साप्ताहिक राशिभविष्य : (१३ एप्रिल २०२५ ते १९ एप्रिल २०२५)
मौल्यवान कागदपत्रे सांभाळावीत
मेष : सप्ताहातील ग्रहमान भावनिक पार्श्वभूमीवर जपण्याचेच आहे. नवपरिणित तरुणांनी क्रिया-प्रतिक्रिया सांभाळाव्यात. गैरसमज टाळावेत. व्यावसायिकांनी संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळावेत. अश्विनी नक्षत्राच्या कलाकारांना सप्ताहाचा शेवट ध्येयपूर्तीचा आनंद देईल. काहींना मानसन्मानांतून लाभ. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट व्यावसायिक उत्सव - प्रदर्शनांतून प्रतिसाद देणारा. घरातील पुत्रपौत्रांचा भाग्योदय धन्यता देईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी मौल्यवान कागदपत्रे सांभाळावीत.
व्यवसायातील आर्थिक कोंडी दूर होईल
वृषभ : सप्ताहातील शुक्राची मार्गी स्थिती आणि राशीच्या गुरुचे पाठबळ नवकल्पनांना वा नव्या व्यावसायिक पर्यायांतून लाभ करून देईल. सप्ताहात सरकारी कामांना वेग येईल. एकूणच ता. १६ व १७ हे दिवस शुभग्रहांच्या पॅकेजचे ठरतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा हुरूप येईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक आर्थिक कोंडी दूर होईल. बँकेकडून काहींची कर्जमंजुरी होईल. वैवाहिक जीवनातील पर्यावरण सुधारेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १६ ची संकष्टी भाग्योदयाचा चंद्रोदय करणारी करेल.
नोकरीतील वातावरण बदलेल
मिथुन : सप्ताहातील मार्गी होणारा शुक्र आणि बुध-नेपच्यून युतियोग एक नवी आध्यात्मिक दृष्टी देणारा. श्रद्धा बळकट होतील. नोकरीतील पर्यावरण प्रचंड सुधारेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विशिष्ट भावनिक प्रसंगांतून न्हाऊन काढेल. घरात सुवार्तांची पार्श्वभूमी राहील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार संध्याकाळ मोठी प्रसन्न राहील. देवदर्शनातून प्रचिती मिळेल. व्यावसायिक तेजी राहील. एखादे रखडलेले येणे येईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या परदेशी संधी मिळतील. नोकरीत बढतीचे संकेत मिळतील.
तरुणांना वाव मिळणारा कालखंड
कर्क : सप्ताहात राशींच्या एक्स्चेंजमध्ये चांगलाच भाव खाऊन जाणारी किंवा भाव वठवणारी रास राहील. सप्ताहात पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ग्रहांचे फिल्ड पूर्णतः फलंदाजीचे राहील. परिस्थितीचा फायदा घेऊन चौकार-षटकार मारणार आहात. सरकारी माध्यमांतून लाभ उठवाच. ता. १६ व १७ हे दिवस मोठा विजयोत्सव साजरा करतीलच. पुनर्वसु नक्षत्राच्या तरुणांना मोठा वाव देणारा सप्ताह. प्रेमिकांना सप्ताह दाद देणारा. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्ती गुरुवारी आपल्या रोजनिशीत सुवर्णाक्षरांच्या नोंदी करतील. नोकरीत पदस्थ व्हाल. भावाबहिणींचे प्रश्न सुटतील.
वास्तुविषयक प्रश्नातून मार्ग निघतील
सिंह : सप्ताहारंभ रवीच्या राश्यांतरातून उत्तम लक्षणे दाखवणारा. नोकरीत व व्यावसायिक क्षेत्रात उत्तम घडामोडी घडतील. पूर्वा नक्षत्रच्या व्यक्तींचे मानसिक अस्वास्थ्य जाईल. एखाद्या शत्रुत्वाच्या झळा कमी होतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ होतील. विशिष्ट घरगुती विरोध मावळेल. ता. १६ व १७ हे दिवस मातृपितृचिंता घालवतील. नोकरीतील बदलीचे सावट जाईल. सप्ताहात वास्तुविषयक प्रश्नातून मार्ग निघतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. परदेशस्थ तरुणांचे प्रश्न सुटतील.
मानसन्मानाचा कालखंड
कन्या : सप्ताहात मार्गी होणारा शुक्र मोठी भाग्यलक्षणे दाखवेल. सप्ताहात व्यावसायिक एक सुंदर पर्व सुरू होईल. सप्ताहात नवपरिणितांचे जीवन निश्चितच मार्गी लागेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट सतत आनंदाश्रुंनी भरवणारा. ता. १६ ची संकष्टी चंद्रोदयातून मोठी लक्षणीय राहील. गुड फ्रायडे चैनीचा तसेच चंगळ आणि मौजमजेचा ठरेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नोकरीतील नव्या जडणघडणींतून लाभ. अर्थातच बदलीतून लाभ होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मानसन्मानाचा ठरेल.
स्पर्धात्मक पातळीवर यश लाभेल
तूळ : सप्ताहात मार्गी होणारा शुक्र आणि रवीचे राश्यांतर सप्ताहाच्या शेवटी मोठे फलद्रूप होईल. व्यावसायिक नव्या उपक्रमांतून यश मिळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नवी उमेद मिळेल. तरुणांना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. ता. १६ व १७ हे दिवस एकूणच आपल्या राशीस नवचैतन्य देतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ ची संकष्टी विशिष्ट खरेदी-विक्रीतून लाभ देणारी. काहींना कर्जमंजुरीतून लाभ होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ चा गुरुवार शत्रुत्वाचे ग्रहण घालवेल. नोकरीत वरिष्ठांचा कृपाशीर्वाद लाभेल. शेअर बाजारातील आडाखे यशस्वी होतील.
परदेशामध्ये स्थैर्य मिळेल
वृश्चिक : सप्ताहात ग्रहांची मंत्रालये आपल्या राशीस पूर्ण साथ देणारी राहतील. नवे उपक्रम राबवाच. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम भावनिक रसद पुरवली जाईल. अर्थातच जनसंपर्कातून लाभ होतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात मोठे दैवी पाठबळ मिळणार आहे. नोकरी-व्यावसायिक पातळीवर मोठे लाभ होतील. एकूणच ता. १६ ते १८ हे दिवस आपल्या राशीस सतत ग्रीन सिग्नलच देतील. शैक्षणिक यश संपादन होईल. परदेशस्थ तरुणांना हा सप्ताह पर्वणीसारखाच राहील. ज्येष्ठा नक्षत्राच्या तरुणांना परदेशी स्थैर्य लाभेल. नवपरिणितांना पुत्रयोग आहे.
कलाकारांचे भाग्योदय होतील
धनु : सप्ताहाचा ट्रॅक शुभग्रहांची लॉबीच सांभाळेल. मात्र भावनोद्रेक टाळाच. तारुण्यातील उन्माद सांभाळा. बाकी सप्ताहात नोकरीतील पर्यावरण छानच राहील. नोकरीत प्रशंसापात्र व्हाल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ होतील. काहींना वेदनायुक्त व्याधींवर औषध लागू पडेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात मोठ्या वैयक्तिक उत्सव-समारंभातून साजरी होईल. ता. १७ व १८ हे दिवस सहकुटुंब सहली-करमणुकीचे राहतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार संकटविमोचनाचा. प्रिय व्यक्तीची चिंता जाईल. व्यावसायिक उपक्रमांतून दिलासा मिळेल. कलाकारांचे भाग्योदय होतील.
नोकरीच्या संधी मिळतील
मकर : आजचा रविवार शुभग्रहांचेच एक पॅकेज घोषित करणारा. सप्ताहात परदेशी व्यापार वृद्धिंगत होईल. व्यावसायिक जाहिराती यशस्वी प्रतिसाद देतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना प्रत्येक कामांतून सतत ग्रीन सिग्नलच मिळतील. विवाहेच्छुंनी येणाऱ्या विवाहस्थळांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. ता. १६ व १७ हे दिवस सर्व गोष्टींतून गतिमानच राहतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ ओळखी मध्यस्थींतून फलद्रूप होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहारंभ छान नोकरीच्या संधी आणून देईल.
बढतीमधील अडचणी दूर होतील
कुंभ : सप्ताहातील मार्गी होणारे शुक्रभ्रमण सप्ताहारंभी महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांतून फास्ट ट्रॅक ठेवेल. काहींना मोठे परिस्थितीजन्य लाभ होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रमंडळींकडून लाभ होतील. पती वा पत्नीचा भाग्योदय होईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांचे पॅकेज पूर्णपणे साथ देईल. विशिष्ट घरगुती वाद संपतील. नोकरीत कर्तृत्व गाजवाल. काहींचा बढतीचा मार्ग मोकळा होईल. ता. १८ चा गुड फ्रायडे खऱ्या अर्थाने साजरा कराल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल.
व्यवसायात तेजी राहील
मीन : सप्ताहात साडेसातीतही आपल्या राशीचा पदन्यास अतिशय तालात राहील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्रास आजचा रविवार मोठी भेट देऊन जाईल. एकूणच सप्ताहात व्यावसायिक तेजीच राहील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ ते १८ हे दिवस अतिशय नावीन्यपूर्ण राहतील. ता. १६ च्या संकष्टीचा चंद्रोदय मोठी भाग्यलक्षणे दाखवेल. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. परदेशस्थ तरुणांचे अस्थैर्य जाईल. गुड फ्रायडे विवाहेच्छुंना ग्रीन सिग्नल देणारा. कलाकारांना आणि प्रेमिकांना सूर गवसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.