हे आसन करून चालेल. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे आसन करण्याचा प्रयत्न करा.

टॅग्स :yogahealth