साप्ताहिक राशिभविष्य : (११ ते १७ मे २०२५ )
नोकरीत मानांकन मिळेल
मेष : पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र तरुणांना छानच राहील. शिक्षण, विवाह, नोकरी आदी बाबींमध्ये विविध मार्ग खुले होतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मानांकनाचा लाभ होईल. ता. १५ ते १७ हे दिवस एकूणच आपल्या राशीस अनेक माध्यमातून लाभदायक राहतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सहली, मौज-मस्तीचे चांगले योग आहेत. ता. १६ ची संकष्टी चतुर्थी चंद्रोदयातून सुवार्ता देणारी ठरेल, त्याचबरोबर वैवाहिक जीवनात हृद्य प्रसंगांची ठरेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात पुत्रोत्कर्षातून धन्यता देईल.
जुन्या गुंतवणुकीतून लाभ होतील
वृषभ : सप्ताहात राशींच्या एक्स्चेंजमध्ये भाव खाऊन जाणारी अशी ही रास राहील. जुन्या गुंतवणुकीतून मोठे लाभ होतील. परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय होतील. ता. १४ व १५ हे दिवस जोरदार मुसंडी मारणारे ठरतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे धनलाभ होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम पॅकेजची नोकरी मिळेल. काहींना या सप्ताहात मित्र-मैत्रिणींचे उत्तम सहकार्य लाभेल. ओळखी मध्यस्थींतून मोठे चमत्कार घडतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारच्या संकष्टीचा चंद्रोदय मोठी भाग्यलक्षणे दाखवेल. व्यावसायिक पातळीवर रखडलेली वसुली होईल.
नोकरीत बढतीचे योग
मिथुन : सप्ताहातील गुरुचे राश्यांतर तत्काळ फलदायी होणार आहे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट स्वरूपाचे रेकॉर्ड ब्रेक असे यश मिळेल. नोकरीत अचानक बढतीचे योग येतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट आपल्या राशीस एकूणच सर्व बाबतीत उत्तम पर्यावरण ठेवेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक पातळीवर मोठा भांडवलपुरवठा होईल. विशिष्ट सरकारी लागेबांधे फलद्रूप होतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह मोठ्या भाग्यबीजांची पेरणी करणारा ठरणार आहे. शुक्रवारची संकष्टी धनसंपन्न करणारी आहे.
योग्य ठिकाणी बदली होईल
कर्क : पौर्णिमेच्या प्रभावात शुभग्रहांची स्पंदने निश्चितच खेचून घ्याल. सप्ताह पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी रसद पुरवेल. नोकरीमध्ये योग्य ठिकाणी बदली होईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती श्रीमंतांच्या यादीत जातील. काहींना व्यावसायिक प्रतिष्ठेचा लाभ होईल. काहींना परदेशी व्यापारातून धनवर्षाव होईल. काहींचे वारसाहक्काचे प्रश्न सुटतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र थोरामोठ्यांच्या मध्यस्थीतून फलदायी होणारे असे आहे. बुद्ध पौर्णिमा साक्षात्कार घडवेल. गुरुभक्ती बळकट होईल.
मुलाखतींमध्ये यश मिळेल
सिंह : सप्ताहारंभीचे पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र मोठी भाग्यबीजे पेरेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीतील अस्वस्थता जाईल. होतकरू तरुणांच्या नोकरीसाठीच्या मुलाखती यशस्वी होतील. व्यावसायिक पातळीवर वसुली होईल. ता. १६ ची संकष्टी चतुर्थी पुत्रचिंता घालवेल. स्वतंत्र व्यावसायिकांना न्यायालयीन प्रकरणातून लाभ होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह शैक्षणिक मार्ग दाखवेल. सप्ताहाचा शेवट सुवार्तांतून मौजमजा करणारा ठरेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याची पौर्णिमा मानसन्मानातून थक्क करणारी असेल. पुत्रोत्कर्षातून धन्यता लाभेल.
वास्तूचे स्वप्न साकार होईल
कन्या : सप्ताहात व्यावसायिक पातळीवर आर्थिक आलेख उंचावणारा आहे. व्यावसायिक उत्सव, प्रदर्शनातून मोठा प्रतिसाद मिळेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचे वास्तूचे स्वप्न साकारेल. नवपरिणितांचे एक सुंदर पर्व सुरू होईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच सप्ताह महत्त्वाच्या कामातून साथ देणारा. ता. १६ च्या संकष्टीचा चंद्रोदय मोठा प्रसन्न राहील. मुलाखतींतून नोकरीची निश्चिती होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याच्या पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र धनसंपन्न करणारेच आहे. कलावंतांचा मोठा भाग्योदय होईल. पती व पत्नीचा भाग्योदय होईल. एकूणच तरुणांचे प्रश्न मार्गी लागतील.
अपवादात्मक स्वरूपाचे लाभ होतील
तूळ : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात सुरू होणारा हा सप्ताह विशिष्ट अपवादात्मक लाभ करून देणारा. भाग्यात येणारा गुरु सप्ताहात चांगलीच लक्षणे दाखवेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचे कायदेशीर प्रश्न मार्गी लागतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठा भावरम्य राहील. ता. १६ ची शुक्रवारची संकष्टी चतुर्थी विशिष्ट सुवार्तांतून चंद्रोदय साजरा करणारी ठरेल. तरुणांसाठी मोठे जल्लोषाचे वातावरण राहील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याची पौर्णिमा व्यावसायिक प्राप्तीची परंपरा ठेवेल. वैवाहिक पातळीवरचे विसंवाद मिटतील.
उधारउसनवारीत सावधानता बाळगा
वृश्चिक : सप्ताहात ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी जुगार टाळावा. उधारउसनवारी सांभाळून करावी. शेअर बाजाराचे भान ठेवावे. बाकी पौर्णिमेने सुरू होणारा सप्ताह या शुक्रभ्रमणातून ता. १४ ते १६ हे दिवस अतिशय प्रफुल्लित ठेवेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती वलयांकित होतीलच. ता. १६ च्या संकष्टीचा चंद्रोदय भावरम्य राहील. तरुणांची विवाह पसंती होईल. व्यावसायिकांना सप्ताहाचा शेवट मोठ्या प्राप्तीचाच राहील. जाहिरात माध्यमे यशस्वी होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात अपरिचित व्यक्तींशी सांभाळावे.
व्यवसायात मोठ्या उलाढाली होतील
धनु : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात सुरू होणारा सप्ताह मोठे व्यावसायिक शुभसंकेत देणारा. मूळ नक्षत्रास ता. १४ चे गुरुचे राश्यांतर तत्काळ शुभसंकेत देणारे आहे. नोकरीमध्ये एक सुंदर पर्व सुरू होईल. जीवनातील विशिष्ट मानवी उपद्रव पूर्ण मावळेल. तरुणांना विवाह करावासा वाटेल. पूर्वाषाढा नक्षत्रास ता. १६ ची शुक्रवारची संकष्टी शुभग्रहांची ताकद प्रचंड वाढवत चंद्रोदय करेल. प्रेमिकांनी लाभ घ्यावाच. व्यावसायिकांचे मार्केटिंग यशस्वी होईल, व्यावसायिक मोठ्या उलाढाली होतील.
नव्या ओळखीतून लाभ होतील
मकर : सप्ताहात ग्रहांचे फिल्ड कडक उन्हाळ्यातही गारवा देईल. पौर्णिमेचा ट्रॅक पकडणारा सप्ताह अर्थातच नैसर्गिक पाठबळ देईल. थोरामोठ्यांच्या संगतीतून लाभ घडतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ ते १६ हे दिवस चढत्या क्रमाने उत्तम फलदायी होणारे. नोकरीच्या नव्या संधी येतील. नव्या ओळखीतून लाभ होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेचे फिल्ड व्यावसायिक तेजी ठेवेलच. सरकारी माध्यमे साथ देतील. काहींचे राजकीय वर्चस्व चांगलेच वाढेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना न्यायालयीन प्रकरणांतून लाभ.
आर्थिक कोंडी दूर होईल
कुंभ : पौर्णिमेच्या प्रभावात सुरू होणारा सप्ताह मानसिक पर्यावरण चांगलेच ठेवेल. स्वतंत्र व्यावसायिकांची आर्थिक कोंडी जाईल. ता. १४ ते १५ हे दिवस शुभग्रहांच्या अखत्यारीतून फळे देतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा वाव मिळेल. तरुणांना नोकऱ्या मिळतीलच. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ ची संकष्टी चतुर्थी मोठ्या भाग्योदयातून चंद्रोदय करेल. पती वा पत्नीचा भाग्योदय. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची उद्याची पौर्णिमा घरामध्ये मोठ्या जल्लोषाची असेल.
अडचणींतून मार्ग निघेल
मीन : सप्ताह पौर्णिमेच्या कलांच्या वर्षावातून उत्तम वातावरण निर्माण करेल. मोठ्या अडचणींतून मार्ग निघेल. प्रतिष्ठा अबाधित राहील. ता. १४ ते १६ हे दिवस शुभग्रहांच्याच प्रभावाखालचे आहेत. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना प्रकाशात आणणारा सप्ताहाचा शेवट असेल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना बुद्धिकौशल्यातून मोठ्या स्वरूपाचे लाभ होतील. विशिष्ट सरकारी माध्यमे भक्कम साथ देतील. तरुणांना ता. १६ च्या संकष्टीचा चंद्रोदय नक्षत्र - लोकांतून लाभ देणारा असेल. विवाहपसंती होईल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभाचा योग आहे. वास्तुयोग देखील आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.