साप्ताहिक राशिभविष्य : (१८ मे २०२५ ते २४ मे २०२५ )
भाऊबंदकीचा त्रास शक्य
मेष : सप्ताह मंगळभ्रमणातून संमिश्र स्वरूपाचा फलदायी होईल. शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर क्रिया-प्रतिक्रियेतून जपण्याचा सप्ताह आहे. काहींना भाऊबंदकीतून त्रास होऊ शकतो. सप्ताहारंभ एकूण आपल्या राशीस मानवी उपद्रवाचाच ठरेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी घरी व दारी जनसंपर्कातून जपण्याचाच कालखंड आहे. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात जुगारसदृश व्यवहारांतून धोका संभवतो. बाकी अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह सरकारी कामांतून यश देईल. कलावंतांचे भाग्योदय होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींची वास्तुचिंता जाईल. शनिवार सूर्योदयी मोठ्या सुवार्तांचा योग आहे. प्रेमिकांना मार्गस्थ करणारा कालखंड आहे.
मौल्यवान चीजवस्तू सांभाळा
वृषभ : सप्ताहात वैवाहिक जीवनातील पर्यावरण बिघडू शकते. नवपरिणितांनी गैरसमज टाळावेत. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना घरगुती पार्श्वभूमीवर अस्वस्थ ठेवणारेच ग्रहमान आहे. घरातील मौल्यवान चीजवस्तू सांभाळा. बाकी व्यावसायिक पार्श्वभूमीवर सप्ताह प्रसन्न ठेवणारा असा आहे. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० ते २२ हे दिवस व्यावसायिक तेजी ठेवतील. व्यावसायिक उत्सव-प्रदर्शने गाजतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह प्रवासात निश्चितच जपण्याचा आहे. अनोळखी व्यक्तीकडून फसवणुकीचे योग. खरेदीत जपा.
आर्थिक उत्कर्ष होईल
मिथुन : सप्ताहातील शुक्रभ्रमण व्यावसायिक मोठे लाभ देईल. ता. २० ते २२ हे दिवस प्रत्येक वन डे जिंकून देणारे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० च्या अष्टमीचा दिवस मोठी भाग्यबीजे पेरणारा राहील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना जाहिरात माध्यमातून मोठे लाभ होतील, मात्र सप्ताहात बेकायदेशीर व्यवहार टाळा. मित्रसंगतीतून फसू नका. बाकी सप्ताह वैवाहिक जीवनात मस्तच राहील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नोकरीतील घडामोडी मोठ्या पथ्यावर पडतील. पती वा पत्नीचा आर्थिक उत्कर्ष होईल.
नोकरीतील राजकारण सांभाळा
कर्क : राशीचा मंगळ ग्रहयोगांतून सप्ताहाचा पट ताब्यातच घेणार आहे. नोकरीतील राजकारण सांभाळा. सप्ताहाची सुरुवात अस्वस्थतेची राहील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी कोणतीही अरेरावी टाळावी. बाकी सप्ताह घरगुती पार्श्वभूमीवर छानच. पती व पत्नीला एखादी ग्रासलेली चिंता जाईल. कलाकारांना सप्ताहाचा शेवट मोठा लाभ करून देईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी भाग्योदय आहे. ता. २३ व २४ हे दिवस अतिशय गतिमान असे राहतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे. वादग्रस्त वसुली होईल.
बुद्धिकौशल्यातून मोठे लाभ होतील
सिंह : सप्ताह वादग्रस्त पार्श्वभूमीवर विचित्र लक्षणे दाखवू शकतो. सप्ताहात एकूणच मानसिक संतुलन सांभाळा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी सरकारी कायदेकानूंचे भान ठेवा. घरात वडीलधाऱ्यांशी वाद नकोच. नवपरिणितांनी आचारसंहिता पाळावीच. बाकी सप्ताह व्यावसायिक पार्श्वभूमीवर बुद्धिकौशल्यातून मोठे लाभ देईल. परदेशी व्यापारातून मोठे लाभ होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून फलदायी होणारा सप्ताह. काहींना नव्या ओळखीतून लाभ देणारा सप्ताह. सप्ताहाचा शेवट विशिष्ट गुप्तचिंता घालवेल. योग्य औषध लागू पडेल. गर्भवतींची चिंता जाईल.
मोठे आर्थिक व्यवहार होतील
कन्या : सप्ताहात शुभग्रहांचा वरचष्मा राहीलच. तरुणांनी संधीचा लाभ अवश्य घ्यावा. कोणताही न्यूनगंड बाळगू नये. मात्र सप्ताहात कोणतीही शारीरिक मस्ती टाळावी. वृद्धांनी तारुण्याचा आव आणू नये. बाकी उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात मोठे दैवी पाठबळ राहील. नोकरीत प्रशंसापात्र व्हाल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींचे मार्केटिंग यशस्वी होईल. मोठे आर्थिक व्यवहार होतील. मात्र गुंडांपासून सावधच राहा. शेजाऱ्यांशी वाद नकोत. विवाहेच्छुंनी सप्ताहात विवाहस्थळांचा पाठपुरावा करावाच. सतत ऑनलाइन राहाच. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम कालखंड आहे.
व्यावसायिकांच्या उपक्रमांना यश
तूळ : सप्ताहातील दशमस्थ मंगळभ्रमण ग्रहांच्या पटावर मोठा अंमल करेल. शह-काटशहाचे राजकारण टाळाच. वैवाहिक जीवनात थट्टामस्करी टाळा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट जुनाट व्याधींचा प्रादुर्भाव अस्वस्थ करेल. सप्ताहात कुपथ्य टाळाच. बाकी सप्ताहाचा शेवट विशिष्ट गुप्तचिंता घालवेल. विशिष्ट नुकसानीचे भय जाईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नोकरीत वरिष्ठांशी आचारसंहिता पाळावी लागेल. बाकी सप्ताहात स्वतंत्र व्यावसायिकांचे उपक्रम यशस्वी होतील. ता. २० ते २१ मे हे दिवस अतिशय प्रवाही राहतील. रेंगाळलेली कामे होतील.
प्रफुल्लित ठेवणारा कालखंड
वृश्चिक : एक लाभसंपन्न अशी पार्श्वभूमी राहील. जीवनातील विशिष्ट वादग्रस्त प्रकरणे मिटवाल. मात्र सप्ताहात आरोग्यविषयक पथ्ये पाळाच. सप्ताहात घरातील वृद्धांची काळजी घ्या. बाकी सप्ताहातील मंगळभ्रमण सप्ताहात विशिष्ट स्पर्धात्मक यश देणारे. ता. २२ ते २४ हे दिवस प्रफुल्लित ठेवणारे. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना अकल्पित गाठीभेटींतून लाभ होतील. घरातील तरुणांचे भाग्योदय प्रसन्न ठेवतील. ज्येष्ठा नक्षत्राची व्यक्ती सप्ताहाचा शेवट वैवाहिक जीवनातून समारंभ साजरा करेल.
वास्तुविषयक कटकटी जातील
धनु : सप्ताहातील शुक्रभ्रमण शुभग्रहांची लॉबी सांभाळणारेच. घरातील पर्यावरण छान राहील. घरात कार्य ठरतील. काहींना नोकरीतील घडामोडींतून अनपेक्षित लाभ होतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना न्यायालयातली विशिष्ट प्रकरणातून दिलासा मिळेल. पती व पत्नीची विशिष्ट चिंता जाईल. ता. २० ते २२ हे दिवस गाठीभेटी करारमदार व धनलाभाची परंपरा ठेवतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ चा गुरुवार मोठी दैवी प्रचिती देईल. शत्रुवर विजय मिळवाल. व्यावसायिक क्षेत्रात एखादी लॉटरी लागल्यासारखे व्यवहार होतील. वास्तुविषयक कटकटी जातील. कर्जमंजुरी होईल.
परदेशगमनातील अडथळे दूर होतील
मकर : सप्ताहात मोठे आश्वासक ग्रहमान राहणार आहे. मात्र घरगुती वाद टाळा. सप्ताहात नोकरदारांना दिलासा देणारेच ग्रहमान आहे. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरीच्या संधी येतील. परदेशगमनातील अडथळे दूर होतील. वादग्रस्त वसुली कराल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमण विशिष्ट कलागुणांतून प्रकाशात आणेल. सप्ताहाचा शेवट मोठा लाभसंपन्न ठेवणारा. प्रेमिकांना जवळ आणणारा. सप्ताहाचा शेवट मोठा जल्लोषाचाच राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारचा सूर्योदय वैयक्तिक सुवार्तेतून धन्य करेल. ग्रासलेली पुत्रचिंता जाईल.
व्यावसयिक क्षेत्रात दिलासादायक काळ
कुंभ : सप्ताह मोठा नावीन्यपूर्ण राहील. मात्र दुखापती सांभाळा. सप्ताहारंभी मंगळभ्रमणाचे उपद्रवमूल्य राहील. आजूबाजूचे अवधान सांभाळा किंवा ठेवा. वाहने जपून चालवा. बाकी सप्ताहात व्यावसायिकांनी जुगारसदृश व्यवहार टाळावेत. सप्ताहात कामगारपीडेतून त्रास होऊ शकतो. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट व्यावसायिक संदर्भातून मोठा दिलासा देईल. ता. २२ चा गुरुवार मोठा प्रसन्न ऱाहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचे नुकसानीचे भय जाईल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह कर्जमंजुरीतून दिलासा देईल. हितशत्रूपीडा संपेल.
मित्रसंगतीतून धोका होऊ शकतो
मीन : सप्ताह मोठी मजेदार आणि अकल्पित फळे देणार आहे. सप्ताहातील राशीच्या शुक्रभ्रमणाचा प्रभाव छान राहील. घरातील प्रिय व्यक्तींचे भाग्योदय धन्य करतील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट ध्येय साडेसातीतही गाठले जाईल. ता. २२ चा गुरुवार मोठा सुवार्तांतून फ्लॅशन्यूजमध्ये आणणारा. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठी नावीन्यपूर्ण शुभफळे देईल. उत्तम नोकरीचा लाभ होईल. रेवती नक्षत्रास अचानक धनलाभ होतील. मात्र सप्ताहात चुकीच्या मित्रांच्या संगतीतून धोका होऊ शकतो. प्रलोभन टाळाच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.