
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे
इंद्रियांनी आणलेली माहिती पहिल्यांदा असते मनाच्या ताब्यात. मन त्या माहितीची तोडफोड करत राहते, कारण मन ज्या इंद्रियाला वश असेल त्या इंद्रियाच्या सुखाचा विचार करते आणि त्या दृष्टीने मन आलेल्या माहितीचे भाग पाडते. मग बुद्धी व विवेक कामाला येतात. जीवात्म्याच्या फायद्याचे काय आहे याचा अत्यंत जागृत अवस्थेत बुद्धीने निर्णय घेणे म्हणजे विवेक. विवेक निर्णय घेण्याचे कार्य करतो. ‘संगतिसंगदोषेण’ म्हणतात तसे बुद्धीसुद्धा मनाच्या सहवासात राहून तिची दुर्बुद्धी झालेली असते. अशी बिघडलेली बुद्धी मनाला वश होते आणि मनाच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेतला जातो. बहुतेकांचा जीवनव्यवहार असाच चालतो. असे चुकीचे निर्णय घेत राहिल्यास नंतर भोगावे लागतात आजार, दारिद्र्य व दुःख.बुद्धीला शुद्ध करण्यासाठी भगवंतांची आराधना करून म्हणजेच मन एकाग्र करून आत्मचिंतनाकडे वळवणे आवश्यक असते.