साप्ताहिक राशिभविष्य : (१६ मार्च २०२५ ते २२ मार्च २०२५)
परदेशात वाव मिळेल
मेष : भावनाप्रधान मंडळींना सप्ताह नाजूकरीत्या प्रभावी राहील. स्वप्ने रंगवू नका. नवविवाहितांनी रुसवेफुगवे टाळा. बाकी कलाकारांना ता. १९ ची रंगपंचमी प्रसिद्धियोगाची. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह परदेशात वाव देणारा. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात हवेतील संसर्गातून त्रास, प्रवासात मास्क लावा. बाकी सप्ताह नवकल्पनांना वाव देईलच. अनपेक्षित गाठीभेटीतून लाभ. सप्ताहाचा शेवट तीर्थाटनांचा, सहकुटुंब मौजमजा करण्याचा असेल. व्यावसायिक वसुली होईल.
व्यावसायिक पातळीवर धनवर्षाव
वृषभ : तरुणांना सप्ताहात एक सुंदर पॅकेज राहीलच. ता. १९ व २० हे दिवस गाठीभेटी मुलाखती आणि करारमदार आदींमधून मोठी भाग्यबीजे पेरणारे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी दैवी प्रचिती मिळेल. विशिष्ट स्पर्धात्मक यशातून लाभ. घरात कार्य ठरतील. घरातील तरुणांचे भाग्य उजळेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० चा गुरुवार व्यावसायिक धनवर्षाव करणारा. जाहिरात माध्यमांतून लाभ. मोठ्या उत्सवसमारंभातून उपस्थिती राहील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी माध्यमांतून विशिष्ट लाभ होतील.
बदलीच्या प्रयत्नांना यश
मिथुन : सप्ताहात भावनाप्रधान व्यक्तींनी उद्रेक जपावा. घरगुती वादग्रस्त पार्श्वभूमीवर संयम ठेवावा. गैरसमजातून नाट्ये उद्भवू शकतात. बाकी सप्ताहातील वक्री बुध आणि शुक्र ग्रहांची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर परिस्थितीजन्य लाभ देईल. बदलीचे प्रयत्न यशस्वी होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट प्रलोभनातून फसवणुकीचा ठरू शकतो. स्त्रीवर्गाशी क्रिया-प्रतिक्रिया जपा. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी विचित्र वेदनामुक्त व्याधी सतावू शकते.
मुलाखतींमध्ये प्रभाव पडेल
कर्क : सप्ताहातील भावनात्मक ग्रहांची पार्श्वभूमी उत्तम साथ देईल. ता. १९ व २० हे दिवस रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सुवार्ताच्या जल्लोषातून रंग उडवतील. पुष्प नक्षत्राच्या व्यक्तींना घरातील प्रिय व्यक्तींचे भाग्योदय चकित करतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींचे परदेशगमन होईल. मुलाखतीतून प्रभाव टाकाल. काहींचे विवाहाचे प्रश्न मार्गी लागतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात नोकरीतील राजकारणात पडू नये. अर्थातच, नोकरीतील हितशत्रूंचे भान ठेवून वागा. सप्ताहाच्या शेवटी व्यसनांचा अतिरेक टाळा. शिवाय रंगपंचमींच्या पार्श्वभूमीवर पंचमहाभूतांशी मस्ती नकोच. भाजण्या-कापण्यापासून जपा.
जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल
सिंह : सप्ताह मधा नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहयोगांतून हाय व्होल्टेजचाच. उष्णताजन्य विकारांतून त्रास होईल. यंदाचा उन्हाळा चांगलाच झळा पोहोचवणारा. बाकी सप्ताह नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमीवर विशिष्ट शुभलक्षणे दाखवेल. वादग्रस्त येणी वसूल होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह जुन्या गुंतवणुकीतून लाभ देईल. घरातील भावाबहिणींच्या चिंता जातील. ता. २० व २१ हे दिवस घरी व दारी मोठे प्रसन्न राहतील. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. उत्तरा नक्षत्रच्या व्यक्तींना सप्ताह एकूणच चैनीवर खर्च करेल. काहींना नोकरीतील नव्या जडणघडणींतून लाभ होतील. नोकरीतील वरिष्ठावर छाप पाडाल. बदलीचे सावट जाईल.
कलाकारांना मोठी संधी लाभेल
कन्या : अनेक माध्यमांतून यशस्वीतेच्या फ्लॅश न्यूज देणारा हा कालखंड असेल. कलाकारांना मोठे पॅकेज देणारा सप्ताह राहील. विवाहेच्छू तरुणतरुणी मॅरेज मार्केटमध्ये मोठी कनेक्टिव्हिटी साधतील. चॅटिंगमध्ये प्रेमिकांचे प्रभाव पडतील. उत्तरा नक्षत्राची व्यक्ती कलागुणसंपन्न होईल. ता. १९ ची रंगपंचमी जीवनात मोठी संस्मरणीय ठरणार आहे. हस्त नक्षत्रास ता. १९ व २० हे दिवस मोठी भाग्यबीजे पेरणारे. नवपरिणितांचा मोठा जल्लोष राहील. रंगपंचमीचा एक अद्भुत मधुचंद्र साजरा कराल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी विद्युत उपकरणे जपून हाताळावीत.
सरकारी माध्यमातून लाभ होईल
तूळ : स्त्रीवर्गास सप्ताहातील ग्रहांची पार्श्वभूमी विचित्र मनोव्यथा देऊ शकते. विशिष्ट स्त्री रोगाचा प्रादुर्भाव अस्वस्थ करू शकतो. विशिष्ट औषधाची रिॲक्शन येऊ शकते. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना उष्णताजन्य विकार सतावतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट निद्रा सुखाची हानीच करणारा. बाकी ता. १९ व २० हे दिवस स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक पार्श्वभूमीवर छानच राहतील. सरकारी माध्यमातून लाभ होतील. काहींना न्यायालयीन प्रकरणातून यश मिळेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात विचित्र स्त्री विरोध होऊ शकतो. नोकरीत बदलीचे सावट राहील.
भाजणे-कापणे यापासून काळजी घ्या
वृश्चिक : सप्ताहात राशींच्या एक्स्चेंजमध्ये खऱ्या अर्थाने भावसंवाद साधणारी रास राहील. सप्ताहाचा आरंभच त्याची सुरुवात करून देईल. सप्ताहात अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती दैवी गुणसंपन्नच होतील. घरी आणि दारी त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल. ता. १९ व २० हे दिवस मोठी भाग्यबीजे पेरतील. काहीची मौल्यवान गोष्टींची खरेदी होईल. ता. २० चा गुरुवार गुरुभ्रमण सार्थकी लावेल. सप्ताहात छान नव्या ओळखी होतील. प्रेमिकांची एक वेगळीच रंगपंचमी साजरी होईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी भाजणे-कापणे सांभाळावे.
नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील
धनु : सप्ताहात वक्री बुध आणि शुक्र यांचा सहयोग भावनाप्रधान मंडळींना संमिश्र स्वरूपात बोलू शकतो. मूर्खांशी संभाषण नको. बाकी मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना मौनातून आत्मप्रचिती देणारेच ग्रहमान. अर्थातच न बोलून हसत हसत कार्यभाग साधा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात सरकारी कामे मार्गस्थ करणारी. शनिवारी घरात मोठे प्रसन्न वातावरण राहील. मात्र अन्नपाण्यातील संसर्गापासून सावध राहा.
राजकीय व्यक्तींकडून लाभ शक्य
मकर : आजचा रविवार सप्ताहाचे सुंदर पॅकेज घोषित करेल. सुवार्तांचे दूरध्वनी येतील. ता. १९ व २० हे दिवस प्रेमिकांना पर्वणीचे. विवाहाचे निर्णय घ्याच. ज्योतिषी आडवा आणू नका. आपल्यावर गुरुकृपा राहील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी करून देणारा. काहींना राजकीय व्यक्तींकडून लाभ. ता. २० च्या गुरुवारी विशिष्ट करारमदार होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतीतून नोकरीची ग्वाही मिळेल. उत्तम पॅकेजची नोकरी मिळेल. मात्र शनिवारी उत्सव समारंभात मौल्यवान वस्तू सांभाळा.
मोठे आर्थिक व्यवहार होतील
कुंभ : सप्ताहात वक्री बुध-शुक्रांचे एक पॅकेज राहील. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर घरात मोठा आनंदोत्सव साजरा कराल. विशिष्ट मध्यस्थीतून मोठे आर्थिक व्यवहार होईल. तरुणांचा शैक्षणिक आत्मविश्वास निश्चितच वाढेल. ता. १८ व २० हे दिवस गाठीभेटीतून, महत्त्वाच्या कामांतून आणि विशिष्ट खरेदी-विक्रीतून उत्तम फलदायी होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींची विशिष्ट धनचिंता निस्तरली जाईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना साडेसातीतही एक नवीन जीवनदृष्टी येईल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी या सप्ताहात कामगार वर्गाची मने जपावी.
नवकल्पनांना वाव मिळेल
मीन : सप्ताहात जीवनातील सौंदर्यदृष्टी वाढेल. अर्थातच जीवनातील सकारात्मक दृष्टिकोन वाढेल. सप्ताहात तरुणांच्या नवकल्पनांना उत्तम वाव मिळेल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचे ता. १९ व २० हे दिवस गाठीभेटीतून अतिशय सुसंवादी राहतील. विवाहेच्छू तरुण-तरुणांना सप्ताह म्हणजे एक पर्वणी राहील. सतत ऑनलाइन राहाच. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीचा फायदा उठवून घ्यावाच. अर्थातच बुद्धिकौशल्याने. बाकी सप्ताहात स्त्रीवर्गाशी दुष्टोत्तर नकोत. वेंधळेपणा टाळा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.