पारंपरिक आणि पर्यायी औषधोपचार

जुनाट आजाराशी युद्ध करायचं म्हटल्यावर आपल्याला ज्ञात आणि उपलब्ध सर्व पॅथीजची सखोल माहिती हवीच.
Ayurveda
Ayurvedasakal

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

जुनाट आजारांसाठी उत्तर शोधताना डिसीज रिव्हर्सलसोबतच एक महत्त्वाचा पण; कमी चर्चित विषय म्हणजे मुख्य प्रणाली (ॲलोपॅथी) सोडून इतर पर्यायी आणि पारंपरिक औषधोपचार पद्धतीचा वापर. आपल्याला निरनिराळ्या पर्यायी पॅथीज (आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार इत्यादी...) व त्यांची आपल्या आरोग्य आणि आजारामध्ये असलेली उपयुक्तता माहीत असणं महत्त्वाचं आहे.

बहुतांश वेळा आपण मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरकडेच जातो; पण अनेकदा शस्त्रक्रिया टाळायची म्हणून, गोळ्या अजून वाढू नयेत म्हणून किंवा संबंधित औषधोपचारामध्ये एखादा आजार कधीच बरा न होणारा आहे असं सांगितलं जातं म्हणून आपण इतर पद्धतींकडे वळतो. ऑफिसमधील सहकारी, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी हे त्यांच्या अनुभवानुसार होमिओपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचाराचे डॉक्टर आणि दवाखाने सुचवत असतात आणि आपणही बरं होण्याच्या आशेनं तिथं जात असतो.

जुनाट आजाराशी युद्ध करायचं म्हटल्यावर आपल्याला ज्ञात आणि उपलब्ध सर्व पॅथीजची सखोल माहिती हवीच. आपल्या सहा हजार वर्षं जुन्या मानवी संस्कृतीला मॉडर्न मेडिसीन (ॲलोपॅथी) हे अडीचशे वर्षांपूर्वी गवसलेलं वैज्ञानिक वरदान आहे; पण त्या आधी कोणी आजारी पडतच नसेल का? आजारी पडल्यावर औषधोपचार केला जात नसेल का?

सर्वसामान्य लोकांना आरोग्याची काळजी घ्यायला कसं शिकवत असतील? ते नियम कोण बनवत असेल?

तर होय! त्या काळीसुद्धा औषधोपचार केले जात होते, त्याच्याबद्दलचं वैद्यकीय साहित्य आजही उपलब्ध आहे. यामध्ये आयुर्वेद, चिनी, प्राचीन इजिप्शियन उपचारपद्धती इत्यादींचा समावेश आहे.

याच सगळ्याला एक नाव म्हणजे पारंपरिक आणि पर्यायी औषधोपचार पद्धती. हे माझं वैयक्तिक मत नसून जागतिक आरोग्य संघटनेचं (डब्ल्यूएचओ) मत आहे. खरं तर १९९९ मध्येच डब्ल्यूएचओनं पहिली traditional (पारंपरिक) मेडिसीन स्ट्रॅटेजी तयार केली होती.

पारंपरिक औषधोपचार पद्धतीचं महत्त्व सांगताना डब्ल्यूएचओ म्हणते, की आजच्या फार्मास्युटिकल उत्पादनांमधील चाळीस टक्के उत्पादनं आणि अनेक औषधं ही नैसर्गिक औषधांच्या आधारे प्राप्त झाली आहेत. मग ते सॅलिक्स वंशातील विलो झाडापासून बनवलेलं, संधिवात, हार्ट ॲटॅकमध्ये उपयुक्त असलेलं ॲस्पिरीन असो किंवा जंगली रताळ्यापासून बनलेल्या गर्भनिरोधक गोळ्या.

अशी शेकडो उदाहरणं आहेत ज्यामध्ये काही विशिष्ट औषधं आधी पारंपरिक पद्धतीमध्ये वापरली जात आणि नंतर त्यावर संशोधन करून केमिकल औषध बनवलं जाऊ लागलं. त्यामुळे डब्ल्यूएचओच्या मते, पारंपरिक व निसर्गाला अनुसरून वापरत असलेल्या पद्धतींना विसरून चालणार नाही.

डब्ल्यूएचओच्या जागतिक अहवालानुसार (२०१९), संघटनेच्या १९४ सदस्य देशांपैकी १७० देशांनी त्यांच्या पारंपरिक औषधोपचार पद्धतीच्या वापराची कबुली दिली आहे. एकविसाव्या शतकात वाढत्या आरोग्य समस्या, बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे जुनाट आजार, आरोग्यसेवेबाबतच्या वाढत्या गरजा, खर्चांतील वाढ आणि कमी होणाऱ्या तरतुदी यांवर भाष्य करत डब्ल्यूएचओ सांगते, की अनेक देश या अडचणींसोबत झुंजत आहेत आणि या आव्हानांमुळे पारंपरिक औषधोपचार पद्धती झपाट्यानं पुरुज्जीवित होत आहेत.

डब्ल्यूएचओनं TCI (traditional, complementary and integrative medicine) म्हणजे पारंपरिक, पर्यायी आणि एकत्रित औषधोपचार पद्धती अशा नावानं या पॅथीजच्या पुनरुज्जीवनाचं कामही हाती घेतलं आहे. आपण भारतीय नशीबवान आहोत, की आपली पारंपरिक औषधोपचार पद्धती हे खूप सखोल शास्त्र आहे. त्याबाबत संशोधन आणि अभ्यास यांच्या माध्यमातून आपण जुनाट आजारांबाबतच्या लढ्यामध्ये उत्तम कामगिरी करू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com