
कावीळ म्हणजे यकृतावर होणारी सूज!
अकोला : भारतात कावीळ या आजराने ग्रस्त असलेल्यांची संख्या अफाट आहे. कावीळ या रोगावर योग्य उपचार नाही झाले, तर रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. भारतात दरवर्षी हेपेटाइटिसमुळे २५ लाख रुग्ण मरण पावतात. म्हणून कावीळ हे प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. थोडक्यात कावीळ म्हणजे यकृतावर होणारी सूज होय, अशी माहिती अकोला येथील पोट आणि लीवर विकार तज्ज्ञ डॉ. शिवाजी ठाकरे यांनी दिली.
जागतिक कावीळ दिनानिमित कावीळ जनजागरण संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. शिवाजी ठाकरे यानी कावीळ या रोगाची माहिती दिली. कावीळ म्हणजे यकृतावर होणारी सूज होय. या सुजेला कारणीभूत असलेले आतापर्यंत पाच प्रकारचे व्हायरस ए, बी, सी, डी, ई हे ओळखण्यात आले आहेत. या सर्वामध्ये ‘हेपेटाइटिस-बी’ आणि ‘हेपेटाइटिस-सी’ हा वायरस जास्त महत्वपूर्ण असून या व्हायरसची लागण झालेले रुग्ण सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यापैकी ‘हिपेटायटीस बी’ यावर औषधे उपलब्ध असले तरी निरंतर लसीकरण उपचार हाच योग्य उपाय आहे.
तसेच टक्केवारी नुसार ‘हिपेटायटीस बी-२-५’ व ‘हिपेटायटीस सी-१-२ टक्के असल्याचे मत डॉ. शिवाजी ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. हॅपीटायटीस बी व सी हे जास्त घातक असून यात डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेणे गरजेचे आहे. कावीळ रोगाची लक्षणे प्रथम रुग्णाना समजत नाहीत. त्यामुळे रुग्ण या आजाराने बाधित आहे की नाही हे कळत नाही. हळूहळू मात्र या विषाणूच्या प्रभावाने यकृतावर सूज निर्माण होऊन त्यातील पेशी नष्ट होऊन यकृत कडक होते.
अशी आहेत लक्षणे
भूक न लागणे, अशक्तपणा, पिवळेपणा, लघवी पिवळी होणे, डोळे पिवळे होणे, त्वचा पिवळी होणे, मळमळ व उलटी, शरीराला खाज, उजव्या कुशीत दुखणे ही या काविळीची प्राथमिक लक्षणे असून या रोगाची अंतिम पातळी म्हणजे यकृताचा कर्करोग आहे. निदान होईपर्यत यकृत अर्ध्याहून अधिक निकामी होऊन कर्करोग होऊ शकतो. यावर यकृत प्रत्यारोपण हा एकमेव उपाय या घातक रोगावर असून जो लाखांपैकी एकाद्या रुग्णाला शक्य असतो.
आधी तपासणी नंतर निदान
हिपटायटीस अर्थात कावीळ या विषाणूची लागण झाली की नाही हे रक्त व लघवी, लिव्हर फंक्शन टेस्ट, लिव्हर बायोप्सी, लिव्हर एक्सरे परीक्षण आणि अल्ट्रासाउंड या तपासणीद्वारे रुग्णाला कळू शकते. या रोगाची कारणे निरनिराळी असली तरी घरातील कोणालाही या रोगाची बाधा झाली असल्यास असुरक्षित यौन संबंध, बाधित व्यक्तीचे रक्त घेतले असल्यास या विषाणूने बाधित सुईने किवा इंजेक्शन दिल्यास, टैटू अर्थात गोंदण करून घेतल्यावर, संक्रमण झाल्यास, दूषित पाणी पिल्यास, गरोदर स्त्री कडून तिच्या नवजात बालकांमध्ये, रक्त, मूत्र, वीर्य आदी मधून हा रोग पसरतो.
Web Title: World Jaundice Day Public Awareness Health News Updates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..