esakal | आता चहा ठरणार 'गुणकारी'; लहान मुलांवरील संशोधनात मोठं यश
sakal

बोलून बातमी शोधा

Tea

आता चहा ठरणार 'गुणकारी'; लहान मुलांवरील संशोधनात मोठं यश

sakal_logo
By
जयसिंग कुंभार,

सांगली : गर्भवती मातांमध्ये फॉलिक ॲसिड आणि ‘व्हिटॉमिन बी-१२’ ची कमतरता असेल तर होणाऱ्या मुलांमध्ये मेंदू व मज्जारज्जूचे विकार संभवतात. बाळाला कायमचे अपंगत्व येते किंवा मूल मतिमंद होऊ शकते. हे टाळण्यासाठी या घटकांची उणीव भरून काढण्यासाठी ते चहामधून देता येतील का? यासाठीच्या महत्त्वपूर्ण वैद्यकीय संशोधनाला यश आले आहे. प्राथमिक टप्प्यातील निष्कर्षांची दखल वैद्यकीय क्षेत्रातील आंतराष्‍ट्रीय दर्जाच्या ब्रिटिश मेडिकल जर्नलने जून-जुलैच्या अंकात नुकतीच घेतली आहे. या संशोधनाला मिळालेले यश पाहता दरवर्षी देशातील सुमारे सव्वा लाख मुलांच्या वाट्याला येणारे जन्मजात अपंगत्व टाळता येईल. त्यानिमित्ताने भारतीय उपखंडातील चहा अधिक ‘गुणकारी’ होणार आहे.

फॉलिक ॲसिड व व्हिटाॅमीन बी-१२ च्या कमतरतेच्या दुष्परिणामाबाबतचे संशोधन १९९७ पुढे आले. पाश्‍चात्त्य देशांनी या घटकांची मात्रा पॅकिंग गव्हाच्या पिठांममधून देण्याचे राष्ट्रीय धोरण स्वीकारले. मात्र आपल्याकडे आतापर्यंत तसे धोरण नाही. सध्या किमान तीन महिने गरोदरपणापूर्वी आणि नंतर या घटकांच्या गोळ्या दिल्या जातात. मात्र तरीही भारतीय उपखंडातील सर्वच देशात जन्मजात व्यंगाचे प्रमाण आजही मोठे आहे.

२०१८ मध्ये मुंबईत झालेल्या या विषयावरील आंतरराष्ट्रीय मेंदू मज्जारज्जू उपचारविषयक परिषदेत यावर खल झाला. तीस वर्षांहून अधिक काळ संशोधन करणारे अमेरिकेतील इंडियान युनिव्हर्सिटीतील भारतीय वंशाचे प्रा. अशोक ॲन्टोनी, डॉ. गॉडफ्रे ओकले यांनी सांगलीतील डॉ. रवींद्र व्होरा यांच्याशी याबाबत सखोल चर्चा करून त्यासाठीचा कृती कार्यक्रम ठरवला. हे दोघेही गेली तीन वर्षे सांगलीत येऊन डॉ. व्होरा आणि त्यांच्या टीमसोबत काम करतात. बालरोग सर्जन संतोष करमरकर, डॉ. सुधाकर जाधव यांच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी डॉ. मयूर सोनी, डॉ. अपूर्वा झरकर आदींच्या टीमने येथील मानवराहत ट्रस्‍टच्या आर्थिक सहकार्याने हा प्रकल्प तडीस नेला आहे.

डोस चहातूनच का?

भारतीय उपखंडात जवळपास प्रत्येक व्यक्ती चहा घेते. त्यामुळे माध्यम म्हणून चहा निवडण्यात आला. २०१९ मध्ये येथील घाडगे नर्सिंग संस्‍थेतील ५० मुलींना ‘टी बॅग’ मधून मात्रा देण्यात आली. त्यानंतर रक्तचाचण्यांमध्ये फॉलिक ॲसिड आणि व्हिटॉमीन बी-१२ चे अपेक्षित प्रमाण वाढल्याचे दिसून आले. आता भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी मुलींवर तसेच तासगाव तालुक्यात व गडचिरोली जिल्ह्यातील ७५ हजार लोकसंख्येतील पात्र महिलांबाबत हा प्रयोग होणार आहेत. या घटकांची गरज जशी गर्भवती मातांना आहे, तशीच ज्येष्ठांनाही आहे. वयोमानाप्रमाणे अनेकांना हदयरोग जडतो. हृदयरोगास कारण ठरणाऱ्या रक्तवहिन्यांमधील गुठळ्या टाळण्यासाठीही फॉलिक ॲसिड आणि व्हिटाॅमीन बी-१२ या घटकांची शरीराला गरज असते. या संशोधनात हे ही सिद्ध झाले आहे की ही मात्रा दिल्याने चहाच्या चव, गुणवत्ता आणि टिकाऊपणावर कोणताही परिणाम होत नाही.

आरोग्यविषयक सजगतेचा अभाव...

फॉलिक ॲसिड व व्हिटाॅमीन बी -१२ च्या कमतरतेमुळे होणारे व्यंग्य तीन ते चार आठवड्यांचा गर्भातच तयार झालेले असतात. त्यामुळे गर्भधारणेनंतर या घटकांची औषधे देऊन व्यंग टळत नाही. गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांनंतर हा दोष किरकोळ असेल तर दिसत नाही. चौथ्या महिन्यातील सोनोग्राफीत हा दोष स्पष्टपणे दिसतो. मात्र तेव्हा गर्भपात धोक्याचा ठरतो. आपल्याकडे आरोग्यविषयक सजगता नसल्याने उपवर मुलींच्या रक्तचाचण्या होत नाहीत आणि गर्भधारणेपूर्वी या घटकांच्या गोळ्या सुरू न केल्याने हजारात एका मुलाला अपंगत्व येते. भारतात प्रति शेकडा सहा मुलांना कोणते ना कोणते अपंगत्व असते. त्यातल्या एक मुलाला या घटकांच्या कमतरतेमुळे अपंगत्व येते.

थायरॉईड हार्मोन्सची कमतरता भरून काढण्यासाठी २००६ मध्ये कायद्याने मिठात आयोडिनची मात्रा सक्तीची केली. त्याच धर्तीवर चहाबाबतही कायदा करून आवश्‍यक मात्रेत फॉलिक ॲसिड व ‘व्हिटाॅमीन बी-१२’ हे घटक मिसळणे बंधनकारक करावे लागेल. या घटकांची मात्रा गर्भवती मातांबरोबरच हृदयविकाराच्या संभाव्य रुग्णांसाठीही उपयुक्त असेल. ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल'ने या संशोधनाच्या प्राथमिक निष्कर्षांना मान्यता दिली असून, अंतिम निष्कर्षानंतर आम्ही केंद्र सरकार आणि चहा निर्मिती कंपन्याची शिखर संस्था टी बोर्ड ऑफ इंडियाला यासाठीचा प्रस्ताव देणार आहोत.

- डॉ. रवींद्र व्होरा, सदस्य, स्‍पायना बायफिडा फाउंडेशन व जन्मजात व्याधी प्रतिबंध टास्क फोर्स

६० टक्के मुलींमध्ये फॉलिक ॲसिडची तर ८० टक्के मुलींमध्ये ‘व्हिटाॅमीन बी-१२’ची कमतरता आढळली. देशात दरवर्षी एक लाख १५ हजार नवजात अर्भके मेंदूवाढ खुंटलेली आणि मज्जारज्जूचा दोष असलेली जन्मतात. अर्भकांमध्ये मेंदूद्रवाची अतिरिक्त वाढ, मतिमंदत्व, पाठीच्या कण्याजवळ जन्मतः छिद्र असे दोष आढळतात. या व्यंग्यामुळे बालकांना कायमचे अपंगत्व येऊन आयुष्य वेदनामय होते. अशा मुलांच्या वैद्यकीय खर्चामुळे अन्य सुदृढ भावंडाकडे कुटुंबाचे दुर्लक्ष होऊन अपरिमीत राष्ट्रीय हानी होते.

फॉलिक ॲसिड व ‘व्हिटॉमिन बी-१२’च्या

कमतरतेवर उपाय

सांगलीतील संशोधनाची ब्रिटिश मेडिकल जर्नलकडून दखल

देशातील

दरवर्षी सव्वा लाख अर्भकांचे दुर्दैव दूर होणार

loading image