साप्ताहिक राशिभविष्य : (२० एप्रिल २०२५ ते २६ एप्रिल २०२५)
घरात मंगलकार्ये ठरतील
मेष : सप्ताहातील ग्रहांचे फिल्ड अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ देऊ शकते. शुक्र-शनी युतियोगाची पार्श्वभूमी नोकरीत भाग्यसंकेत देईल. संयम ठेवा. ता. २१ व २२ हे दिवस तरुणांच्या नोकरीच्या मुलाखतींतून प्रभाव टाकणारे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट घरात मंगलकार्ये ठरविणारा. ता. २२ चा मंगळवार वैयक्तिक विजयोत्सवाचा ठरेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक धनलाभ.
संधींचा वर्षाव होईल
वृषभ : सप्ताहात राशींच्या एक्स्चेंजमध्ये आपल्या शेअरचा भाव चांगलाच वाढणार आहे. सतत आगतस्वागतांतून लाभ होतील. सप्ताहाचा आरंभ विजयी चौकार-षटकारांचा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती वलयांकित होणार आहेत. काहींना ओळखींतून नोकरीचा लाभ होईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींवर संधींचा वर्षाव होणार आहे. ता. २१ व २२ हे दिवस अतिशय गतिमानच राहतील. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट गुरुकृपेचा राहील. महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.
खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना गती मिळेल
मिथुन : सप्ताहात शुक्र-शनी युतियोगाची पार्श्वभूमी विशिष्ट नैराश्य घालवेल. ता. २३ ते २५ हे दिवस तरुणांना उत्तम प्रेरणा देणारेच आहेत. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना फलंदाजीचेच फिल्ड राहील. कला, छंद किंवा विशिष्ट स्पर्धा परीक्षांतून ध्येय साध्य कराल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात व्यावसायिक खरेदी-विक्रीच्या व्यवहारांतून गती मिळेल. वास्तुविषयक कायदेशीर कटकटी निघून जातील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वैवाहिक जीवनातून प्रसन्नतेचा आणि सुसंवादाचा ठरेल.
योग्य ठिकाणी बदली होईल
कर्क : सप्ताहातील ग्रहमान अतिशय भावसमृद्ध राहील. पुनर्वसु नक्षत्रास दुर्मीळ विवाहयोग चालून येतील. सप्ताहाचा आरंभ एकूणच आपल्या राशीस गतिमान राहील. विशिष्ट हुकमी कामे होतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ व २६ हे दिवस व्यावसायिक उलाढालींतून मोठे लाभ देणारेच. काहींची नोकरीत योग्य ठिकाणी बदली होईल. सप्ताहात पती वा पत्नीचे मोठ्या स्वरुपात कौतुक समारंभ होतील. शुक्रवारचा दिवस मोठी चैन, चंगळ आणि मौजमजेच्या वातावरणाचा राहील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रमंडळींकडून लाभ होईल.
नोकरीचे चांगले पर्याय येतील
सिंह : आजचा रविवार सूर्योदयी सुवार्तेचा ठरेल. एखादी ग्रासलेली पुत्रचिंता जाईल. मघा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात मस्त मौजमजा करतील. सप्ताहात उंची चीजवस्तूची खरेदी होईल. ता. २४ चा गुरुवार पूर्वा नक्षत्रास नोकरी-व्यावसायिक लाभ देईल. काहींना उत्तम नोकरीचे पर्याय पुढे येतील. पती वा पत्नीचा भाग्योदय साजरा करण्याचा कालखंड. सप्ताहाचा शेवट वादग्रस्त वसुलीतून थक्क करेल. विशिष्ट वादामध्ये सामोपचाराने मार्ग निघेल. उत्तरा नक्षत्राच्या नवविवाहितांना सप्ताहात अपत्यसंभवाची चाहूल कृतार्थ करेल.
सरकारी कामामध्ये यश
कन्या : सप्ताह आपल्या राशीस एकूणच शुभग्रहांकडून उत्तम रसद पुरवणारा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांतून मोठ्या फ्लॅशन्यूज देतील. खेळाडूंचा आणि कलाकारांचा आत्मविश्वास वाढेल. सप्ताहात ओळखींतून विवाहस्थळे येतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ हे दिवस सरकारी कामांतून यश देतील. काहींना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. नोकरीच्या मुलाखतींतून नोकरीची हमी मिळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एकूणच घरातील प्रिय व्यक्तींच्या उत्कर्षाचा. काहींना वास्तुलाभ होईल. काहींची कर्जमंजुरी होण्याची शक्यता.
'व्हिसा'विषयक कामे होतील
तूळ : सप्ताहातील ग्रहांचे फिल्ड ओळखी - मध्यस्थींतून फलदायी होणारे. तरुणांचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी जाण्यासाठीचा व्हिसा मिळेल. ता. २३ व २४ हे दिवस स्वाती नक्षत्रास पुत्रचिंता घालवतील. नवपरिणितांना पती वा पत्नीच्या भाग्योदयातून मोठा दिलासा मिळेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ चा गुरुवार महत्त्वाच्या गाठीभेटींतून चमत्कार घडवेल. काहींना राजकीय मदत मिळेल. व्यावसायिक वास्तुविषयक प्रश्न सुटतील. विशिष्ट तडजोडींतून लाभ होतील.
हरवलेले गवसेल
वृश्चिक : सप्ताहात ग्रहांचे फिल्ड नैसर्गिक अनुकूलता ठेवेल. प्रवास आणि प्रवासातील कामे यशस्वी होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना गुप्तधनाचा लाभ होईल किंवा हरवलेले गवसेल. आजचा रविवार मोठ्या चमत्काराचा ठरेल. प्रेमिकांना शुभशकून देणाराच सप्ताह आहे. सप्ताहाचा शेवट एकूणच आपल्या राशीस छान निद्रासुख देईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ हे दिवस सुवार्तांतून फ्लॅशन्यूजमध्येच आणणारे. सप्ताहात एखादा भूखंड न्यायालयीन प्रकरणांतून सोडवून घ्याल. सप्ताहात ज्येष्ठा नक्षत्रास वाचासिद्धी प्राप्त होईल. म्हणाल ते होईल, प्रेमिकांनो वचनबद्ध व्हाच. विवाह ठरवाच !
थोरामोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल
धनु : सप्ताहात शुक्रभ्रमण ग्रहांचा पट निश्चितच ताब्यात घेईल. तरुणांना ऊर्जा देणाराच सप्ताह. सप्ताहात चांगले मित्र भेटतील. व्यावसायिकांना उत्तम भागीदार मिळतील. काहींना विशिष्ट भांडवलपुरवठा होईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना नक्षत्रलोकांतून लाभ होतील. वरुथिनी एकादशीजवळ मोठे भाग्योदय होतील. एकूणच सप्ताह चढत्या क्रमाने उत्तम साथ देणारा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांच्या ओळखीचा उत्तम फायदा होईल. उद्याचा सोमवार संकटावर मात करणारा ठरेल. नोकरीवरील संकट जाईल. घरातील स्त्रीवर्गाचे प्रश्न सुटतील. मातृचिंता जाईल.
सार्वजनिक प्रतिष्ठा वाढेल
मकर : सप्ताहातील सुवार्तांतून लक्ष वेधून घेणारीच रास राहील. शुक्र-शनी युतियोगाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक झेप घेणार आहात. ता. २२ ते २४ हे दिवस प्रचंड गतिमान राहतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची विक्रमी वाटचाल राहील. काहींची राजकीय ताकद किंवा सार्वजनिक प्रतिष्ठा वाढेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या नोकरीतील एक सुंदर पर्व सुरू होईल. कलाकारांचे भाग्य उजळेल. सप्ताहात एखाद्या वादग्रस्त स्वरूपाच्या न्यायालयीन प्रकरणातून नैतिक विजय संपादन कराल. व्यावसायिक उत्सव-प्रदर्शने गाजतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून आनंद मिळेल.
संसर्गजन्य आजारापासून काळजी घ्या
कुंभ : शुक्र-शनी युतियोगाच्या पार्श्वभूमीवर सप्ताह उत्तम बोलेल. घरी आणि दारी उत्तम मानसिक पर्यावरण राहील. घरात उत्सव-समारंभाचेच वातावरण राहील. घरात प्रिय व्यक्तींची वर्दळ राहील. शततारका नक्षत्राच्या होतकरू तरुणांचे मोठे भाग्योदय होतील. नोकरीच्या मुलाखतींतून छाप पाडाल. सप्ताहात चैनी-करमणुकीवर खर्च कराल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात प्रवासामध्ये संसर्गजन्य बाधा होऊ शकते. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील एकादशी गुरुकृपेची ठरणार आहे. आर्थिक संकट निघून जाईल.
स्त्रीवर्गाशी थट्टामस्करी टाळावी
मीन : आजच्या रविवारच्या सूर्योदयीच सुवार्ता कळतील. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना एक नवीन जीवनदृष्टी देणाराच सप्ताह. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट एकूणच हृद्य घटनांचा असेल. विशिष्ट वैयक्तिक उत्सव-समारंभ घडतील. नोकरीत प्रशंसापात्र व्हाल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक झेप गाठून देणाराच सप्ताह वाटतो. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात स्त्रीवर्गाशी थट्टामस्करी टाळावी. गैरसमज होऊ देऊ नयेत. कोणत्याही वादविवादात मध्यस्थी टाळा. मित्रसंगतीतून आर्थिक देवाणघेवाण करताना काळजी घेणे इष्ट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.