World Autism Awareness Day 2024 : मूल स्वमग्न असेल तर कसे ओळखावे? जाणून घ्या लक्षणे

स्वतःच्याच विश्वात सातत्याने रमणे म्हणजे ‘स्वमग्नतेची स्थिती’ असे म्हणता येईल. मंगळवारी (ता. २) ‘जागतिक स्वमग्नता दिवस’ आहे. त्यानिमित्त...
World Autism Awareness Day 2024
World Autism Awareness Day 2024esakal

साधना गोडबोले

World Autism Awareness Day 2024 : स्वमग्न मुले वास्तव परिस्थितीपासून अलिप्त राहतात. भोवतालच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांशी संपर्क साधत नाहीत. त्यांच्याशी काहीच देणे-घेणे नाही असे वागतात. म्हणजेच ही एक भाषेच्या संप्रेषणाची किंवा देवाण-घेवाणाची समस्या आहे. त्यामुळे मुलांना स्वतःला काय हवे आहे, ते नेमकेपणाने सांगता येत नाही.

त्याचप्रमाणे आई-वडील जवळपासचे लोक आपल्याला काय सांगतात ते त्यांना समजत नाही. मुलांमध्ये मुलींपेक्षा स्वमग्नतेचे प्रमाण जास्त असते (४:१) ७५ टक्के मुलांमध्ये अध्ययन अक्षमता असू शकते.

स्वमग्नतेची लक्षणे :

१. नजरेला नजर देत नाहीत.

२. आवाजाला प्रतिसाद देत नाहीत.

३. कल्पनासृष्टी जवळ-जवळ नसतेच, उदा, घोडा खेळणे, बाहुला बाहुलीचे लग्न

४. स्वतःमध्ये मग्न असतात.

५. स्वतः च्या कोषात रहायला आवडते.

६. बहुतांश वेळा नैसर्गिक विधींवर नियंत्रण नसते.

७. यातील ५० टक्के मुलांना कधीही बोलता न येणे.

८. अतिचंचल असतात.

९. इंद्रियाचे समतोल एकत्रीकरण नसणे

१०. त्याच त्या गोष्टी करण्यास आवडणे, बदल स्वीकारण्यास विरोध इ.

स्वमग्नतेस कारणीभूत असू शकणाऱ्या काही कारणांपैकी मुख्य कारण म्हणजे आनुवंशिकता. या व्यतिरिक्त मातेच्या गरोदरपणात दिली जाणारी काही विशिष्ट औषधे उदाः वाढलेला रक्तदाब, मधुमेह यासाठी दिली जाणारी औषधे, आई-वडिलांचे वाढलेले वय, अल्कोहोलचा वापर, मातेचे कुपोषण किंवा प्रसूती दरम्यान होणारी गुंतागुंत ही देखील आणखी काही कारणे असू शकतात. लसीकरणामुळे किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तींचे मुलासोबतचे वागणे यामुळे स्वमग्नता असू शकण्याचा कुठलाही ठोस पुरावा उपलब्ध नाही.

‘प्रसन्न ऑटिझम सेंटर’ ही स्वमग्न (ऑटिस्टिक) मुलांसाठी कार्य करणारी संस्था असून तिची स्थापना पाच जून २००० रोजी कै. श्रीमती पद्मजा गोडबोले यांनी केली. एकाच ठिकाणी मुलांना सर्व थेरपी दिल्या जातात.

स्वमग्न मुलांसाठी त्यांच्या समस्या लक्षात घेऊन गरजेनुसार विविध उपचारपद्धती वापरल्या जातात. ऑक्युपेशनल थेरपी (O.T.), स्पीच थेरपी, बिहेव्हेरियल थेरपी या महत्त्वाच्या पद्धतीखेरीज योगासने, संगीत (गायन व वादन), नाच, चित्रबोली व व्यायामासाठी ट्रेड मिल, ट्रेनर सायकल वापरल्या जातात.

प्रत्येक मुलाची गरज, क्षमता, अक्षमता लक्षात घेऊन त्याचा स्वतःचा असा शैक्षणिक कार्यक्रम बनवला जातो. मुलाच्या अपेक्षित विकासाकरिता पालकांचा सहभाग तितकाच आवश्यक असतो. त्यादृष्टीने पालकांना मार्गदर्शन व मदत केली जाते. त्याचबरोबर बाहेरगावाहून आलेल्या स्वमग्न मुलाचे कमीत कमी एक आठवडा परीक्षण (मूल्यमापन) करतो. त्याच्या आई-वडिलांना या मुलांना कसे सांभाळायचे याविषयीचे प्रशिक्षण दिले जाते.

१४ ते १७ वर्षे वयोगटातील स्वमग्न मुलांसाठी त्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ‘प्रसन्न ऑटिझम प्री-व्होकेशनल स्कूल’ ही शाखा एक ऑगस्ट २०१२ पासून वेगळ्या जागेत सुरू केली आहे. याअंतर्गत या मुलांना ग्रीटिंग कार्ड, पाकिटे बनविणे, गणपती पूजेच्या साहित्याचे बटवे, आटा चक्की चालविणे, पणत्या, जेली बैंक्स पणत्या बनविणे इ. व्यावसायिक शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

स्वमग्न मुलाला काहीच भवितव्य नाही असे अजिबात मानायला नको. प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान एक तरी वेगळा गुण असतोच. या मुलांच्या अंगभूत कलागुणांना शोधून, वाव देवून तो वाढीस कसा लागेल, याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे आणि आमच्या केंद्रात तोच प्रयत्न सुरू असतो.

(लेखिका ‘प्रसन्न ऑटिझम सेंटर’च्या व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

World Autism Awareness Day 2024
Health News : डोकेदुखीचे तब्बल 150 प्रकार असू शकतात; 17 कोटी लोकं या आजाराने त्रस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com