Union Budget 2021 : एकमेव ब्लॅक बजेटचं महाराष्ट्र कनेक्शन आणि बरंच काही!

Yashwantrao Chavan
Yashwantrao Chavan

नवी दिल्ली - देशाच्या अर्थसंकल्पावर  (Budget) सर्व देशवासियांच्या नजरा असतात. सरकार  कोणत्या गोष्टीला प्राधान्य देते आणि त्यांचा संकल्प योग्य मार्गाने सुरु आहे का? याचा लेखाजोखा अर्थसंकल्पातून दिसून येतो. देशातील नागरिकांना अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा असतात. त्यामुळेच कोरोनाच्या संकटानंतर सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. या अर्थसंकल्पापूर्वी जाणून घेऊयात बजेटशी संदर्भात काही खास गोष्टी ज्या तुम्हाला कदाचित माहित नसतील. 

देशात पहिला अर्थसंकल्प कधी सादर झाला?
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन महिन्यात पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 26 नोव्हेंबर 1947 रोजी पहिला अर्थसंकल्प सादर झाला.  देशाचे पहिले अर्थमंत्री  आर के षणमुखम शेट्टी यांनी देशाचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला होता.

1947 मध्ये सादर करण्यात आलेल्या पहिल्या अर्थसंकल्पापासून ते 2019 पर्यंत संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पापर्यंत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्यामध्ये मोरारजी देसाई यांचे नाव आघाडीवर आहे. भारताच्या अर्थसंकल्पाच्या इतिहासात त्यांनी सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात 8 पूर्ण तर 2 अंतरिम अर्थसंकल्पाचा समावेश आहे. मोरारजी देसाई हे देशाचे पंतप्रधान होते हे सर्वांना माहित आहे. पण त्यांनी अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे हे खूप कमी लोकांना माहित आहे. देसाई यांनी 1959 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांची जबाबदारी सांभाळली होती.  

मोरारजी देसाई यांच्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कोण? 
मोरारजी देसाई यांच्यानंतर सर्वाधिक वेळा संसदेत अर्थसंकल्प सादर करणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे पी चिदंम्बरम यांचा क्रमाक लागतो. त्यांनी 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.  

देशाचा अर्थसंकल्प 7 पेक्षा अधिकवेळा सादर करणाऱ्या नेत्यांची  यादीही मोठी आहे. सीडी देशमुख, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, आयबी चौहान आणि यशवंत सिन्हा या नेत्यांनी 7 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

3 नेत्यांनी सातत्याने पाचवेळा सादर केलाय अर्थसंकल्प 
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, यशवंत सिन्हा आणि अरुण जेटली या तीन दिग्गज नेत्यांनी सातत्याने पाचवेळा अर्थसंकल्प सादर केलाय.  
अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामण पहिल्या महिला अर्थमंत्री नाहीत.

देशाच्या अर्थसंकल्पासंदर्भातील इतिहास पाहिला तर निर्मला सीतारामण या पहिल्या महिला अर्थमंत्री नाहीत. त्यांच्यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही अर्थसंकल्प सादर केला होता. 1970-71 मध्ये इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.  

2017 मध्ये अर्थसंकल्पात झाला मोठा बदल 
2017 पूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्र्यपणे सादर करण्यात येत होता. मात्र मोदी सरकारने रेल्वे अर्थसंकल्प हा पूर्ण बजेटमध्ये समाविष्ट केला.  

ब्लॅक बजेट 
1973 मध्ये सादर करण्यात आलेल्या देशाच्या अर्थसंकल्पाला ब्लॅक बजेट म्हणून ओळखले जाते. या बजेटमध्ये  550 कोटीपेक्षा अधिक तोटा झाल्याचे समोर आले होते. यशवंतराव चव्हाण यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com