शरीरातील जलसंतुलन

सगळ्या आयुष्याचा खरा आधार कोण आहे, असा विचार केला तर प्रत्येकाचे उत्तर जल-पाणी असेच येणार आहे. पाणी नसते तर पृथ्वीवर कोणतेही जीवन अस्तित्वात राहू शकले नसते.
Water balance in the body
Water balance in the bodysakal

- डॉ. मालविका तांबे

सगळ्या आयुष्याचा खरा आधार कोण आहे, असा विचार केला तर प्रत्येकाचे उत्तर जल-पाणी असेच येणार आहे. पाणी नसते तर पृथ्वीवर कोणतेही जीवन अस्तित्वात राहू शकले नसते. एकपेशीय अस्तित्वापासून ते मनुष्यापर्यंत सगळ्यांनाच जगण्यासाठी पाणी गरजेचे असते. आयुर्वेदात जल हे पंचमहाभूतांपैकी एक सांगितलेले आहे, ज्याच्यातून आपले संपूर्ण शरीर तयार होते. पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

आपल्या आयुष्यात पाण्याचा वापर अनेक स्तरांवर केला जातो. जी गोष्ट आपले शरीर बनवत असेल तिच्या शुद्धीचा विचार आधी करावा लागतो. म्हणूनच सगळ्यांत महत्त्वाचे असते पिण्याचे पाणी. पिण्याचे पाणी शुद्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे फक्त संक्रामक रोगांना प्रतिबंध होतो असे नव्हे तर आपले संपूर्ण आरोग्य खरे तर पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.

कशा प्रकारचे पाणी येते आहे यावर अवलंबून नसून ते पाणी कशा प्रकारे वापरले जाते आहे यावरही अवलंबून असते. अर्थातच पाणी रसायनांपासून, कृमींपासून, सगळ्या प्रकारच्या दोषांपासून तर मुक्त असलेच पाहिजे, पण पाणी कसे असावे व त्याबद्दल काय काळजी घ्यायला हवी हे आपण जलदिनानिमित्त जाणून घेऊ या.

आयुर्वेदानुसार आपले संपूर्ण आयुष्य जल महाभूतावर अवलंबून असते. एवढेच नव्हे तर आपल्याला येणारी अन्नाची चव अर्थात रससुद्धा जल महाभूतामुळेच असते. आपल्या शरीराच्या सर्व चयापचय क्रिया जल महाभूतावर अवलंबून असतात. एवढेच नव्हे तर आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे ‘आपः सर्वस्य भेषजः’ म्हणजे पाणी सगळ्यांचे औषध आहे. त्यामुळे पाण्याचे नियम आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू या.

1) पाणी ताजे व शुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. फार दिवस साठवून ठेवलेले पाणी आरोग्यासाठी हितकर नसते.

2) शक्यतो वाहत्या झऱ्याचे, नदीचे पाणी वापरणे जास्त उत्तम. आयुर्वेदात तर पावसाळ्यात एकत्र केलेले पाणी दिव्यजल असल्याचे सांगितलेले आहे. अर्थातच त्या काळात वातावरणात प्रदूषण नसल्यामुळे पावसाळ्यातील पाणी शुद्ध असे. सध्या मात्र पावसाचे पाणीसुद्धा अशुद्ध असण्याची शक्यता जास्त असते किंबहुना ते अशुद्धच असते. त्यामुळेच शुद्ध करण्याच्या दृष्टीने पाणी उकळून वापरणे सर्वांत उत्तम.

3) शुद्ध शीत जल म्हणजे उकळून गार केलेले पाणी पिण्याकरिता उत्तम सांगितलेले आहे. वाळा, चंदन, नागरमोथा वगैरेंनीयुक्त जलसंतुलन टाकून उकळलेले पाणी अत्यंत उत्तम असते.

4) आरोग्यासाठी सुवर्ण आयुर्वेदात नियमित घ्यायला सांगितलेले आहे. संस्कार ग्रहण करण्याची पाण्याची क्षमता जास्त असल्यामुळे सोने टाकून उकळून तयार झालेले सुवर्णसंस्कारित जल घेणे उत्तम. सुवर्णसंस्कारित जलाविषयी संपूर्ण माहिती डॉ. मालविका तांबे यू-ट्यूब चॅनेलवर व्हिडिओमध्ये दिलेली आहे.

5) मात्रा : पाणी किती प्यावे याबद्दल सर्वत्र संभ्रम दिसतो. याकरिता सगळ्यात उत्तम उत्तर असे आहे की, तहान लागेल तेवढे पाणी प्यावे. प्रत्येकाला रोज साधारण दोन लिटर पाण्याची आवश्यकता असते. पित्तप्रकृतीच्या व्यक्तीला तहान जास्त लागते, तर कफ प्रकृतीच्या व्यक्तीला कमी पाणी पुरते. त्यामुळे प्रकृतिनुसार २ ते ३ लिटर पाणी प्रत्येकाने प्यावे. सकाळच्या वेळी बरेच जण जास्त प्रमाणात पाणी पितात, जेणेकरून पोट साफ व्हायला मदत मिळते. पण अशा प्रकारे जास्त पाणी प्यायल्यामुळे मंदाग्नी होण्याची शक्यता असते. एकाच वेळी फार जास्त प्रमाणात पाणी पिणे चांगले नसते. तहान लागेल तसे थोडे थोडे पाणी पिणे किंवा मध्ये मध्ये एक एक घोट पाणी पिणे चांगले.

6) वेळा : सकाळच्या वेळी उठल्यावर थोड्या प्रमाणात कोमट किंवा उकळून गार केलेले पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम. प्रकृतीनुसार अर्धा ते एक ग्लास पाणी घेता येते. जेवणात थोड्या प्रमाणात पाणी पिणे पचनासाठी उत्तम असते. २-४ घासांनंतर एक घोट पाणी घेतल्यास खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन व्हायला मदत मिळते. जेवणाच्या आधी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्याची व जेवणानंतर पाणी प्यायल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. भूक लागलेली असताना पाणी पिऊन भूक कमी करू नये. भुकेच्या वेळी अन्न घेतले व तहानेच्या वेळी पाणी प्यायले तरच आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत मिळते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांनाच तहान जास्त लागते. तेव्हा जास्त पाणी प्यायले तर चालू शकते, इतर वेळी जास्त पाणी पिण्याने अरुची, सर्दी, उलट्या वगैरेंसारखे त्रास होताना दिसू शकतात.

7) गार पाणी की गरम पाणी? : ज्यांना पित्ताचा त्रास आहे, ज्यांना शरीरात फार जास्त प्रमाणात उष्णता जाणवते, ज्यांना लघवीला जळजळ होते आहे, ज्यांना चक्कर येते आहे, ज्यांना उलटीसारखे वाटते आहे, नाकातून रक्त येते आहे अशांनी गार पाणी पिणे चांगले. अपचनाचा त्रास असणाऱ्यांनी, छातीत वा श्‍वसनसंस्थेचा त्रास असणाऱ्यांनी, वातरोग असणाऱ्यांनी, घसा पकडला आहे अशांनी, ताप आलेला असणाऱ्यांनी शक्यतो कोमट वा गरम पाणी पिणे जास्त बरे असते.

8) पाण्यावरचे संस्कार : पूर्वी सांगितल्याप्रमाणे पाणी औषधासारखे वापरता येऊ शकते व त्यावर संस्कारही करता येऊ शकतात. जलसंतुलनसंस्कारित व सुवर्णसंस्कारित पाणी घेणे

उत्तमच आहे, पण पाण्यात अन्य वनस्पती घालूनही पाणी संस्कारित करता येते, उदा. तुळस वा दालचिनी घालून घेतलेले पाणी श्‍वसनसंस्थेसाठी उत्तम असते.

जिरे, धणे टाकून घेतलेले पाणी मूत्रसंस्थेसाठी उत्तम असते. लिंबू, जिरे वगैरे घालून तयार केलेले पाणी पचनसंस्थेसाठी चांगले असते. गरम पाण्यात गवती चहा, आले, पुदिना, तुळस घालून भिजत ठेवून घेतले तर तेही पचनासाठी उत्तम असते.

9) पात्र : पाणी उकळण्यासाठी तांब्याचे भांडे वापरणे सर्वांत उत्तम. पाणी साठवून ठेवण्यासाठी मातीचा माठ, जमत असल्यास चांदीचे भांडे वापरणे उत्तम. पाणी प्लॅस्टिकच्या संपर्कात येऊ देऊ नये. पात्राचा संस्कार पाण्यावर होऊन त्याचे तशा प्रकारचे गुण आपल्या शरीरात जातात.

उचित प्रकारचे व उचित प्रमाणात प्यायलेले पाणी जीवनीय अर्थात आयुष्याची गुणवत्ता वाढविणारे, तर्पण करणारे असते, हृद्य असते, चित्ताला व पोटाला शांत करणारे असते, बुद्धिप्रबोधन करणारे, तसेच अमृतासारखे असते. त्यामुळे पाण्याचे महत्त्व आपल्या आयुष्यात समजून घेऊन त्याचा उचित प्रमाणात व उचित प्रकारे वापर करणे आरोग्यासाठी अत्यंत हितकारी ठरू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com