esakal | लघवीशी संबंधित ५ धोकादायक लक्षणं; पुरूषांनी चुकूनही करू नये दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Urination

लघवीशी संबंधित ५ धोकादायक लक्षणं; पुरूषांनी चुकूनही करू नये दुर्लक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लघवीशी संबंधित समस्यांना लोक फारसं गांभीर्याने घेत नाहीत. परंतु या समस्या बऱ्याचदा लोकांना अडचणीत आणू शकतात. वाढत्या वयानुसार उत्सर्जन आणि प्रजनन संस्थेशी संबंधित समस्या देखील वाढतात. त्यांची लक्षणे ही अत्यंत सामान्य असतात आणि त्यांना वार्धक्याचा नैसर्गिक भाग मानले जाते.

लघवीशी संबंधित अशा ५ लक्षणांबद्दल आपण जाणून घेऊ, ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

1) लघवीमधून रक्त येणं.

जर एखाद्या व्यक्तीच्या लघवीमधून रक्त येत असेल, तर त्याने डॉक्टरांशी संपर्क साधण्यास अजिबात विलंब करू नये. हे मूत्राशयाचा कर्करोग, मूत्रपिंडाचा कर्करोग किंवा मुतखड्याचे लक्षण असू शकते. अगदी पहिल्यांदा जरी लघवीमधून रक्त आले, तरी रुग्णाने त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.

2) लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे.

लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे तसेच टोचल्यासारखं होणे, ही मोठ्या समस्येची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं मूत्रमार्गातील संक्रमणाशी संबंधितही असू शकतात. बऱ्याचदा पेशी किंवा उतींच्या ऱ्हासामुळे तसेच कर्करोगामुळे देखील ही लक्षणं दिसून येतात. जर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास सातत्याने होत असेल, तर तुम्हाला डॉक्टरांकडे जायलाच हवे.

3) लघवी करताना अडचण

लघवी प्रक्रियेमध्ये बदल होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात. लघवीच्या वारंवारतेतील बदल, एकदम लघवीला येणे, लघवीचा दाब किंवा कमकुवत मूत्र प्रवाह यांसारख्या लक्षणांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. हे प्रोस्टेटशी संबंधित बदल असू शकतात. बऱ्याचदा ही लक्षणं न्यूरोलॉजिक रोग, आहार किंवा औषधांशी संबंधित असू शकतात.

4) प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन (पीएसए) स्तर

प्राथमिक तपासणीचा भाग म्हणून नियमित तुम्हाला पीएसए चाचणी करता येऊ शकते. खरंतर पीएसए चाचणी प्रोस्टेट कर्करोगाच्या तपासणीसाठी केली जाते. सामान्यतः रक्तप्रवाहात पीएसएची पातळी खूप कमी असते. रक्तातील पीएसएच्या पातळीतील बदलावरून डॉक्टर रोगांचे निदान करु शकतात.

5) अंडकोषातील वेदना

अंडकोषात कोणत्याही प्रकारच्या वेदना किंवा गाठ असल्यास यूरोलॉजिस्ट तज्ञांकडून तपासणी करणे गरजेचे आहे. जर योग्य वेळेत निदान झाले, तर त्यावर उपचार शक्य आहेत. त्यामुळे तपासणी करण्यात अजिबात उशीर करू नका.

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर त्वरित तपासणी करा आणि भविष्यात उद्भवू पाहणाऱ्या समस्यांपासून स्वतःला दूर ठेवा.

loading image
go to top