
जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन विशेष : फुफ्फुसाचा होतोय कोळसा...धूम्रपान टाळा
नागपूर - काही लोकांसाठी धूम्रपान करणे स्टेट्स सिंबल आहे तर काही जणांसाठी फॅशन. पण नव्याने फोफावत जाणाऱ्या या संस्कृतीचे तोटे अधिक आहेत. ज्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होतो त्यापैकी ९० टक्के नागरिकांना धूम्रपान केल्याने या जीवघेण्या आपत्तीला सामोरे जावे लागते, असे निरीक्षण फुफ्फुसरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे. तसेच डॉक्टरांनी केलेल्या सर्वेक्षणातून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
जगाच्या पाठीवर दरवर्षी ६० लाख लोक तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या रोगांमुळे मृत्युमुखी पडतात. अन्य देशांच्या तुलनेत सिगारेट आणि तंबाखूचे व्यसन करणाऱ्यांची संख्या अधिक आहे, यामुळेच भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविले आहे. दरवर्षी नवीन निदान होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी ७ टक्के कर्करोग हे फुफ्फुसांचे असतात. आकड्यांमध्ये सांगायचे झाले तर तब्बल सत्तर हजार नवीन रुग्णांचे दरवर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान होते, अशी माहिती फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली.
फुफ्फुसाच्या कर्करोगाची कारणे
९० टक्के कारण धूम्रपानाचे व्यसन
आनुवंशिकता
कंपनीतील धूर, वातावरणातील वाढते प्रदूषण
लक्षणे
दीर्घकाळ खोकला
कफ असणे
खोकल्यातून थुंकीद्वारे रक्त जाणे
श्वास घेताना त्रास होणे
चेहरा व आवाजात बदल होणे
रोगप्रतिकार शक्ती कमी कमी होणे
फुफ्फुसाचा संसर्ग व न्यूमोनिया होणे
दीर्घकाळ ताप असणे
अशक्तपणा असणे
वजन कमी होणे
धूम्रपान करणाऱ्यांसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही धुरामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. धूम्रपानात अनेक जण फिल्टर, डबल फिल्टरचा वापर करतात. परंतु तरीही फिल्टरमधून सूक्ष्म कण खोलवर पोहोचून आतमध्ये फुफ्फुसात कर्करोग निर्माण करतात. धूम्रपानापासून दूर राहिले पाहिजे.
- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ, नागपूर.
धूम्रपान करणाऱ्यांना किंवा इतराहांनाही पूर्वलक्षणे दिसल्यास तत्काळ निदान करवून घेतले पाहिजे. आधुनिक निदान प्रक्रिया ‘क्रायो बायस्पी’सह अन्य निदान प्रक्रियांसोबतच महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे कर्करोगाचे निदान होऊन पुढील उपचारांची दिशा ठरविता येते.
- डॉ. परिमल देशपांडे, श्वसनरोगतज्ज्ञ, नागपूर.
Web Title: World Lung Cancer Day Special 90 Percent Of Lung Cancers Caused By Smoking
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..