कर्करोग आणि रजोनिवृत्ती

माझ्या कर्करोगाच्या ट्रीटमेंटमध्ये, मला माझी मासिक पाळी बंद करावी लागणार होती.
cancer
Canceresakal
Updated on

- आशा नेगी

माझ्या कर्करोगाच्या ट्रीटमेंटमध्ये, मला माझी मासिक पाळी बंद करावी लागणार होती. कारण मासिक पाळीमुळे शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे परत कॅन्सर होण्याची शक्यता असते. सध्या केमो चालू होत्या म्हणून, आम्ही मासिक पाळी बंद व्हायचं इंजेक्शन घ्यायचं ठरवलं. तीन महिन्याच्या अंतराने, तीन किंवा चार इंजेक्शन्स घ्यायची होती. केमो पूर्ण होतील, तेव्हा ओव्हरीची शस्त्रक्रिया करायचं आम्ही ठरवलं होतं..

पहिलं इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतलं. डॉक्टरांनी आधीच कल्पना दिली होती. ‘‘इंजेक्शन घेतल्यानंतर त्रास होईल, खूप घाम येईल, चिडचिड वाढेल, मूड स्विंग्ज होतील.’’ विचार केला, ‘बाईपणामध्ये काय काय सहन करावं लागतं, ते बायकांनाच माहीत असतं. त्यातलाच एक प्रकार म्हणजे मोनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती.’

महिलाना वयाच्या एका ठरावीक कालावधीनंतर मेनोपॉजचा काळ अनुभवावा लागतो.रजोनिवृत्ती नैसर्गिक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. मात्र, त्याची लक्षणं आधीपासूनच दिसू लागतात. यामध्ये हॉट फ्लॅशेसचं लक्षण सर्वाधिक दिसून येतं. तसंच भावनिकदृष्ट्या महिलांवर अधिक परिणाम होताना दिसतात. शारीरिक ऊर्जा कमी होते. मेनोपॉजचा भावनांवर नकारात्मक परिणामही होताना दिसतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, मोनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तरीसुद्धा त्या कालावधीमध्ये स्त्रियांना त्रास होतो. डोक्याला घाम येणं, चिडचिड होणं, छोट्या छोट्या गोष्टींवर रडायला येणं.

मनात विचार केला, असं मासिक पाळी बंद होण्याचं इंजेक्शन घेणं म्हणजे अमानुषच नाही का? नैसर्गिक पद्धतीनं बंद होणाऱ्या एखाद्या गोष्टीसाठी आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार असतो; पण एखाद्या आजारामध्ये, इंजेक्शन घेऊन तुम्हाला ती बंद करावी लागली, तर त्याचा त्रास शब्दात व्यक्त न करता येणारा असतो... पण पुन्हा विचार केला हाही एक ट्रीटमेंटचाच भाग आहे.

‘बाईपण देगा देवा’ म्हणत, आयुष्यात आपण खूप चांगल्या गोष्टींचा आनंद घेतला. संसारसुख, नऊ महिन्याचं मूल पोटात असतानाचा कालावधी, त्याच्यानंतर मुलात हरवून गेलेली मी, देवानं माझ्यावर मुक्त ओंजळ करून आनंदाचा वर्षाव केला; पण आता मी अशा काठावर आहे, जिथून माझं बाईपण, स्त्रीपण हरवण्याची भावना माझ्या मनात निर्माण होत होती.

काहीतरी निसटतंय, काहीतरी अमूल्य माझ्यापासून लांब जातंय ती भावना मनात यायला लागली. खरंच, मनुष्यधर्मच तो, प्रत्येक महिन्यात ते चार दिवस. कधी कधी वाटायचं, किती कंटाळवाणे, कटकटीचे आहेत. सॅनिटरी नॅपकिनपासून कधी सुटका होईल, कधी सगळं बंद होईल.... आणि आज नियतीनंच माझी त्यातून सुटका करायची योजना केली आहे, तर ती सुटकाच मला खूप असहनीय होतीये!

क्षणांत विचारांची दिशा कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही. अशा माझ्या विचारांच्या चक्रात भिरभिरणाऱ्या मनाला, परत एका जागेवर आणून, शांत करणं, खरंच कधी कधी थोडं कठीण होऊन जातं. मनाला समजावलं, आयुष्यात आलेल्या चांगल्या गोष्टींबरोबर हीसुद्धा गोष्ट आपल्या नशीबी कधी कधी येणारच होती. फरक एवढाच होता, की ती थोडी लवकर आली. आता तीही आनंदानं स्वीकारली पाहिजे.

आयुष्यात अचानक आलेले धक्के, आपल्याला शांत राहून, सहन करावे लागतात. कर्करोगाच्या प्रवासात मीही खूप काही शिकले. कधीच थांबायचं नाही, कितीही कठीण असलं तरी पुढे जात राहावं. या टप्प्यावर एक जाणीव झाली, की जीवनात काही गोष्टी आपल्यावर लादल्या जातात; पण त्यांना स्वीकारून त्यांच्याशी जुळवून घेतल्यानंच आपण प्रगल्भ होऊ शकतो.

रजोनिवृत्ती आणि कर्करोगाच्या उपचारांच्या त्या काळात, मी केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आणि भावनिक ताकदही मिळवली. स्वीकार करण्याची क्षमता हेच खरं सामर्थ्य आहे. म्हणूनच, आयुष्याच्या कोणत्याही अवस्थेत, आपण त्या परिस्थितीला स्वीकारलं पाहिजे आणि त्यातून शिकून, पुढे जात राहावं. जीवन म्हणजे एक अविरत प्रवास आहे आणि प्रत्येक लहान-मोठी गोष्ट आपल्या विकासासाठी महत्त्वाची असते. स्वीकारा, त्यातली सुंदरता शोधा आणि आयुष्याला पूर्णपणे अनुभवून आनंद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com