
Mouth Diseases: अन्नाच्या पचनाची सुरवात करून अन्नाला शरीरात प्रवेश करू देणे हे तोंडाचे प्रमुख कार्य होय. याखेरीज बोलताना अनेक उच्चार करण्याचेही कार्य तोंडानेच होते. चेहऱ्यावर दिसणारे अनेक भाव तोंडाच्या बाजूच्या स्नायूंच्या आकुंचनामुळेच प्रगट होऊ शकतात. तोंडाच्या छताला असणाऱ्या भागाला "हार्ड पॅलेट' म्हणतात. यामुळे तोंड आणि नाक या भागात एक विभाजक पडदा निर्माण होतो.
तोंडात जीभ असते. चव समजणे, अन्न चावले जाण्यात मोठी मदत करणे, अन्न गिळण्याची सुरवात करणे आणि बोलणे, ही जिभेची कार्ये सर्वविद् आहेत. पुढे आणि बाजूने हिरड्या आणि दात असतात. मागच्या बाजूने घसा असतो. घशाच्या सुरवातीला दोन्ही बाजूंना टॉन्सिल्स या ग्रंथी असतात. तोंडाचे अस्तर लाळेने सतत आर्द्र ठेवले जाते. ही आर्द्रता ठेवणाऱ्या लाळेने अन्नाचे पचन होणे, अन्न चांगले चावले जाणे आणि गिळता येणे, या क्रिया सुकर होतात.