

"हॉर्मोन्स की समाज?" स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर केवळ शरीराचाच नाही, तर आजूबाजूच्या वातावरणाचाही मोठा प्रभाव; वाचा सविस्तर.
Sakal
डॉ. मृदुला आपटे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट
पुरुषांनाही मानसिक समस्या असतातच; मग स्त्रियांचा नेहमी वेगळा विचार का केला जातो/ का करायला हवा?... त्याला काही विशिष्ट सामाजिक कारणे आहेत. प्रत्येक व्यक्तीची विचारप्रक्रिया घडताना अशा आजूबाजूच्या विविध कारणांचा प्रभाव पडत असतो.
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असलेली ऋता स्वानंदीसमवेत बसली होती. स्वानंदी एक प्रशिक्षण घेत असलेली मानसशास्त्रज्ञ होती आणि ऋताच्या केंद्रात इंटर्नशिप पूर्ण करत होती. स्वानंदीला काही प्रश्न पडले होते.
‘‘मॅडम, मला वाटतं की स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही मानसिक आरोग्याच्या समस्या असतात. पण मग स्त्रियांच्या मानसिक समस्या पुरुषांपेक्षा वेगळ्या कशा काय? पुरुषांनाही आयुष्यात अनेक समस्या येतातच आणि त्यांनाही खूप ताणतणावांचा सामना करावा लागतोच...’’
ऋता हसली आणि म्हणाली, ‘‘प्रत्येक व्यक्तीला काही ना काही समस्या असतात आणि त्यांची इतरांशी तुलनाही करता येत नाही. पण स्त्रिया आणि पुरुष यांच्या मानसिक आरोग्यातल्या फरकाबद्दल बोलायचे असेल, तर काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. आकडेवारीनुसार स्त्रियांना नैराश्य (डिप्रेशन) आणि चिंता (अँग्झायटी) यांसारख्या सामान्य मानसिक विकारांचा पुरुषांपेक्षा जास्त त्रास होतो. गंभीर मानसिक विकारांमध्ये मात्र पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये साधारणपणे समसमान प्रमाण आहे. स्त्रियांमध्ये आत्महत्या करण्याच्या प्रयत्नांचे प्रमाण जास्त असते, तर पुरुषांमध्ये पूर्ण झालेल्या आत्महत्या अधिक दिसतात. सध्या पुरुषांमध्ये व्यसनाधीनता आणि आवेग नियंत्रण विकार (‘इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर्स’) जास्त आढळतात.’’
स्वानंदीचा पुढचा प्रश्न तयारच होता- ‘‘नैराश्य आणि चिंतेच्या बाबतीत स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा दुप्पट का असते? त्या जैविकदृष्ट्या त्याबाबतीत जास्त संवेदनशील असतात का? की हे हॉर्मोनल बदलांमुळे होते?’’